कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून विद्यार्थ्यांना शिक्षण सुद्धा ऑन]लाईन घेण्याची वेळ आलीय. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांना ऑनलाईन परीक्षा देणेही सुकर व्हावे म्हणून केंद्र सरकार टॅबचे मोफत (free tablet) वाटप करणार असल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
ट्विटर फेसबुकसह व्हॉट्सऍपवरही अशा पद्धतीचे दावे व्हायरल होत आहेत. याबद्दल ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण सागर यांनी माहिती दिली आणि पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’द्वारे व्हायरल दाव्याची पडताळणी करताना सर्वात आधी आम्ही व्हायरल मेसेज व्यवस्थित वाचला.
त्यामध्ये देण्यात आलेली लिंक registration-form-for-free-tablet.blogspot.com/ अशी आहे. कुठलीही शासकीय वेबसाईट ब्लॉगस्पॉट वर नसते. ब्लॉगस्पॉट हे कुठलेही शुल्क न मोजता वेबसाईट तयार करण्याचे माध्यम आहे. यावर कुणीही वेबसाईट बनवू शकतो. शासकीय वेबसाईटच्या शेवटी शक्यतो gov.in असे असते. त्यामुळे तिथेच शंका आली आणि आम्ही सखोल पडताळणी केली.
PIB या शासकीय बातम्या देणाऱ्या विभागाद्वारे चालवण्यात येणाऱ्या फॅक्टचेक ट्विटर हँडलवर शोधले असता या विषयी ट्विट सापडले. यामध्ये व्हायरल दावा फेक असून केंद्र सरकारने अशी कुठलीही योजना जाहीर केली नसल्याचे सांगितले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये केंद्र सरकारद्वारा विद्यार्थ्यांना मोफत टॅब (free tablet) वाटले जाणार सांगणारे व्हायरल दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. अशा फर्जी साईट्स वैयक्तिक माहिती गोळा करून ती टेलीमार्केटिंग कंपन्यांना वगैरे विकण्यासाठी बनवल्या जातात. या आधीही अशा कैक सरकारी योजनांच्या नावाने फेक वेबसाईट चालू केल्या आहेत. यांचा ‘चेकपोस्ट मराठी’ने वेळोवेळी पर्दाफाश केलाय.
हेही वाचा: सरकार ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रोज १० जीबी इंटरनेट मोफत देणार?
Be First to Comment