सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल मेसेजमध्ये काही व्यक्तींची नावे आणि ते कुठल्या पदावर कार्यरत आहेत याविषयीची माहिती देण्यात आली आहे. दावा करण्यात येतोय की ही सर्व मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) नातेवाईक आहेत. काही भाऊ तर काही चुलतभाऊ आहेत. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर त्यातील काही लक्षाधीश तर काही अब्जाधीश झाली आहेत.
काय आहे व्हायरल?
अत्यंत महत्वपूर्ण माहिती:- 1. सोमाभाई मोदी (75 वर्ष) सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी - सध्या गुजरातमधील रिक्रुटमेंट मंडळाचे अध्यक्ष आहेत. 2. अमृतभाई मोदी (72 वर्ष) पूर्वी खाजगी फॅक्टरीत नोकरी करणारे आज अहमदाबाद व गांधीनगरमधील सर्वात मोठे रिअल इस्टेट उद्योगपती आहेत. 3. प्रह्लाद मोदी (64 वर्ष) यांचे रेशन दुकान होते, सध्या अहमदाबाद, वडोदरा येथे Hyundai, Maruti आणि Honda चे फोर व्हीलर चे शो-रूम आहेत. 4. पंकज मोदी (58 वर्ष) पूर्वी माहिती विभागात सामान्य कर्मचारी होते , आज रिक्रुटमेंट मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सोमा भाई सोबत असतात. 5. भोगीलाल मोदी (67 वर्ष) किराणा दुकानाचे मालक होते, आज अहमदाबाद, सूरत आणि वडोदरा येथील रिलायन्स मॉलचे मालक आहेत. 6. अरविंद मोदी (64 वर्ष) हे भंगार व्यापारी होते , ते आज रिअल इस्टेट आणि मोठ्या बांधकाम कंपन्यांकडे स्टीलचे कंत्राटदार आहेत. 7. भारत मोदी (55 वर्ष) पेट्रोल पंपावर काम करत होते. आज अहमदाबादमधील अगियारस पेट्रोल पंप त्यांचा आहे. 8. अशोक मोदी (51 वर्ष) यांचे पतंग आणि किराणा दुकान होते. आज तो रिलायन्समध्ये भोगीलाल मोदीसोबत भागीदार आहेत. 9. चंद्रकांत मोदी (48 वर्ष) एका गौशालेमध्ये कार्यरत होते. आज अहमदाबाद, गांधीनगर येथे त्यांची नऊ दुग्ध उत्पादन केंद्रे आहेत. 10. रमेश मोदी ( 57 वर्षे) शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज त्यांच्याकडे पाच शाळा, 3 अभियांत्रिकी महाविद्यालये, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालये आहेत. 11.शिकवणी केंद्रात कार्यरत असलेले भार्गव मोदी (44 वर्ष) हे रमेश मोदी यांच्या संस्थांमध्ये भागीदार आहेत 12. बिपिन मोदी (42 वर्ष) अहमदाबाद लायब्ररीत काम करायचे. आज K.G ते बारावी पर्यंत शालेय पुस्तकांचा पुरवठा करणाऱ्या एका पुस्तकाच्या प्रकाशन कंपनीत भागीदार आहेत. 1 ते 4 - पंतप्रधान मोदी यांचे भाऊ 5 ते 9 - मोदींचे चुलत भाऊ 10 - जगजीवन दास मोदी, काकांचा मुलगा *11 - भार्गव कांतीलाल, 12 - बिपिन हे जयंतीलाल मोदी (पंतप्रधानांचे सर्वात छोटे काका) यांचे पुत्र आह .. सर्वांना विनंती आहे की हा मेसेज प्रत्येक भारतवासी पर्यंत पोहचला पाहिजे... भाजपा नेते व भाजपा आय.टी.सेल वाले आणि दलाल भक्त मंडळी सतत टिमकी वाजवत असतात की म्हणे.... मोदी आपल्या नातेवाईकां समोर गवतसुद्धा घालत नाहीत. परंतु हे सर्व गेल्या कांही वर्षांत लक्षाधीश आणि काही अब्जाधीश कसे काय झाले आहेत
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सतीश सांगळे, यशवंत पाटील, राजेंद्र आंग्रे, बापूसाहेब राजहंस, राजेंद्र काळे,सुधीर सोनटक्के, सतीश तुंगे, जिजाभाऊ, संजय राजवाडकर, सागर पोवार, सुनील गिरकर, प्रवीण साखरे, अनिल काकडे आणि कुंदन तावडे या सर्वांनी वरील दावे व्हॉट्सऍप मेसेजच्या रुपात प्रचंड जोमाने व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विंनती केली.
