Press "Enter" to skip to content

खरंय, ‘त्या’ मुलाच्या प्रामाणिकपणावर रजनीकांत खुश; पण व्हायरल पोस्ट मध्ये तथ्यांची गडबडी

“रजनीकांत च्या मांडीवर बसलेला हा मुलगा याच नाव महंमद युसूफ ‘ या मुलाला रस्त्यावर 50 हजार रुपये मिळाले. त्याने ते तडक पोलीस स्टेशन ला जाऊन जमा केले ,याची ही इमानदारी पाहून पोलीस अधिकाऱ्याने त्याला बक्षीस काय देऊ तुझी इच्छा काय आहे हे विचारले..

त्याने रजनीकांत यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली , पोलीस अधिकाऱ्याने त्याची इच्छा पूर्ण केली .
रजनीकांत याने त्या मुलाचा शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement

या ,जगात आज सुद्धा अशी ,इमानदारी जिवंत आहे.”

या माहितीसह ‘अनार्या भारतीय’ या फेसबुक अकाउंटवरून सिने अभिनेते रजनीकांत आणि त्यांच्या मांडीवर बसलेल्या एका मुलाचा फोटो पोस्ट केलाय. ही पोस्ट आतापर्यंत ४३ लोकांनी शेअर केली असून ३९२ लोकांनी लाईक केलीय.

https://www.facebook.com/photo.php?fbid=698272900964865&set=a.101273493998145&type=3&theater

कमेंट मधील माहितीप्रमाने आणि फोटोवरील लोगोवरून समजते की ही गोष्ट त्यांना हेलो नावाच्या ऍपवर सापडलीय.

हेलो, फेसबुक, ट्विटर, युट्युब यांसारख्या सोशल मीडियातून ही गोष्ट फिरताना दिसतेय .

https://facebook.com/poorguysayings/photos/a.881871421949958/1354280001375762/?type=3&__tn__=EH-R

Mohd Yasin of Tamil Nadu found Rs 50,000 on the road and handed it over to the police. When police asked him what they…

Posted by Poor Guy Sayings on Friday, 3 August 2018

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने या व्हायरल स्टोरीची पडताळणी करताना सर्वात आधी गुगलच्या रिव्हर्स इमेज सर्चचा वापर केला. त्यामध्ये वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर व्हायरल फोटोज आणि त्यासोबत लिहिलेल्या पोस्ट समोर आल्या.

काही पोस्ट २०२० मधल्या, काही २०१९ तर काही २०१८. एकाच गोष्टीचे एवढ्या वर्षांपासून फिरत असणारे ते फोटोज पाहून सर्वात पहिली पोस्ट किंवा बातमी नेमकी कधीची हे शोधण्यासाठी आम्ही अजून खोलात जाऊन रिसर्च केला.

या फोटोशी निगडीत असणारी सर्वात जुनी बातमी १५ जुलै २०१८ची तमिळ भाषेतील ‘द इंडियन एक्स्प्रेस’ची बातमी सापडली. याच विषयावरील अजून तीन बातम्या आम्हाला सापडल्या. त्या बातम्या गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला.

काय आहे बातम्यांत?

तमिळनाडूच्या एरोड जिल्ह्यातील कनीरवूथरकुलम या गावातील ‘मोहम्मद यासीन’ या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या मुलाला त्याच्या शाळेजवळच्या रस्त्यावर एक बॅग सापडली. त्याने ती उघडून पाहिली. त्यात खूप पैसे होते. अर्थात त्याच्या या वयात तो ते मोजू शकणार नव्हता परंतु ते पैसे खूप आहेत हे त्याच्या लक्षात आलं आणि स्वतःच्या गरीब परिस्थितीचा क्षणभरही विचार न करता शाळेत येऊन ती बॅग शिक्षिकेला दाखवली. शिक्षिका मोहम्मदला पोलिसांकडे घेऊन गेल्या आणि बॅग पोलिसांकडे सुपूर्द केली.

बातमी आसपासच्या भागात पसरली. अनेकांनी त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केलं. काहींनी त्या कुटुंबाला बक्षीस स्वरूपात मदत करण्याची तयारी दर्शवली. परंतु मोहम्मदच्या कुटुंबाने ती मदत नाकारली. जिल्ह्यातील ‘रजनी पीपल्स फोरम’ला याविषयी माहिती कळाली आणि ते लोक यासीनच्या घरी आले.

यासीनच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केलं, सत्कार केला आणि मदतीची तयारी दर्शवली. मोहम्मद ने कुठल्याही मदतीला नकार दिला आणि ‘मी रजनीकांत यांचा खूप मोठा चाहता आहे. मला त्यांना एकदा प्रत्यक्ष बघायचंय’ अशी इच्छा व्यक्त केली. फोरमच्या लोकांनी ही गोष्ट रजनीकांत यांच्या कानावर घातली.

सात वर्षाच्या या मुलाला रजनीकांत यांनी चेन्नईच्या आपल्या बोईस गार्डन मधील घरी येण्याचं निमंत्रण दिलं. या भेटीत त्यांनी मोहम्मदला एक सोन्याची साखळी भेट दिली.

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार रजनीकांत यांनी नंतर एका मुलाखतीत मोहम्मद यासीनच्या आई-वडीलांचं कौतुक केलं. त्यांनी एवढे चांगले संस्कार दिले म्हणूनच या कमी वयात त्या मुलात हा प्रामाणिकपणा आलाय. मी यासीनला मुलासारखा वाढवायला तयार असून त्याच्या संपूर्ण शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी मी घेत आहे.’ असंही त्या मुलाखतीत सांगितलं.

१५ जुलै २०१८ रोजी रजनीकांत यांच्या मांडीवर बसलेल्या मोहम्मद यासीनचा फोटो त्याच्या प्रामाणिकपणाच्या गोष्टीसह #MohammadYaasin वापरून ट्रेंड झाला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल गोष्ट खरी असल्याचं आढळलं. परंतु काही तथ्यात्मक गोष्टींमध्ये जरा फरक आढळला. जसे की ‘अनार्या भारतीय’ यांच्या पोस्ट मध्ये ‘महम्मद युसुफ’ असं लिहिलंय परंतु त्या मुलाचं खरं नाव ‘मोहम्मद यासीन’ असं आहे.

व्हायरल गोष्टीत तो थेट पोलिसांकडे गेला असं लिहिलंय, पण वस्तुस्थिती अशी की त्याने पैशाची बॅग त्याच्या शिक्षिकेकडे दिली होती. त्या मोहम्मदला घेऊन पोलिसांकडे गेलेल्या.

रजनीकांत यांना भेटण्याची इच्छा त्याने पोलिसांकडे नव्हे तर रजनी पीपल्स फोरमच्या कार्यकर्त्यांकडे बोलून दाखवली होती.

प्रामाणिकपणाचा गौरव म्हणून २०१८ची गोष्ट २०२० मध्ये व्हायरल होत असण्यात काहीच गैर नाही परंतु कुठलीही पोस्ट व्हायरल होत असताना तिच्या तथ्यांची पडताळणी करून मगच फॉरवर्ड बटनावर बोट जायला हवे. नाहीतर नकळतपणे आपणही फेक न्यूज स्प्रेडर बनण्याची शक्यता आहे.

व्हायरल गोष्टींची पडताळणी करून घेण्यासाठी आपण आम्हाला निःसंकोचपणे सांगू शकता.

‘फॅक्टचेक’साठी पाठवा

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा