Press "Enter" to skip to content

दारावर एलईडी बल्ब विकणारे आधार डिटेल्स मागून लुटत आहेत लोकांचा पैसा?

दारोदारी जाऊन केवळ दहा रुपयांत एलईडी बल्ब विकणारे सेल्समन आधार डीटेल्स मागून, बायोमेट्रिक मशीनवर बोटांचे ठसे घेत आहेत. या माहितीच्या आधारे आपल्या बँक खात्यातील पैसा लंपास होतोय. या चोरांपासून सावध रहा असे सांगणारे ‘नॅशनल क्राईम इंटेलीजंस एजन्सी’चे लेटरहेड (NCIE letterhead) सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Advertisement

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुर्यकांत कांबळे यांनी व्हॉट्सऍपवर व्हायरल होणारे हे पत्र आमच्या निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

शेअरचॅट या ऍपवर देखील अनेकांनी हे पत्रक शेअर केल्याचे रिव्हर्स इमेज सर्च मध्ये लक्षात आले.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’कडे हे पत्रक आल्यानंतर प्रथमदर्शनी काही गोष्टी खटकल्या. जशा की हे ‘नॅशनल क्राईम इंटेलीजंस एजन्सी’ अशी काही संस्था असल्याचे आजवर माहितीत नव्हते. जर ही राष्ट्रीय संस्था आहे तर जनहितार्थ सूचना देणारे परिपत्रक (NCIE letterhead) टाईप करण्याऐवजी हस्तलिखित का असेल?

याच शंकांचे निरसन करण्यासाठी आम्ही काही कीवर्ड्सच्या आधारे गुगलसर्च केले असता या संस्थेच्या वेबसाईटवर आम्ही पोहचलो. यांच्या ‘अबाउट’ पेजवर त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ‘सदर संस्था NGO म्हणून रजिस्टर आहे. ही काही तपास यंत्रणा नसून त्यांचा कुठल्याही राष्ट्र, राज्य, पोलीस किंवा गुन्हे अन्वेषण विभागाशी संबंध नाहीये.’

Source: NCIE website

संस्था जरी शासकीय नसली तरी त्यांनी केलेले दावे खरे आहेत का हे तपासण्यासाठी विविध कीवर्ड्सचा आधार वापरून सर्च केले. त्यातही अशा कुठल्या LED बल्ब विक्रेत्याने गंडा घातल्याची बातमी कुठे आढळली नाही.

आधार डीटेल्सने पैसे चोरू शकतात?

या एकंदर प्रकरणात असा प्रश्न उपस्थित राहतो की आधार कार्डच्या माहितीच्या आधारे बॅंकमधील पैसे काढले जाऊन शकतात का? यावर आधार कार्ड पुरवणाऱ्या UIDAI च्या वेबसाईटवर चौकशी केली. यात त्यांनी लिहिले आहे की जसे केवळ अकाऊंट नंबर माहिती असणारा व्यक्ती आपल्या खात्यातून पैसे काढू शकत नाही, त्याच प्रमाणे केवळ आपला आधार क्रमांक माहिती असणारा व्यक्ती आपल्या खात्यातून पैसे काढू शकत नाही. जर तुम्ही मोबाईलवर आलेला ओटीपी किंवा आपला नेट बँक पासवर्ड अथवा हाताचे किंवा डोळ्याचे स्कॅन म्हणजे बायो मेट्रिक डीटेल्स देत नाहीत तोवर पैसे काढले जाऊ शकत नाही. याचाच अर्थ कुणाही व्यक्तीस आपल्या हाताचे ठसे देऊ नयेत, गरज पडेल तेव्हा विश्वासार्ह व्यक्तींनाच हे डीटेल्स द्यावेत.

वस्तुस्थिती:

सदर एनसीआई परिपत्रक (NCIE letterhead) शासकीय संस्थेकडून आलेला सल्ला म्हणून व्हायरल होताना दिसत आहे. ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये ती संस्था शासकीय नसून एक NGO असल्याचे समजले. यातील दावे खरे ठरवण्यासाठी कुठलीही अशी बातमी आढळली नाही परन्तु हे मात्र खरे की जर आपण एखाद्यास आपले बायोमेट्रिक डीटेल्स दिले तर आपले पैसे चोरी होऊ शकतात.

हेही वाचा: ऑनलाईन शिक्षणाकरिता केंद्र सरकार विद्यार्थ्यांना टॅबचे मोफत वाटप करणार?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा