‘खिळे असलेले रॉड आणि जखमा झालेला जवान’ असे काही फोटोज सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.
भारत चीन सीमेवरील वाढत्या तणावपूर्ण वातावरणात भारताने वीसहून अधिक जवान गमावले. चीनी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत लाकडांना खिळे लावले होते त्यामुळेच भारतीय सैनिकांना गंभीर दुखापत झाली आणि त्यात काही जवान शहीद झाले या बातम्या आपण मीडियातून ऐकल्या आहेत.
याचाच आधार घेत तिथली परिस्थिती दाखवण्यासाठी म्हणून हे असे फोटोज व्हायरल होत आहेत. सोबत काही मजकूर सुद्धा आहे.
‘चेकपोस्ट मराठी’ कडे पडताळणीसाठी आलेल्या इमेज मध्ये लिहिलंय ‘चीन का समान खरीदने से पहले देश के रक्षक (फौजी भाई) के जख्मो को याद रखना और फिर निर्णय लेना की मुझे क्या करना चाहिये’
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने वाचकांच्या विनंतीमुळे पडताळणीस सुरुवात केली. सर्वात आधी आम्ही आलेली इमेज रिव्हर्स सर्च करून पाहिली तेव्हा लक्षात आलं की या इमेजेस दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने व्हायरल होत आहेत.
जखमी सैनिक:
ट्विटरवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ‘अजित डोवाल’ यांच्या अकाऊंटवर सुद्धा आम्हाला त्या जखमी जवानाचा फोटो सापडला. त्यावर काय लिहिलंय पहा:
‘आपल्या स्वातंत्र्याची किंमत,शारीरिक जखमा आपल्याला दिसतील, त्या बऱ्या सुद्धा होतील पण मानसिक धक्क्याचं काय? त्यांना माहित होतं हे असं होईल पण तरीही त्यांनी हा मार्ग स्वीकारला कारण आहे त्यांचं देशावरचं प्रेम. इथून पुढे जेव्हा कधी सैनिकांविषयी आपण एक शब्द जरी बोलणार असाल तर आधी त्यांचा त्याग आठवा मग बोला.’
अजित डोवाल यांच्या सारखा व्यक्ती हे शेअर करतोय म्हणजे कुणीही विश्वास ठेवेल पण हे हँडल स्वतः अजित डोवाल याचं ऑफिशियल हँडल नसून ते त्यांच्या चाहत्यांनी बनवलंय हे @AjitKDoval_Fanपाहून आणि वेरीफिकेशनचा ब्लू टॅग नसल्याचं पाहून आमच्या लक्षात आलं.
पुन्हा शोध चालू झाला आणि रिव्हर्स ईमेज सर्च मध्ये लक्षात आलं की हा फोटो आताचा नसून २०१६चा आहे. थायलंडमधील मलय भाषेत असणाऱ्या ‘मलय रिपोर्ट’ या ब्लॉगवर आम्हाला हे फोटोज सापडले.
यावर काय लिहिलंय हे जेव्हा आम्ही गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने जाणून घेण्याचा प्रत्यत्न केला. तेव्हा ते फोटोज थायलंडच्या सैनिकांचे असून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे असल्याचं दिसत आहे. यापलीकडे फारशी माहिती मिळाली नाही परंतु त्या जखमा कुठल्या खिळे असणाऱ्या रॉडच्या नसून त्या काही ज्वलनशील पदार्थ अंगावर आल्याने झाल्या आहेत हे दिसून येतंय.
खिळे असणारे रॉड:
दुसरी खिळे असणाऱ्या रॉड्सची इमेज आम्हाला मिळाली अजय शुक्ला यांच्या ट्विटर अकाऊंटवर. अजय शुक्ला हे रिटायर्ड कर्नल असून सध्या बिझनेस स्टँडर्ड सोबत पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.
अजय शुक्ला याचंच हे ऑफिशियल अकाऊंट असलं तरीही त्यांनी शेअर केलेल्या खिळे असणाऱ्या रॉड्सच्या फोटोला भारतीय किंवा चीनी सैन्याने दुजोरा दिलेला नसल्याचं BBC ने सांगितलाय.
इंडिया टीव्हीने सुद्धा आपल्या एका बातमीत असं म्हंटलंय की ‘आम्ही जेव्हा सैन्य मुख्यालयाकडे या खिळे असणाऱ्या रॉडच्या सत्यतेची चौकशी केली तेव्हा त्यांनी तो फोटो फेक असल्याचं सांगितलंय’
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये लक्षात आलं की जखमी सैनिकाचा फोटो २०१६ सालचा असून मुळात त्यातील व्यक्ती भारतीय नाही. ‘मलय रिपोर्ट’ ब्लॉगनुसार तो थायलंडचा सैनिक असण्याची शक्यता आहे.
खिळे असणाऱ्या रॉड बद्दल भारतीय किंवा चीनी सैन्याने काहीच ऑफिशियल दुजोरा दिलेला नाही उलट इंडिया टीव्ही सोबत बोलताना तो फोटो फेक असल्याचं सैन्य मुख्यालयातून सांगितलंय. त्यामुळे केवळ अजय शुक्ला यांच्या म्हणण्यावरून ते चीनी सैनिकांनी वापरलेले रॉड आहेत असं ठामपणे म्हणनं अयोग्य ठरेल.
हेही वाचा:
‘जग भारताच्या बाजूने’ भासविण्यासाठी भाजप नेते घेताहेत फेक ट्वीटर अकाऊंट्सचा आधार!
Be First to Comment