पडताळणी:
व्हायरल मेसेजमधील प्रत्येक दाव्याची आम्ही स्वतंत्रपणे पडताळणी केली.
1. सोमाभाई मोदी (75 वर्ष)- सध्या गुजरातमधील रिक्रुटमेंट मंडळाचे अध्यक्ष?
सोमाभाई मोदी (Somabhai Modi) हे नरेंद्र मोदी यांचे मोठे भाऊ आहेत. व्हायरल मेसेजमध्ये ते गुजरातमधील रिक्रुटमेंट मंडळाचे अध्यक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र ते कुठल्या विभागाच्या रिक्रुटमेंट मंडळाचे अध्यक्ष आहेत, याविषयीची काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
गुजरातमध्ये रेल्वे, पोलीस (लोकरक्षक) आणि शिक्षण या तीन विभागांची रिक्रुटमेंट मंडळे आहेत. या रिक्रुटमेंट मंडळांच्या वेबसाइट्सवर कुठेही सोमाभाई मोदी यांचे नाव बघायला मिळत नाही.
2. अमृतभाई मोदी (72 वर्ष)- अहमदाबाद व गांधीनगरमधील सर्वात मोठे रिअल इस्टेट उद्योगपती?
अमृतभाई मोदी (Amrutbhai Modi) हे नरेंद्र मोदी यांचे मोठे भाऊ आहेत. रिअल इस्टेट वेबसाइट प्रॉपर्टी टायगरनुसार, गोदरेज प्रॉपर्टीज (159 प्रकल्प) आणि शोभा लिमिटेड (174 प्रकल्प) हे अनुक्रमे अहमदाबाद आणि गांधीनगरमधील सर्वात मोठे गृहनिर्माण प्रकल्प आहेत. गोदरेज प्रॉपर्टीजचे संस्थापक आदि गोदरेज (Adi Godrej) हे आहेत, तर शोभा लिमिटेडचे संस्थापक पीएनसी मेनन (PNC Menon) आहेत.
अमृतभाई मोदी हे अहमदाबाद आणि गांधीनगरचे सर्वात मोठे रिअल इस्टेट व्यावसायिक असते तर इंटरनेटवर त्यांच्याविषयी पुरेशी माहिती मिळाली असती. मात्र आम्हाला कुठल्याही रिअल इस्टेट वेबसाईटवर किंवा बातम्यांमध्ये त्यांच्याविषयी काही माहिती मिळाली नाही.
3. प्रह्लाद मोदी (64 वर्ष)- अहमदाबाद, वडोदरा येथे Hyundai, Maruti आणि Honda चे फोर व्हीलर चे शो-रूम?
प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) हे पंतप्रधानांचे धाकटे बंधू आहेत. अल्ट न्यूजच्या रिपोर्टनुसार अहमदाबादमध्ये मारुतीचे 12, ह्युंदाईचे 13 आणि होंडाचे 6 शोरूम आहेत, तर वडोदरामध्ये मारुती, ह्युंदाई आणि होंडाच्या शोरूमची संख्या आहे अनुक्रमे 5, 5 आणि 1. मात्र यापैकी कुठल्याही शोरुमची मालकी प्रह्लाद मोदी यांच्याकडे नाही.
