Press "Enter" to skip to content

राज ठाकरेंनी कंगनाची बाजू घेत संजय राऊतांना धमकावले नाही, ते ट्विटर हँडल फेक!

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणापासून कंगना राणावत विविध वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यात परवा मुंबईची तुलना POK म्हणजेच ‘पाक व्याप्त काश्मीर’ सोबत केल्याने महाराष्ट्रातील नेते विरुद्ध कंगना असं चित्र पहायला मिळतंय. या प्रकरणात विविध नेत्यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली आहे. अशातच आज मनसे नेते राज ठाकरे कंगनाच्या समर्थनार्थ (raj thackeray supporting kangana) उतरल्याचा दावा करणारं एक ट्विट व्हायरल होतंय.

Advertisement

काय आहे त्यात ट्विट मध्ये?

अर्काइव्ह लिंक

बातमी लिहीपर्यंत हे ट्विट तब्बल तीन हजार लोकांनी रीट्विट केलं आहे. यावर दोन्ही बाजूंनी बऱ्या वाईट कमेंट्स झाल्या आहेत. हे ट्विट करण्याआधी याच अकाऊंटवरून केलेले ट्विट पाच हजारहून जास्त लोकांनी रीट्विट केलेय.

अर्काइव्ह लिंक

पडताळणी:

राज ठाकरे यांची आणि पक्षाची सातत्याने समोर येत असलेली भूमिका पाहता त्यांनी मराठी किंवा इंग्रजी सोडून हिंदीत ट्विट करणे हेच अनाकलनीय आहे. त्यामुळेच आम्ही पडताळणीस सुरुवात केली.

सर्वात आधी हे ट्विट ज्या हँडलवरून केले गेले आहे त्याची प्रोफाईल तपासून पाहिली. त्यावर ‘Official Twitter Handle Raj Thackeray.’ असे लिहिले आहे परंतु त्यावर ट्विटरकडून व्हेरीफाईड हँडलसाठी दिली जाणारी ब्ल्यू टिक नसल्याचे पाहून शंका अधिकच दाट झाली.

म्हणून मग आम्ही राज ठाकरे असे सर्च करून पाहिले तेव्हा खरे, अधिकृत ट्विटर हँडल आम्हाला सापडले. या दोन्ही हँडल्सची तुलना करून पाहिल्यास आपल्यालाही समजेल की कोणते खरे कोणते फेक आहे.

‘ब्ल्यू टीक’ व्हेरिफिकेशन मार्क:

एखादी पब्लिक फिगर असेल, सेलिब्रिटी असेल तर त्या व्यक्तीचे व्हेरीफाईड अकाऊंट कोणते हे जनसामान्यांना कळावं म्हणून ट्विटर स्वतःच्या पातळीवर कसून चौकशी करून मगच नावापुढे ‘ब्ल्यू टिक’ देते. हे ‘ब्ल्यू टिक’ फेक अकाऊंटला मिळणे अगदीच अवघड आहे.

आपण पाहू शकता व्हायरल ट्विट ज्या अकाउंटवरून केले गेले त्या @TheThackerayRaj या हँडलला ‘ब्लू टिक’ नाही परंतु दुसरे @RajThackeray लिहिलेल्या हँडलसमोर ‘ब्ल्यू टिक’ आहे म्हणजेच ते अधिकृत अकाऊंट आहे.

Raj Thackeray profile comparison checkpost marathi
Source: Twitter

ऑगस्ट २०२० मध्ये बनवलेले अकाऊंट:

प्रोफाईलवर व्यवस्थित पाहिल्यास लक्षात येईल की हे ट्विटर अकाऊंट ऑगस्ट २०२० मध्ये तयार केले आहे. या उलट राज ठाकरे यांचे अधिकृत अकाऊंट मे २०१७चे आहे.

फॉलोविंग लिस्ट:

अधिकृत अकाऊंट असणाऱ्या व्यक्ती कुणाला फॉलो करतात याकडे जनसामान्यांपासून मिडियाचे फार बारकाईने लक्ष असते. म्हणूनच सातत्याने बातम्या येत असतात की अमुक आरोपी, गुन्हेगारास देशाचे पंतप्रधान ट्विटरवर स्वतः फॉलो करत आहेत. किंवा व्हाईट हाउस केवळ १९ लोकांना फॉलो करत आहे, त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा आहेत. किंवा काही दिवसात पुन्हा बातम्या येतात की व्हाईट हाऊसने मोदींना अनफॉलो केले आहे. इत्यादी इत्यादी.

तसेच जर आपण या दोन्ही अकाऊंट वरून कुणा कुणाला फॉलो केलं जात आहे हे जर पाहिले तर व्हायरल ट्विटचे @TheThackerayRaj हँडल तब्बल २८७ जणांना फॉलो करत आहे. यामध्ये कंगना रनोत, आप, द हिंदू, मनीष सिसोदिया यांचे हँडल्स आहेत. याउलट ब्ल्यू टिक असणारे @RajThackeray हे हँडल केवळ एकाच अकाऊंटला फॉलो करत आहे आणि ते आहे ‘मनसे’चं अधिकृत अकाऊंट.

Raj Thackeray Following list comparison check post marathi
Source: Twitter

बहुतांश फॉलोअर्स उत्तर भारतीय:

व्हायरल ट्विट ज्या अकाऊंटवरून करण्यात आले आहे त्या अकाऊंटला फॉलो करणाऱ्यांच्या लिस्टमध्ये बहुतांश लोक उत्तर भारतीय, हिंदी पट्ट्यातील असल्याचे लक्षात येईल. या लिस्टमध्ये मराठी भाषिकांची संख्या आगदीच नगण्य आहे.

मराठीचा, महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान असणारा नेता हिंदीतून ट्विट करतो, फॉलो करणारे लोक हिंदी भाषिकच हे चित्र अतार्किक आणि अनाकलनीय आहे.

मनसेची भूमिका

आमच्या पडताळणीमध्ये आम्हाला मनसेच्या चित्रपट आघाडीचे प्रमुख अमेया खोपकर यांचं एक ट्विट देखील मिळालं. यात त्यांनी मुंबई पोलिसांबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल कंगनाचे कान टोचले आहेत.

मुंबई पोलिसांमुळेच आम्ही सुरक्षित असल्याचं सांगत मुंबई पोलिसांबद्दल कुणी काही बरळलेलं खपवून घेतलं जाणार नाही. ज्यांना मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपल्या राज्यात निघून जावे, अशा शब्दात मनसेने या प्रकरणासंबंधी आपली भूमिका जाहीर केली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की कंगना राणावतला पाठिंबा (raj thackeray supporting kangana) देत, तिला हिंदू शेरणी वगैरे म्हणत संजय राऊत यांना धमकावणारे ट्विट ज्या ट्विटर हँडलवरून केले गेले आहे ते हँडल फेक आहे.

कुणीतरी खोडसाळपणा करत हे फेक अकाऊंट काढून राज ठाकरे यांचे नाव वापरत आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी झेंड्याकडे पाठ करून सलामी दिलीय? काय आहे सत्य?

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा