अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर काल त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये (Nanavati Hospital)दाखल करण्यात आलं. अमिताभ यांच्यानंतर अभिषेक-ऐश्वर्या आणि अराध्या यांचा देखील रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.
त्यानंतर आज सकाळपासून अमिताभ यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अमिताभ नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेस आणि स्वास्थ्य कर्मचाऱ्यांना धन्यवाद देताहेत. महामारीच्या काळात ते लोकांना जीवदान देत असल्याबद्दल त्यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलंय.
अमिताभ यांनी लोकांना न घाबरता कोरोना महामारी विरोधात लढण्याचं आवाहन केलंय. नानावटी हॉस्पिटल संदर्भातील आपला आतापर्यंतचा अनुभव खूप चांगला राहिला असल्याचे सांगत अमिताभ बच्चन यांनी डॉक्टरांची तुलना देवाशी केलीये.
ट्विटरवर अनेक ब्लू टिक धारक ऑफिशियल अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने या व्हिडीओच्या आधारे केलेली बातमी आपण बघू शकता.
मराठीमध्ये ‘झी चोवीस तास’ने देखील ‘मी नतमस्तक…. महानायकाने नानावटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मानले आभार’ या हेडलाईनसह बातमी प्रकाशित केली आहे.
‘आज तक’ने आपल्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडिओ शेअर केलाय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हिडिओतील फोटो बाजूला काढून गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने मूळ व्हिडीओचा शोध घेतला. आम्हाला या व्हिडीओ संदर्भातील सर्वात जुनी बातमी ‘झी न्यूज हिंदी’च्या वेबसाईटवर प्रकाशित झाली असल्याचं आढळलं.
कोरोना मरीजों की देखभाल कर रहे डॉक्टर्स के नाम महानायक अमिताभ का संदेश या हेडलाईन आणि ‘अमिताभ बच्चन ने वीडियो संदेश रिकॉर्ड किया है जिसमें डॉक्टर्स को भगवान का रूप कह रहे हैं, वीडियो देखें..’ या सबहेडलाईनसह दि. २३ एप्रिल २०२० रोजी ‘झी न्यूज हिंदी’ने हा व्हिडिओ अपलोड केला होता. व्हिडीओ मध्ये अमिताभ डॉक्टर आणि सर्वच स्वास्थ्य सेवा कर्मचाऱ्यांना धन्यवाद देताना दिसताहेत.
त्यानंतर आम्हाला सिनेपत्रकार फरीदून शहरयार यांचं एक ट्वीट मिळालं. शहरयार यांनी देखील २३ एप्रिल रोजीच अमिताभ बच्चन यांचा हाच व्हिडिओ पोस्ट केला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की अमिताभ बच्चन यांचा नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेस आणि स्वास्थ्य कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतानाचा व्हिडीओ कालचा नाही.
व्हिडिओ जवळपास अडीच महिन्यांपूर्वीचा आहे. मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांकडून आणि सोशल मीडियात हा व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जात आहे.
हे ही वाचा- रणबीर, नीतू कपूर आणि करण जोहर कोरोना संक्रमित झाल्याच्या निव्वळ अफवा!
[…] हे ही वाचा- अमिताभ यांचा नानावटीमधील डॉक्टरांना … […]