Press "Enter" to skip to content

पोलिसांच्या ताब्यातील विनेश आणि संगीता फोगट यांचा हसतानाचा व्हायरल फोटो एडिटेड!

दिल्लीतील जंतर-मंतर येथून नवीन संसदेसमोर मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक, संगीता फोगट आणि बजरंग पुनिया यांचा समावेश आहे.

Advertisement

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात कारवाईसाठी विनेश फोगट, साक्षी मल्लिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडू दिल्लीतील जंतर-मंतरवर विरोध प्रदर्शन करताहेत. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून हे आंदोलन सुरु आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे.

आपल्या मागण्यांकडे लक्ष्य वेधण्यासाठी खेळाडूंकडून संसदेसमोर ‘महिला पंचायत’ बोलावण्यात आली होती. खेळाडू या महिला पंचायतीसाठी संसदेकडे कूच करत असताना दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करत कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं. विनेश फोगट, साक्षी मलिक दिल्ली पोलिसांकडून अक्षरशः फरफटत नेलं गेलं.

दिल्ली पोलिसांकडून खेळाडूंना दिल्या जात असलेल्या वागणुकीबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येतोय. मात्र त्याचवेळी विनेश आणि संगीता फोगट यांचा दिल्ली पोलिसांच्या गाडीतील एक फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या फोटोमध्ये विनेश आणि संगीता हसत असल्याचे बघायला मिळतेय. या फोटोच्या आधारे कुस्तीगीर खेळाडू नाटक करत असल्याचा दावा केला जातोय.

अर्काइव्ह

दरम्यान, विनेश आणि संगीता यांचा पोलिसांच्या गाडीतील हसऱ्या चेहऱ्यासह दिसणारा फोटो एडिटेड असल्याची बाब समोर आली आहे. मूळ फोटोमध्ये विनेश आणि संगीता या दोघींच्याही चेहऱ्यावरील ताण स्पष्टपणे बघायला मिळतोय. या फोटोशी छेडछाड करण्यात आली असून एडिटिंगच्या साहाय्याने विनेश आणि संगीता हसत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला गेलाय.

कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajrang Punia) देखील ट्विटरवरून संगीता आणि विनेश फोगट यांचा मॉर्फ फोटो व्हायरल केल्याबद्दल “आयटी सेल”शी संबंधितांना फटकारले आहे. ज्या कुणाकडून हा ‘फेक फोटो’ पोस्ट केला जाईल, त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जाईल, असा इशारा देखील बजरंग पुनियाकडून देण्यात आला आहे.

बजरंग पुनियाने आपल्या ट्विटमध्ये मूळ फोटो देखील पोस्ट केलाय. हाच फोटो दैनिक भास्करच्या वेबसाईटवरील कुस्तीगिरांवरील दिल्ली पोलिसांच्या कारवाई संदर्भातील बातमीमध्ये देखील बघायला मिळतोय.

दरम्यान, दिल्ली पोलिसांकडून फरफटत नेत ताब्यात घेतलेल्या विनेश फोगट, साक्षी मलिक आणि संगीता फोगट यांची सुटका करण्यात आली आहे. बजरंग पुनियासह इतर अजूनही पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती विनेश फोगटने माध्यमांशी बोलताना दिली आहे.

हे ही वाचा- नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींच्या नंतर नथुराम गोडसेच्या पुतळ्यास हार घातला?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा