लग्नानंतर तब्बल 12 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर तिला आई होण्याचं सुख लाभलं; परंतु अचानक उद्भवलेल्या अडचणींमुळे डॉक्टर आई किंवा बाळ दोन्हीपैकी एकाच कुणाला वाचवू शकणार होते. तिने स्वतः मृत्यू पत्करला परंतु मृत्युपूर्वी केवळ 2 मिनिटे बाळाला कुशीत घेऊ देण्याची विनंती डॉक्टरला केली. या हृदयद्रावक प्रसंगाच्या पोस्ट्स सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
‘आज गुजरात में एक मत को 12 साल बाद पुत्र प्राप्ती का सौभाग्य प्राप्त हुआ था लेकीन दुख की यह बात थी कि डॉक्टर साहब ने कहा की या तो बेटा बचेगा या मां बचेगी. उस मा ने डॉक्टर साहब से कहा बेटे को जिंदगी दे दो और मां ने 2 मिनिट तक बच्चे को लाड प्यार दिया और प्राण त्याग दिये. उस वक्त डॉक्टर साहब के आंखो में आंसू आ गये ऐसी मां को शत-शत नमन!’
नुकत्याच जन्मलेल्या बाळाला कुशीत घेतलेल्या आईचा व्हिडीओ आणि भावूक झालेल्या डॉक्टरांच्या फोटोसह काही मजकूर व्हायरल होतोय.
हे दावे केवळ भारतातच नाही तर विदेशातही अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहेत. ट्विटर आणि फेसबुकवर या दाव्यांचे व्हायरल होण्याचे प्रमाण मोठे आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक नितीन यादव, हर्षल अरबाड, निलेश घरत आणि बाळू वैराळ यांनी व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असलेले हेच दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल मजकुरासह फिरत असलेले फोटो-व्हिडीओज गुगल रिव्हर्स ईमेज सर्चच्या मदतीने शोधून पाहिले. 14 डिसेंबर 2015 रोजी ‘Merve Tiritoğlu Şengünler’ या फोटोग्राफरने फेसबुकवर हा आई आणि बाळाचा तो फोटो अपलोड केलेला असल्याचे आढळले. त्यामध्ये त्याने व्हायरल दाव्यात सांगितलेला कुठलाही मजकूर लिहिलेला नाही.
त्याचप्रमाणे दुसऱ्या पोस्ट्मध्ये आईला बिलगून रडणाऱ्या बाळाचा व्हिडीओ दिसत आहे. त्या व्हिडीओच्या की फ्रेम्स रिव्हर्स सर्च करून पाहिल्या असता 24 ऑगस्ट 2017 रोजी युट्युबवर अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कोरिअन भाषेत ‘नुकतेच जन्मलेले बाळ त्याच्या आईला बिलगून रडताना’ एवढेच लिहिलेलं आहे.
एकूणच हृदयद्रावक घटनेमुळे डॉक्टरला रडू आवरले नाही असे दर्शवणारा तिसरा फोटो डॉक्टरचा फोटो असल्याचे दावे केले जात आहेत. परंतु आम्ही याचीही पडताळणी केली असता 5 सप्टेंबर 2017 रोजी ‘ozgemetinphotography’ या इंस्टाग्राम पेजवरून अपलोड करण्यात आलेला तोच फोटो बघायला मिळाला.
फोटोच्या कॅप्शनमध्ये टर्किश भाषेत ‘बाप म्हणून हा क्षण खूप मोलाचा असतो, मला आनंद आहे मी जन्मदाता झालो.’ असे लिहिले आहे. या पेजवरून लहान मुलांचे, गरोदर मातांचे, नुकत्याच जन्मलेल्या बाळांचे फोटोज पोस्ट केलेले आहेत. अशाच एका ‘मॅटर्नीटी फोटोग्राफी’ दरम्यान काढलेला हा फोटो आहे.
फोटोतील व्यक्ती डॉक्टर नाही, कारण डॉक्टर्सना ऑपरेशन थेटरमध्ये मोबाईल आणि घड्याळ घेऊन जाता येत नाही. हे नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे वडील आहेत आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. या फोटोच्या कमेंटसेक्शनमध्ये या फोटोला घेऊन व्हायरल होत असलेल्या पोस्ट्स फेक असल्याचे सांगितले गेले आहे.
सर्व फोटो आणि व्हिडीओज वेगवेगळ्या वेळ-काळाचे आणि स्थळांचे आहेत, तरीही आम्ही अशी काही घटना कुठे घडली होती का हे तपासण्याचा प्रयत्न केला परंतु कुठलीही अधिकृत बातमी किंवा स्रोताकडून या घटनेची पुष्टी झाली नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की तीन वेगवेगळ्या देशांच्या, वेगवेगळ्या वेळांचे फोटो व्हिडीओज एकत्रित करून काल्पनिक गोष्ट बनवून सोशल मीडियात सत्य घटना म्हणून व्हायरल केली जात आहे. याचाच अर्थ तब्बल 12 वर्षांनी आई झाली परंतु मृत्यूपूर्वी केवळ 2 मिनिटेच बाळाला कुशीत घेता आलं वगैरे सांगणारी व्हायरल पोस्ट फेक आहे.
हेही वाचा: मुस्लीम पित्याने स्वतःच्याच मुलीशी आणि आईने मुलाशी लग्न केल्याचे व्हायरल दावे फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment