Press "Enter" to skip to content

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयएएस अधिकारी आरती डोगरा यांचे दर्शन घेतले?

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये नरेंद्र मोदी एका महिलेचे दर्शन घेताना दिसताहेत. दावा केला जातोय की फोटोत दिसणारी महिला आयएएस अधिकारी आरती डोगरा (Aarti Dogra) असून त्या काशी विश्वनाथ मंदिर जीर्णोद्धाराच्या प्रमुख वास्तुविशारद आहेत.

Advertisement

भाजपच्या प्रवक्त्या शायना एन सी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता आम्हाला अमर उजालाच्या वेबसाईटवर 16 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला. बातमीनुसार फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या दिव्यांग महिलेचे दर्शन घेताना दिसताहेत, त्या आयएएस अधिकारी आरती डोगरा नसून वाराणसीच्या सिगरा येथील रहिवासी शिखा रस्तोगी (Shikha Rastogi) आहेत.

source: Amar Ujala

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो त्यांच्या वाराणसी दौऱ्यादरम्यानचा आहे. काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनासाठी वाराणसी येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची धाम संकुलात एका दिव्यांग महिलेशी भेट झाली. सदर महिलेला पंतप्रधान मोदींचे दर्शन घ्यायचे होते. ती ज्यावेळी पंतप्रधानांचे दर्शन घेण्यासाठी खाली वाकली, त्यावेळी पंतप्रधान मोदींनी तिला तसे करण्यापासून थांबवत स्वतःच तिचे दर्शन घेतले.

आरती डोगरा कोण आहेत?

आरती डोगरा (Aarti Dogra) मूळच्या उत्तराखंडच्या रहिवाशी आहेत. त्या 2006 सालच्या बॅचच्या राजस्थान कॅडरच्या आयएएस अधिकारी आहेत. केवळ 3 फूट 2 इंच उंची असलेल्या आरती डोगरा यांनी बुटकेपणामुळे निर्माण झालेल्या समस्यांना धैर्याने तोंड देत 2006 पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षेत यश मिळवले होते.

Source: Jansatta

सध्या त्या राजस्थानमध्ये कार्यरत असून मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्या विशेष सचिव आहेत. आरती डोगरा अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान राहिलेल्या आहेत. त्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.

काशी विश्वनाथ धामचे मुख्य वास्तुविशारद कोण आहेत?

ज्याप्रमाणे व्हायरल फोटोतील महिला आरती डोगरा नाहीत, त्याचप्रमाणे त्या काशी विश्वनाथ धामच्या मुख्य वास्तुविशारद असल्याचा दावा देखील चुकीचा आहे. काशी विश्वनाथ धामचे मुख्य वास्तुविशारद पद्मश्री डॉ. बिमल पटेल (Dr. Bimal Patel) आहेत. नवी दिल्ली येथे उभारण्यात येत असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे डिझाईनही डॉ.पटेल यांनीच तयार केले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिव्यांग महिलेचे दर्शन घेत असतानाचा फोटो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होतोय. फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिसणारी दिव्यांग महिला आयएएस अधिकारी आरती डोगरा नसून वाराणसीच्या रहिवासी शिखा रस्तोगी आहेत.

आरती डोगरा या काशी विश्वनाथ धामच्या मुख्य वास्तुविशारद नसून त्या राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. काशी विश्वनाथ धामचे मुख्य वास्तुविशारद पद्मश्री डॉ. बिमल पटेल आहेत.

हेही वाचा- नरेंद्र मोदी नीता अंबानींना झुकून अभिवादन करत असल्याचा फोटो एडिटेड!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा