Press "Enter" to skip to content

मोबाईल चार्जिंगला लाऊन फोनवर बोलताना पाणी पिल्याने मेंदूला लागला शॉक? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

सोशल मीडियात एका घरातील घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय. व्हिडीओतील व्यक्ती मोबाईल चार्जिंगला लाऊन कॉलवर बोलत असताना पाणी पिल्याने त्याच्या मेंदूला शॉक लागला आणि तो जागीच ठार झाल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.

Advertisement

‘खतरनाक आहे हे…..
प्रत्येकान काळजी घ्या. पाणी पित असताना आणि त्यात मोबाइल charging ला लावलेला….. जोरात मेंदूला शॉक लागलेला दिसतोय. खूप भयानक !!’
या अशा कॅप्शनसह ३.०७ मिनिटाचा तो व्हिडीओ शेअर केला जातोय.

हेच दावे फेसबुक आणि व्हॉट्सऍपवरही जोरदार व्हायरल होत आहेत.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक रामहारी शिंदे, नितीन वाहुळे, राजेंद्र काळे, संदीप पाटील आणि किरण साळुंके यांनी हे दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

man dies by mobile phone charging shock facebook viral claims
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने या आधीही अशाच ‘सीसीटीव्ही फुटेज’प्रमाणे दिसणाऱ्या व्हायरल व्हिडीओजची पडताळणी केली होती आणि त्यात ते बनावट असल्याचे समोर आले होते. याच पूर्वानुभवावरून आम्ही पडताळणी केली असता असे लक्षात आले की मागे आम्ही ज्या ‘रिक्षामधील गर्भवती महिलेस शाळकरी मुलीने मदत केल्याचा’ व्हिडीओ व्हायरल झाला होता त्याच टीमचा हा व्हिडीओ आहे.

फेसबुकवर ‘हमसा नंदिनी‘ नावाची युट्युबर आहे. तिच्या वॉलवर अशाप्रकारचे अनेक व्हिडीओज आहेत आणि त्यांच्या कॅप्शनमध्ये हे जनजागृतीकरिता बनविलेले स्क्रिप्टेड व्हिडीओज आहेत असे लिहिलेले आहे. म्हणजेच हे खरे सीसीटीव्ही फुटेज नसून तशा पद्धतीने शूट केलेले व्हिडीओ आहेत.

तिच्या वॉलवर सध्या व्हायरल होत असणारा व्हिडीओ उपलब्ध नाही परंतु ९ ऑक्टोबर २०२० रोजी अपलोड केलेल्या दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये हेच घर वापरले आहे. घरात असलेल्या एकट्या महिलेची सेल्समनने फसवणूक केल्याचा तो व्हिडीओ आहे. या घरातील सोफा, भिंतीवरील चित्र, पडदे, टेबल लँप अगदी सहजपणे एकसारखे असल्याचे आपल्या लक्षात येईल.

मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना वापरल्यास स्फोट होतो का?

विविध आंतरराष्ट्रीय न्यूज रिपोर्ट्सनुसार हे स्पष्ट होते की मोबाईल चार्जिंगला लाऊन वापरल्यास किंवा फोनवर बोलल्यास स्फोट होतो किंवा शॉक लागतो वगैरे दावे चुकीचे आहेत. मोबाईल चार्जरचा ऍडप्टर ‘एसी’ करंट ‘डीसी’ मध्ये कन्व्हर्ट करूनच मोबाईलपर्यंत पाठवत असतो. त्यामुळे मुख्य विजेच्या प्रवाहाइतकी तीव्रता त्यात नसते.

अशाप्रकारे चार्जिंग होत असताना मोबाईल वापरल्याचा कुठलाही धोका नसल्याचे छातीठोक दावे सॅमसंग, हुवेई यांसारख्या कंपन्यांनी आपल्या वेबसाईटवर केले आहेत.

परंतु, काही तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही हलक्या प्रतीचा चार्जर किंवा मोबाईल वापरत असाल आणि चार्ज करतेवेळी त्याचा वापर करत असाल तर तो गरम होऊन छोटासा स्फोटही होण्याची शक्यता आहे. तसेच चांगल्या प्रतीचा मोबाईल-चार्जर असेल आणि चालू चार्जिंगमध्ये वापर करत असाल तर आपला मोबाईल हळूवार चार्ज होईल, त्याची कार्यक्षमता कमी होईल आणि चार्जर देखील लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो असा वापर टाळावा.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की मोबाईल चार्जिंगला लाऊन फोनवर बोलताना पाणी पिल्याने मेंदूला शॉक लागल्याचे दावे होत असलेला व्हिडीओ खरा नाही. तो स्क्रिप्टेड म्हणजेच ठरवून शूट केलेला आहे. त्यातील पात्रे आणि घडलेली घटना काल्पनिक आहे. तरीही मोबाईल फोन चार्जिंगला लावलेला असताना त्याचा वापर करणे शक्यतो टाळावे. एक छोटीशी खबरदारी आपला मोबाईल फोन, चार्जर आणि आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवण्यास नक्कीच मदत करेल.

हेही वाचा: चालत्या इलेक्ट्रिक स्कूटरचा झाला स्फोट? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा