Press "Enter" to skip to content

राष्ट्रपती कोविंद यांनी कंगनाच्या वक्तव्यावर नाराज होऊन पद्म पुरस्कार मागे घेण्याविषयी ट्विट केलेय?

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या हस्ते अभिनेत्री कंगना राणावतला (Kangana Ranaut) पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर ‘भारताला २०१४ साली खरे स्वातंत्र्य मिळाले, १९४७ साली तर भीक मिळाली होती.’ असे वादग्रस्त वक्तव्य कंगनाकडून देण्यात आले.

Advertisement

कंगनाच्या वक्तव्याचा देशभरातून निषेध करण्यात आला आणि तिच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला गेला. अशातच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावाने एक ट्विट व्हायरल होत आहे. ट्विटमध्ये राष्ट्रपतींनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगनाला स्वहस्ते पुरस्कार दिल्याबद्दल खेद व्यक्त करत तिला दिलेला पुरस्कार मागे घेण्याची अनुमती द्यावी अशी पंतप्रधान मोदी यांना विनंती केली असल्याचा दावा केला जातोय.

‘कंगना रनौत द्वारा की गई टिपण्णी देश की भावनओंको आहत करने वाली है, मै स्वयं उन्हे पद्म पुरस्कार दिये जाने के लिये शर्मिंदगी महसूस कर रहा हुं! मेरी सरकार श्री नरेंद्र मोदीसे विनती है की मुझे पुरस्कार वापस लेने की अनुमती दी जाये.’ असा मजकूर असलेल्या ‘President of India’ या ट्विटर हँडलवरील ट्विटचा स्क्रिनशॉट व्हायरल होतोय. त्यावर ‘देशाची अवस्था काय झालीय स्वतः राष्ट्रपती पंतप्रधांना विनंती करतायेत’ असे लिहिले आहे.

President Kovind viral tweet about Kangna Ranaut
Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश मालानी, निसार अली,जगदीश काबरे, डी जे चांद आणि शैलजा बारुरे यांनी सदर व्हायरल स्क्रिनशॉट निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली. हा ट्विट स्क्रिनशॉट फेसबुकवरही जोरदार व्हायरल होतोय.

Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी कंगना राणावतच्या (Kangana Ranaut) देशाच्या स्वातंत्र्याविषयीच्या वक्तव्यावर काही मत व्यक्त केले आहे का? हे तपासण्यासाठी गुगल सर्च केले परंतु अशा स्वरुपाची एकही बातमी आम्हाला सापडली नाही. या उलट दिल्ली महिला आयोग प्रमुख स्वाती मलीवाल (Swati Maliwal) यांनी राष्ट्रपती कोविंद यांना पत्र लिहित कंगनाचा पद्म पुरस्कार मागे घ्यावा अशी विनंती केल्याच्या बातम्या समोर आल्या.

ट्विटर वापरत असणाऱ्या समाजातील महत्वाच्या व्यक्तींच्या नावापुढे ट्विटरद्वारे व्हेरिफिकेशन करून ‘ब्ल्यू टिक’ दिले जाते. यातून ते अकाऊंट अधिकृत असल्याचे समजते. परंतु व्हायरल ट्विटमधील युजरनेम समोर ‘ब्ल्यू टिक’ नाही. हाच धागा पकडत आम्ही शहानिशा केली असता असे लक्षात आले की व्हायरल ट्विट @rashtrptibhvn या हँडलवरून करण्यात आले आहे आणि राष्ट्रपतींचे अधिकृत ट्विटर हँडल @rashtrapatibhvn असे आहे. या अकाऊंटसमोर ब्ल्यूटीक सुद्धा आहे. दोन्हींच्या स्पेलिंगमध्ये फरक आहे. हे फेक अकाऊंट ट्विटरच्या निदर्शनास आल्यानंतर ट्विटरकडून ते डिलीट करण्यात आले आहे.

President of India fake and verified twitter accounts
Source: Twitter

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिनेत्री कंगना राणावतच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत तिला दिलेला पद्म पुरस्कार परत घेण्याची परवानगी द्यावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करणारे व्हायरल ट्विट फेक आहे. ट्विटरकडून हे फेक अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.

हेही वाचा: राज ठाकरेंच्या फेक ट्विटर हॅण्डलवरून कंगना राणावतवर करण्यात आलेले ट्विट व्हायरल!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा