Press "Enter" to skip to content

दारू वाटपाचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनातील नाही, व्हायरल दावे फेक!

सोशल मीडियावर दोन व्हिडिओ व्हायरल होताहेत. पहिल्या व्हिडिओत काही लोक एका ड्रममध्ये दारू ओतताना दिसताहेत, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दारूचे वाटप केले जात असल्याचे बघायला मिळतेय. दावा केला जातोय की हा व्हिडीओ शेतकरी आंदोलनातील (Farmers Protest) दारू वाटपाचा आहे.

फेसबुकवर मयंक प्रिडे या युजरकडून पोस्ट करण्यात आलेला व्हिडीओ

Advertisement
४५ हजारांपेक्षा अधिक वेळा शेअर केला गेला आहे.

Liquor distribution in farmer protest false claim on FB
Source: Facebook

ट्विटरवर देखील हे व्हिडीओज शेअर केले जाताहेत. आंदोलनातील सहभागी देशद्रोही असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओच्या पडताळणीसाठी आम्ही किवर्डसच्या साहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला पंजाबमधील मुक्त पत्रकार संदीप सिंग यांचं एक ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की व्हिडीओ शेतकरी आंदोलनातील नसून पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील कौन्के कलाण गावातील आहे.

आपल्या ट्विटमध्ये संदीप सिंग सांगतात की बाबा रोडू शाह दर्ग्यात (Baba rodu shah) दारूचे वाटप करण्यात आले होते. यात्रेदरम्यान दारू वाटपाची ही परंपरा ६० वर्षांपूर्वीपासूनची आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मंजिन्दर सिद्धू यांनी व्हिडीओ ६ सप्टेंबर रोजी रेकॉर्ड करण्यात आल्याची माहिती दिल्याचे देखील संदीप सिंग स्पष्ट करतात.

या माहितीच्या आधारे शोध घेतला असता ‘दै. भास्कर’चा रिपोर्ट मिळाला. व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात भास्करने बाबा रोडू शाह दर्ग्याचे व्यवस्थापक प्रदीप सिंह (बिल्लू) यांच्याशी संपर्क साधला होता. व्हिडिओ ६ सप्टेंबर रोजी दर्ग्यात आयोजित करण्यात आलेल्या दारू लंगरचा आहे. अनेक वर्षांपासून या दर्ग्यात भाविक नवस पूर्ण झाल्यानंतर दारू अर्पण करतात आणि भाविकांनी अर्पण केलेली ही दारू नंतर प्रसाद म्हणून वाटली जाते, अशी माहिती प्रदीप सिंह यांनी दिली आहे.

पडताळणी दरम्यान आम्हाला जर्नेल सिंह या फेसबुक अकाऊंटवरून 6 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आलेला फेसबुक लाईव्ह बघायला मिळाला. ‘बाबा रोडू मेले’ अशा कॅप्शनसह हा लाईव्ह शेअर करण्यात आलेला आहे. या लाइव्हमधील काही दृश्ये सध्याच्या शेतकरी आंदोलनातील दारू वाटपाचा म्हणून फिरवल्या जाणाऱ्या व्हिडिओशी जुळणारी आहेत.

आम्हाला डेली न्यूज पंजाबकडून फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल व्हिडिओ बघायला मिळाला. “जागराओं कौनके कलां ਮੇਲਾ ਬਾਬਾ ਰੋਡੂ ਸ਼ਾਹ ਜੀ ਦੇ ਠਾਠਾਂ ਮਾਰਦਾ ਇੱਕਠ” अशा पंजाबीतील कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या पंजाबी शीर्षकाचा अर्थ असा की बाबा रोडे शाह यांच्या यात्रेत प्रचंड गर्दी.

डेली न्यूज पंजाबने देखील ‘अल्ट न्यूज’शी बोलताना व्हिडीओ बाबा रोडे शाह यात्रेतील असल्याचे सांगितले आहे. यात्रेदरम्यान दारू वाटपाची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे, असे देखील डेली न्यूज पंजाबने स्पष्ट केले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दारू वाटपाच्या व्हिडिओशी शेतकरी आंदोलनाचा काहीही संबंध नाही. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील कौन्के कलाण या गावातील बाबा रोडे शाह यांच्या यात्रेदरम्यानचा व्हिडीओ शेतकरी आंदोलनातील म्हणून शेअर केला जातोय.

हेही वाचा- ‘गांधीजींबरोबर ३-४ महिला पण मोहन भागवतांसोबत एकही नाही’ राहुल गांधींच्या वक्तव्याचा व्हिडीओ एडीटेड!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा