Press "Enter" to skip to content

बटण हत्ती समोरचे दाबले तरी मत कमळाला जातेय? बिहार निवडणुकीत EVM घोटाळा?

बिहार विधानसभा निवडणुकांचे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. दावा केला जातोय की हत्तीसमोरचे बटण दाबले तरीही कमळाला मत जात आहे. (BJP tampered EVM in Bihar)

Advertisement

‘बिहार का चुनाव Jas चैनल की खबर है !! 🤔🤔🤔
पहले ही चरण की वोटिंग में खेल सुरु हो गया है बीजेपी वोट #डालाहाथीपे जाता #कमल पे भाई लोग इसे इतना शेअर करो की_2024 मे EVM कोई वस्तु भारतमे ना रहे’
या कॅप्शनसह व्हॉट्सऍपवर व्हायरल होणारा व्हिडीओ ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अविनाश घोडके यांनी निदर्शनास आणून दिला आणि पडताळणी करण्याची विनंती केली.

फेसबुकवरील ज्या ‘JAS Chanal’ नामक पेजवर हा व्हिडिओ शेअर झालाय; ती पोस्ट बातमी करेपर्यंत तब्बल २४ हजार लोकांनी शेअर केलीय.

पहले ही चरण की वोटिंग में खेल सुरु हो गया है बीजेपी वोट डालो हाथी पे जाता कमल पे

Posted by Jas Chanal on Wednesday, 28 October 2020

अर्काइव्ह लिंक

ट्विटरवर देखील (BJP tampered EVM in Bihar) याच दाव्यांसह हा व्हिडीओ फिरत आहे.

पडताळणी:

प्रथमदर्शनी कुणालाही असेच दिसेल की हत्ती चिन्ह असणाऱ्या उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबले तरीही कमळ चिन्हासमोर लाल लाईट लागते आहे आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्येही कमळ म्हणजेच भाजपच्या उमेदवाराला मत गेल्याचे दिसत आहे. (BJP tampered EVM in Bihar)

परंतु व्हायरल व्हिडीओचे आम्ही बारकाईने निरीक्षण केले आणि बनाव लक्षात आला. व्हिडीओतील इसम तर्जनीने हत्तीसमोरील बटण दाबत असल्याचे दाखवत असला तरीही खालच्या बाजूने अंगठ्याने कमळासमोरचे बटण दाबत आहे.

BJP manipulated evm or its hand trick check post marathi
Source: Facebook

व्हायरल व्हिडीओचा बिहार निवडणुकीशी संबंधच नाही:

व्हिडीओचे निरीक्षण करत असताना त्यावरील उमेदवारांची नावे पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. स्क्रिनशॉट घेऊन झूम करून पाहिले असता भाजप उमेदवाराचे आडनाव द्विवेदी असल्याचे दिसले. त्यामुळे बिहार विधानसभेसाठी ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या भाजप उमेदवारांची यादीमध्ये ‘द्विवेदी’ नाव शोधून पाहिले परंतु असा एकही उमेदवार आम्हाला सापडला नाही.

मग ‘bjp candidate dwivedi’ या कीवर्ड्सच्या आधाराने सर्च करून पाहिले असता आम्हाला NDTV ने ‘हरीश चंद्र उर्फ हरीश द्विवेदी’ यांच्याविषयी प्रसिद्ध केलेली माहिती सापडली. हे नाव आणि त्यातील माहिती EVM वरील नावाशी जुळत होती. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशच्या ‘बस्ती’ मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर द्विवेदी निवडून आले होते.

तरीही खात्री करून घेण्यासाठी आम्ही बस्ती मतदारसंघाच्या सर्वपक्षीय उमेदवारांची यादी तपासून पाहिली तेव्हा इतरही पक्षाच्या उमेदवारांची नावे व्हायरल व्हिडीओतील EVMवरील यादीशी तंतोतंत जुळत होती.

भाजप तर्फे हरीश चंद्र उर्फ हरीश द्विवेदी, बसपा तर्फे राम प्रसाद चौधरी आणि कॉंग्रेसतर्फे राज किशोर सिंह निवडणूक लढवत होते. पैकी भाजपचे द्विवेदी विजयी झाले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये (BJP tampered EVM in Bihar) व्हायरल व्हिडीओत निव्वळ हातचलाखीने भाजपला मत जात असल्याचे दाखवले आहे. मुळात अंगठ्याने कमळासमोरचे बटण दाबले जात असल्याचे निदर्शनास आले. याहून महत्वाचे सत्य म्हणजे सदर व्हिडीओत दिसत असलेल्या EVM मशीनवरील नावांच्या बिहार निवडणूकीशी काहीएक संबंध नाही. हे उमेदवार उत्तरप्रदेशातील बस्ती मतदारसंघातील आहेत. सदर व्हिडीओ २०१९च्या लोकसभा निवडणुकीचा आहे.

हेही वाचा: बिहार मध्ये ‘गो बॅक मोदी’चे नारे आणि रस्त्यांवर ग्राफिक्स? वाचा सत्य!

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा