कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून शिक्षण सुद्धा ऑनलाइन घ्यावे लागत आहे. त्यासाठीच मोदी सरकार (Modi government) ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ३ महिन्याचा इंटरनेट रिचार्ज मोफत (free internet data) देत आहे असल्याचे मेसेजेस व्हॉट्सऍपवर जोरदार व्हायरल होतायेत.
‘भारत सरकार द्वारा Online पढ़ाई के लिए सभी भारतीय यूजर्स को 3 महीने वाला Recharge Plan फ्री में दिया जा रहा है।
अगर आपके पास Jio , Airtel या Vi का Sim हैं तो आप इस ऑफर का लाभ उठा सकते है ।मैंने फ्री रिचार्ज पाया, आप भी कर सकते हो।
नोट:- नीचे दी गई लिंक पर क्लिक करके अपना फ़्री रीचार्ज प्राप्त करें’
अशा मजकुरासह काही लिंक्स त्या मेसेजमध्ये आहेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक साहेबराव माने, अनिल कचरे, निलेश भोसले आणि राजेंद्र भडके यांनी सदर मेसेज निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
- ‘चेकपोस्ट मराठी’ने या आधी देखील अशा प्रकारच्या फ्री रिचार्ज, फ्री गिफ्ट्सच्या मेसेजेसची पोलखोल केली आहे त्यामुळे हे मेसेज पाहताक्षणी लक्षात आले की सदर मजकूर त्या लिंकवर क्लिक करावे यासाठीचा सापळा आहे.
- सरकारी स्किम्स खाजगी वेबसाईटवरून का मिळतील? सरकारी वेबसाईट शक्यतो ‘.gov.in’ अशा एक्स्टेंशनची असते. व्हायरल मेसेज मध्ये ‘.xyz’ असे भलतेच एक्स्टेंशन आहे.
- तरीही आपण जर यावर क्लिक केले तर जी वेबसाईट ओपन होईल त्यावरही भारत सरकारच्या अधिकृत मंत्रालय, लोगो, GR अशा कशाचाही उल्लेख मिळणार नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असला म्हणजे ती अधिकृत सरकारी वेबसाईट होत नाही.
- साईट ओपन केल्यानंतर आपण कोणत्या कंपनीचे सिमकार्ड वापरत आहात हे विचारले जाईल. त्यात समजा आपण ‘जिओ’ वर क्लिक केले तर आपणास आपला फोन नंबर आणि राज्य याविषयी विचारले जाईल. हाच खरा सापळा आहे. यातून कुणा भलत्या एजन्सीच्या हातात आपला मोबाईल नंबर आणि राहण्याच्या जागेविषयीची माहिती पोहचली आहे.
- ही माहिती विविध टेलीमार्केटिंग कंपन्यांना विकली जाते. मग आपल्या फोनवर लोन घ्या, क्रेडीट कार्ड घ्या अशा कैक ऑफरचे सातत्याने फोन चालू होतात. भलत्या सलत्या जाहिरातींचे मेसेज आणि लिंक्स येऊ लागतात.
- आपण त्यात आपली माहिती भरून क्लिक कराल तेव्हा थेट मुकेश अंबानी यांचा फोटो असलेले पेज उघडेल. कुठल्याही सरकारी वेबसाईटवर कुणा उद्योगपतीचा एवढ्या स्पष्टपणे प्रचार केला जाणे जरा अशक्य आहे.
- यावर लिहिलेले असेल की रिचार्ज मिळवण्यासाठी १० ग्रुप्सवर हा मेसेज फॉरवर्ड करा. आपण या चोरांना नकळतपणे मदत करत मनोभावे १० ग्रुप्सवर तो मेसेज फॉरवर्ड कराल.
- तरीही सरतेशेवटी आपला फुकटाचा रिचार्ज काही होणार नाही. कारण स्वतः सरकार आपल्या PIB या संस्थेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगत आहे की आम्ही असली कुठलीही स्कीम काढलेली नाहीये.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत मोदी सरकार (Modi government) ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ३ महिन्याचा रिचार्ज मोफत (free internet data) देत असल्याचे दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. आपली वैयक्तिक माहिती टेलीमार्केटिंग कंपन्यांना विकण्यासाठीचा हा डाव आहे. अशा वेबसाईट ‘फिशिंग’साठी देखील वापरल्या जातात. फिशिंग म्हणजे आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने आपली आर्थिक फसवणूक करण्यासाठी टाकलेले जाळे.
हेही वाचा: ‘फ्लिपकार्ट’च्या ऍनिव्हर्सरी निमित्त फ्री गिफ्ट मिळवण्याची संधी लिहिलेल्या लिंकवर क्लिक करू नका!
[…] त्यावेळी देखील या दाव्याची सविस्तर पोलखोल केली […]