4. पंकज मोदी (58 वर्ष)- रिक्रुटमेंट मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सोमा भाई सोबत कार्यरत?
पंकज मोदी (Pankaj Modi) हे नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू आहेत. जसे की आपण यापूर्वीच बघितले आहे की सोमाभाई कुठल्याही रिक्रुटमेंट मंडळाचे अध्यक्ष नाहीत. त्यामुळे पंकज मोदी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
5. भोगीलाल मोदी (67 वर्ष)- अहमदाबाद, सूरत आणि वडोदरा येथील रिलायन्स मॉलचे मालक?
भोगीलाल मोदी (Bhogilal Modi) हे पंतप्रधान मोदींचे चुलत भाऊ आहेत. रिलायन्स मॉल हा रिलायन्स रिटेलचा एक भाग आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रिलायन्सकडून फ्रेंचायजी दिली जात नाही. त्यामुळे भोगीलाल मोदी किंवा इतरही कुठल्याही व्यक्तीकडे स्वतःचा रिलायन्स मॉल असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
6. अरविंद मोदी (64 वर्ष)- रिअल इस्टेट आणि मोठ्या बांधकाम कंपन्यांकडे स्टीलचे कंत्राटदार?
अरविंद मोदी (Arvind Modi) हे देखील पंतप्रधान मोदींचे चुलत भाऊ आहेत. आम्हाला ते स्टीलचे कंत्राटदार असल्याबद्दलची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र हा दावा मुळातच बिनबुडाचा आहे. कारण या दाव्यात ना अरविंद मोदींच्या कंपनीचे नाव बघायला मिळतेय, ना त्यांच्या ग्राहक कंपन्यांचे.
7. भारत मोदी (55 वर्ष)- अहमदाबादमधील अगियारस पेट्रोल पंपाचे मालक?
भारत मोदी (Bharat Modi) हे पंतप्रधान मोदींचे चुलत भाऊ आहेत. आम्ही गुगल मॅपवर ‘अगियारस पेट्रोल पंप’ शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला या नावाचा कुठलाही पेट्रोल पम्प अस्तित्वात असल्याचे आढळून आले नाही. साहजिकच जो पेट्रोल पंपच अस्तित्वात नाही, त्याची मालकी भारत मोदींकडे असण्याचे कारणच नाही.
8. अशोक मोदी (51 वर्ष)- रिलायन्समध्ये भोगीलाल मोदीसोबत भागीदार?
आम्ही यापूर्वी पाचव्या दाव्याच्या पडताळणीमध्ये स्पष्ट केले आहे की स्वतः भोगीलाल मोदी यांच्याकडेच रिलायन्स मॉलची मालकी नाही. त्यामुळे अशोक मोदी (Ashok Modi) त्यांचे भागीदार असण्याचा प्रश्नच नाही.
व्हायरल पोस्टमधील बाकीच्या दाव्यांमध्ये त्यांची तथ्य पडताळणी करता यावी इतपत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांची पडताळणी केली जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ, रमेश मोदी यांच्या पाच शाळा आणि अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय महाविद्यालये असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र ना शाळांची अथवा महाविद्यालयांची नावे देण्यात आली आहेत ना पत्ते. उर्वरित बहुतांश दावे अशाच प्रकारचे आहेत. ज्यामध्ये पडताळणीयोग्य माहितीचा अभाव आहे.
हेही वाचा- भगवंत मान यांच्या कार्यालयातील भगतसिंगांचा फोटो ‘काल्पनिक’ असल्याचा अभ्यासकांचा दावा!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: अवघ्या काही वर्षांत मोदींचे नातेवाईक… […]
[…] हेही वाचा: मागच्या काही वर्षांतच मोदींचे नातेवा… […]
[…] हेही वाचा: अवघ्या काही वर्षांत मोदींचे नातेवाईक… […]