सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. व्हायरल फोटोमध्ये गळ्यात हार घातलेले दोन जोडपे दिसताहेत. फोटो शेअर करताना दावा केला जातोय की मुस्लिम पित्याने स्वतःच्या मुलीशीच लग्न केल्याने रागावलेल्या आईने देखील आपल्या मुलाशी लग्न केले.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने दोन्ही व्हायरल फोटोज रिव्हर्स सर्च करून पाहिले असता या दोन्हीही फोटोविषयीची खरी माहिती समोर आली.
वडील आणि मुलीच्या फोटोचे सत्य:
पहिला फोटो वडील आणि मुलीचाच आहे. ४ फेब्रुवारी २०१६ रोजी अदनान शाहिद या युजरकडून फेसबुकवर हा फोटो अपलोड करण्यात आला होता.
या पोस्टसोबत उर्दू भाषेत फोटो अपलोड करण्यामागचे प्रयोजन देण्यात आले आहे. फोटोसोबतचे कॅप्शन वाचण्यासाठी आम्ही गुगल ट्रान्सलेटरची मदत घेतली. फोटोच्या कॅप्शननुसार या वडील-मुलीच्या जोडीने एकाचवेळी मुस्लीम धर्मग्रंथ कुराण पाठ करून कसलासा कोर्स पूर्ण केला आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
हीच माहिती पडताळून पाहताना ‘इस्लामिक बोर्ड‘ या वेबसाईटवर ‘This father and her daughter became Hafiz -e- Qur’an at the same time. Age is not a barrier for education!’ या कॅप्शनसह तो फोटो शेअर केल्याचे मिळाले. २ ऑक्टोबर २०१६ रोजी ही माहिती अपडेट केली आहे.
आई व मुलाच्या फोटोचे सत्य:
दुसऱ्या फोटोलाही आम्ही रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिले असता २०२० सालची एक फेसबुक पोस्ट मिळाली.
या पोस्ट सोबतचे कॅप्शन देखील उर्दू भाषेतच आहे. यामध्येही फोटोतील मुलाने कुराण पठण पूर्ण केल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला आहे. सोबत आईचाही सत्कार केला गेलाय व आई फेसबुक युजर्सना मुलाचे अभिनंदन करण्याचे आवाहन करतेय.
अल्ट न्यूजचे संस्थापक मोहम्मद झुबेर यांनी सर्वात आधी या व्हायरल दाव्यांचा पर्दाफाश करत मुस्लीम द्वेष्ट्यांना खडे बोल सुनावले होते. मूळ फोटो असणाऱ्या एका ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत त्यातील मजकूरामध्ये ‘खतम-अल-कुराण’ असे लिहिल्याचे सांगितले आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत कुराण पाठ करण्याला ‘खतम-अल-कुराण‘ असे म्हणतात.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटोसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. मुस्लिम धर्माविषयी हेतुपुरत्सर गैरसमज पसरवण्याचा खोडसाळ प्रयत्न या फोटोच्या माध्यमातून केला जात असल्याचे बघायला मिळतेय.
हेही वाचा: रुद्राक्षाची माळ घातल्यामुळे हिंदू विद्यार्थ्याला ख्रिश्चन शिक्षकाने अमानुष मारहाण केली?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: मुस्लीम पित्याने स्वतःच्याच मुलीशी आ… […]
[…] हेही वाचा- मुस्लीम पित्याने स्वतःच्या मुलीशी आण… […]