सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. प्रेयसीच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार केलेल्या तरुणास काही लोक चोप देतायेत. दावा केला जातोय की प्रेमाच्या जाळ्यात फसलेल्या मुलीचा तो जिहादी युवक गळा कापत होता. तसेच आवाहन केले जातेय की हा व्हिडीओ शक्य तितक्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करून आपल्या परिवारातील मुलींना हे सत्य दाखवावे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक नंदकिशोर भारसाखळे आणि त्यांच्या व्हॉट्सऍप ग्रुप ‘संभाजी राजे’ मधील सभासदांनी सदर दाव्याची पडताळणी करण्याची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’च्या गुगल कीवर्ड्स सर्चमध्ये असे लक्षात आले की सदर व्हिडीओ आणि दावे २०१९ सालापासून व्हायरल होत आहेत. १९ सप्टेंबर २०१९ रोजी फेसबुकवर अपलोड झालेला तो व्हिडीओ आपण ‘येथे‘ पाहू शकता.
‘इटीव्ही भारत’च्या बातमीनुसार सदर घटना १५ सप्टेंबर २०१९ रोजी घडली आहे. व्हिडीओतील युवकाचे नाव अरविंदकुमार असे आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी तो चंदवा येथून रांचीला आला होता. ते दोघे पतरारू येथील पर्वतीय भागात, धरणावर फिरायला गेले होते.
पिडीत तरुणी अजून कुणा व्यक्तीच्या प्रेमात असल्याचा अरविंद कुमारला संशय होता. माघारी येत असताना त्यांच्यात वाद झाला. अरविंद ने कडक उन असल्याचे सांगत गाडी झाडाखाली उभी केली. दोघे झाडाच्या सावलीत बसले होते. तेवढ्यात ती तरुणीला काही कळण्याच्या आत अरविंदने चाकू काढून तिच्या गळ्यावर वार करायला सुरुवात केले. तरुणीने तेथून पळ काढत आरडाओरडा सुरु केला. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्या तरुणास पकडून चोप दिला, पिठोरिया पोलिसांनी त्यास अटक केले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओतील युवक आणि युवती दोघेही हिंदूच आहेत. २०१९ साली घडलेल्या या प्रकरणास ‘लव्ह जिहाद’चे दावे जोडून धार्मिक तेढ वाढवण्याचा खोडसाळपणा केला जातोय.
हेही वाचा: हुक्का बारमधील छाप्यात मुस्लिम तरुणांसोबत १५ हिंदू तरुणी सापडल्याचे दावे चुकीचे!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment