प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांना मानाचा ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी येऊन धडकली.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय ठरल्याबद्दल देशभरातून जावेद अख्तर यांचे अभिनंदन केलं जाऊ लागलं.
सोशल मिडीयावर मात्र याच वेळी एक दावा भन्नाट व्हायरल व्हायला लागला.
काय होता हा दावा?
व्हॉटसअपवरून आर.के. एनडीटीव्ही या नावाने फिरणाऱ्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला की, दोन दिवस होताहेत भारतीय मिडीयाने ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार पुरस्काराची बातमी देऊन, पण अजून देखील डॉकिन्स किंवा त्यांच्या संस्थेने यासंबंधीची अधिकृत घोषणा केलेली नाही.
हे असं न होण्यामागे एक किस्सा आहे. किस्सा असा की लंडनमधील एका ग्रुपने, जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार द्यावा यासाठी एक अभियान चालवलं. हे अभियान चालवणाऱ्या ग्रुपमध्ये अनेक भारतीयांचा समावेश होता. अख्तर यांचं नाव सुचविण्यासाठी या ग्रुपने डॉकिन्स यांना मेल केला. मेलच्या सीसीमध्ये जावेद अख्तर यांना देखील ठेवण्यात आलं.
मेल मिळाल्यानंतर अख्तर यांचा गोंधळ झाला आणि हे नामांकन नसून पुरस्कार जाहीर झाल्याचे समजून कुठल्याही औपचारिक घोषणेच्या आधीच त्यांनी ही बातमी माध्यमातील मित्रांना दिली. तुम्ही आता देखील जाऊन रिचर्ड डॉकिन्स आणि त्यांच्या संस्थेची वेबसाईट आणि सोशल मिडिया बघू शकता. तुम्हाला कुठलीही घोषणा सापडणार नाही. गतवर्षीच्या विजेत्याचे नाव मात्र बघायला मिळेल.
आता लंडनमधील याच ग्रुपकडून रिचर्ड डॉकिन्स यांच्या संस्थेवर जावेद अख्तर यांना पुरस्कार देण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. कारण तसं न झाल्यास ही अख्तर आणि समविचारी लोकांसाठी मोठी लाजिरवाणी गोष्ट ठरेल. त्यामुळे कदाचित पुढच्या दोन दिवसात औपचारिक घोषणा होईल देखील.
पडताळणी
जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार मिळाल्याची बातमी जवळपास सगळ्या महत्वाच्या न्यूज पेपर्सनी छापली होती. त्यामुळे ती खरी असण्याबाबत शंका नव्हतीच. परंतु ही जी नवीन थेअरी मांडण्यात येत होती, तिची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही शोधाशोध सुरु केली.
या प्रकरणावर आम्हाला सगळ्यात आधी जावेद अख्तर यांच्या पत्नी शबाना आझमी यांचं ट्वीट बघायला मिळालं. शबाना आझमी यांनी आपल्या ट्वीटमध्ये व्हायरल मेसेज मधील दावे धुडकावून लावलेत.
आमच्याकडे रिचर्ड डॉकिन्स यांच्याकडून ५ जून आणि सेंटर फॉर इन्क्वायरीचे अध्यक्ष रॉबिन ब्लुमार यांच्याकडून ६ जून रोजी आलेला पुरस्कारा संबंधीचा ईमेल असल्याचं आझमी यांनी सांगितलंय. शिवाय आपल्याला असे दावे करणाऱ्या लोकांची दया येत असल्याचं देखील त्यांनी म्हंटलय.
शबाना आझमी यांच्या ट्वीट नंतर आम्ही थेट रिचर्ड डॉकिन्स यांच्या ट्विटर हंडलवर जाऊन चेक केलं. त्यावेळी आम्हाला रिचर्ड डॉकिन्स यांचं ट्वीट मिळालं. या ट्वीटमध्ये डॉकिन्स यांनी म्हंटलंय की यावर्षीच्या रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराचे विजेते जावेद अख्तर आहेत आणि ही घोषणा करताना मला प्रचंड आनंद होतोय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की व्हॉटसअपवरून आर.के. एनडीटीव्ही या नावाने फिरविण्यात येत असलेला मेसेज फेक आहे. मेसेजमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांना कुठलाही आधार नाही. शिवाय या दाव्यांची जबाबदारी देखील कुणी घेत नाही. त्याचेवेळी जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार जाहीर झाल्याचे मात्र पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे व्हॉटसअपवरून पसरविण्यात येत असलेल्या या फेक दाव्यांना आम्ही ‘चेकपोस्ट मराठी’ वरच अडवतोय.
हेही वाचा: सुप्रीम कोर्टात सरकारची बाजू मांडताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी दिला चक्क फेक गोष्टीचा दाखला
[…] […]