सोशल मीडियावर एका तरुणाला मारहाण केली जात असल्याचा विचलित करणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेल्या एका तरुणाकडून एका शीख तरुणाला बेदम मारहाण केली जात असल्याचे बघायला मिळतेय. दावा केला जातोय की हा व्हिडीओ पाकिस्तानातील आहे.
‘पाकिस्तान में सरदार का ये हाल है,और यहाँ का सरदार मुल्लो के साथ खालिस्तान का स्वप्न देख रहा है’ अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
फेसबुकवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला एक ट्विट मिळाले, ज्यामध्ये हा व्हिडीओ पंजाबमधील लुधियाना येथील असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता पीटीसी न्यूजची 5 मार्च 2022 रोजीची बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार सदर घटना लुधियानामधील टिब्बा रोड येथील आहे, जेथे काही लोकांनी एका शीख व्यक्तीला बेदम मारहाण केली होती.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तणाव निर्माण झाला होता आणि शीख समुदायाकडून देखील गोंधळ घालण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण करणाऱ्या व्यक्तीने पीडित व्यक्तीला चोरी करताना पकडले होते. सदर घटनेसंदर्भात पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.
टीव्ही 7 पंजाबच्या युट्यूब चॅनेलवरून देखील या घटनेची बातमी देण्यात आली होती. चोरीच्या प्रकरणात या युवकाला मारहाण केली जात असल्याचे या बातमीमध्ये देखील सांगण्यात आले आहे. तसेच कारण काहीही असले तरी इतक्या बेदमपणे एखाद्याला मारहाण करणे अतिशय चुकीचे असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हंटले आहे. हाच व्हिडीओ दिल्ली आणि उत्तराखंडमधील घटनेचा म्हणून देखील शेअर केला जात असल्याची माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. व्हायरल व्हिडीओ पंजाबमधील लुधियाना येथील घटनेचा आहे.
हेही वाचा- पंजाबमध्ये ‘आप’च्या विजयानंतर पोलिसांसमक्ष खलिस्तान जिंदाबादच्या नारेबाजीचे दावे फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: शीख तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ पाकिस्… […]