राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना अतिवृष्टीने तडाखा दिला आहे. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. बळींची संख्या वाढते आहे. अशातच शिवसेनेने मदत पोहचवण्याआधीच त्या मदतीची जाहिरात केल्याचे दावे करणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
‘मदत पोचण्या आधी जाहीरात आली म्हणजे हे सरकार किती तत्पर आहे. बघा व्हिडीओ …..’ अशा कॅप्शनसह ‘भारतीय जनता पार्टी घाटंजी’ या फेसबुक पेजवर शिवसेनेच्या जाहिरातीचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय.
ट्विटरवर देखील हेच दावे व्हायरल होतायेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश मालानी आणि प्रशांत गावडे यांनी आमच्या 9172011480 या व्हॉट्सऍप क्रमांकावर व्हायरल दावे फॉरवर्ड करून माहिती देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
व्हायरल दाव्यात ‘सरकार किती तत्पर आहे बघा’ असा उल्लेख आहे. परंतु व्हिडिओच्या शेवटी केवळ शिवसेनेचे चिन्ह दिसतेय. महाराष्ट्रात केवळ शिवसेनेचे सरकार नाही. सेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. असे असताना सरकारी मदतीवर शिवसेनेचे चिन्ह शासनाकडून लागणे शक्य नाही. या तर्काने पडताळणीस सुरुवात झाली.
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिल्या तसेच ऍडव्हान्सड् कीवर्ड सर्च करून पाहिले असता सदर व्हिडीओ युट्युबवर शिवसेनेच्या चॅनलवर १२ ऑक्टोबर २०१९ रोजी म्हणजे जवळपास २ वर्षांपूर्वी अपलोड केला गेला असल्याचे आढळून आले.
व्हिडिओच्या कॅप्शननुसार ही जाहिरात २०१९च्या विधानसभा निवडणुकांसाठी तयार करण्यात आली होती. या जाहिरातीचा राज्यातील सध्याच्या पूरजन्य परिस्थितीशी काहीही संबंध नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत. व्हायरल व्हिडीओ २ वर्षांपूर्वीचा असून राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ बनविण्यात आला होता. या व्हिडिओच्या आधारे पूरग्रस्तांना मदत पोहचवण्याआधीच शिवसेनेने जाहिरात केली असल्याचा दुष्प्रचार केला जातोय.
हेही वाचा: वक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment