Press "Enter" to skip to content

‘डॉ. आयेशा शेवटी कोरोना विरुद्धची लढाई हरली’ व्हायरल पोस्ट्स मागचे सत्य काही वेगळेच!

कोरोना विषाणू एवढाच, किंबहुना त्याहून मोठ्या प्रमाणात कोरोना बाबतच्या दाव्यांचा, फेकन्युजचा संसर्ग आपल्याला झालाय असे सतत जाणवत राहते. ताजं उदाहरण म्हणजे ‘डॉ. आयेशा शेवटी कोरोना (dr ayesha corona) विरुद्धची लढाई हरली’ सांगणाऱ्या सोशल मिडीयातल्या व्हायरल पोस्ट्स.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होताहेत.

‘ही आहे डॉक्टर आयेशा… काही महिन्यापूर्वी मेडिकलचा अभ्यास संपून डॉक्टर बनली होती… तिची ड्युटी कोविड वॉर्डमध्ये लागली होती… अनेकांचा इलाज करता करता तीला स्वतःलाच covid-19 ने घेरलं… संक्रमण खूप जास्त झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलं…

Advertisement

त्या क्षणाला तिने ट्विट केलं,” मी कोविडला खूप हलक्यात घेतलं म्हणून मला व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलंय.. माझं स्माईल आणि मला लक्षात ठेवा… सर्वांचे मैत्री साठी आभार… तुम्हाला खूप खूप मिस करेन… सिरीयस व्हा आणि या आजाराचे गांभीर्य ओळखा… सर्वांना प्रेमाचा नमस्कार… बाय”

तिने काळ आला आहे हे ओळखले होते… परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला होता… परंतु तिने व्हेंटिलेटरवरून दिलेला संदेश खूप काही सांगून जातो.. आज फ्रेंडशिप डे ला तिने रक्ताचं कुठलंही नातं नसलेल्यांची मैत्री निभावली आणि मैत्री काय असते हे जगाला दाखवून दिलं…बघा …काही पटतय का ते…

रफीक शेख यांच्या हवाल्याने फेसबुक युजर अभिजित घाडगे यांनी ही पोस्ट शेअर केलीय.

Dr Ayesha fb viral post3
Source Facebook

हा स्मित हास्य करणाऱ्या तरुणीचा हॉस्पिटल बेडवरील फोटो आणि आणखी एक फोटो घेऊन अनेकांनी साधारण याच आशयाच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्ट्सना शेकडो लोकांनी शेअर केलेय.

Dr Ayesha fb viral post1

मंगेश गायकवाड यांनी शेअर केलेल्या पोस्टला २९६ कमेंट्स, ७५५ लाईक आणि १३७ शेअर्स आहेत. अशीच दुसरी एक पोस्ट ‘मुंबई महाराष्ट्र लाइव्ह’ या फेसबुक पेजवरील. ही सुद्धा आतापर्यंत ११४ लोकांनी शेअर केलीय.

Dr Ayesha fb viral post2

पडताळणी:

ही तरुणी नेमकी कोण आहे? काय घडलंय तिच्यासोबत? दावे खरे आहेत का? यांची शहानिशा करण्यासाठी ‘चेकपोस्ट मराठी’ने गुगल रिव्हर्स ईमेज सर्चचा आधार घेतला.

या सर्चमध्ये आम्हाला हिंदी इंग्रजीतील माध्यमांनी या प्रकरणाच्या बातम्या केल्याचे दिसले आणि प्रकरण समजणे सोपे झाले. मुळात हे फॅक्टचेक आम्ही स्वतः नव्हे तर ट्विटर युजर्सनेच केलंय असं म्हणावं लागेल. पाहूयात घटनाक्रम.

डॉ. आयेशाचे मूळ ट्विट:

३१ जुलै २०२० ला नमस्कार मित्रांनो, मी कोविड- १९ चा सामना करू शकत नाही आणि आता कधीही व्हेंटिलेटरवर जाऊ शकते. माझे हसणे, आणि मला कायम स्मरणात ठेवा. कोरोना व्हायरस पासून सुरक्षित रहा. अशा आशयाची पोस्ट @Aisha_must_sayz या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आली. त्यानंतर अनेकांनी डॉ. आयशाच्या मृत्यूबद्दल माहिती देणाऱ्या भावनिक व श्रद्धांजलीपर पोस्ट शेअर केल्या.

Aisha main tweet
Source: Twitter

डॉ. आयेशा व्हेंटीलेटरवर:

त्यानंतर पुढचे ट्विट त्याच अकाऊंटवरून आले की ‘आयेशा साठी प्रार्थना करा. जर तिच्या मित्रांनी आणि कुटुंबाने जास्तीत जास्त प्रार्थना केली तर ती बरी होऊ शकेल.’ या वाक्यांसह व्हेंटीलेटर लावलेल्या डॉ. आयेशाचा फोटो.

या ट्वीट्सनंतर तिचा मृत्यू झाल्याचे समजले आणि अनेक नेटीझन्स हळहळले. हसऱ्या चेहऱ्याचा फोटो असणारे ट्विट रिट्विट करत अनेकांनी डॉ. आयशाच्या (dr ayesha corona) मृत्यूबद्दल भावनिक व श्रद्धांजलीपर पोस्ट शेअर केल्या. यात NDTV च्या पत्रकार निधी राजदान यांचाही समावेश आहे (अर्थात त्यांनी सत्य समोर आल्यावर आपले ट्विट डिलीट केले आणि त्याबद्दल स्पष्टीकरण सुद्धा देऊ केले.)

ट्विटर युजरनेच केले फॅक्टचेक:

‘पायरेटेड डाक्टरनी’ असं युजरनेम असणाऱ्या व्यक्तीने डॉ. आयेशाच्या (dr ayesha corona) सर्व ट्विट्सचा पुराव्यानिशी समाचार घेतलाय. गूगल रिव्हर्स इमेज सर्चचा वापर करून वरील पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध देखील केले.

फोटोतील मुलगी कदाचित आयशा नसून @Aisha_must_sayz या अकाउंटवरील माहितीनुसार ती दक्षिण आफ्रिकेत राहत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र संबंधित पोस्टमधील फोटोतील रुग्णालयाच्या बेडशिटरील लोगोद्वारे हा फोटो तेलंगणा राज्यातील लाईफ हॉस्पिटल मधला असल्याचे या ट्विटर वापरकर्त्याने केलेल्या पडताळणीमध्ये समोर आले.

या सर्व प्रकारानंतर ट्विटर युजर्सनी आयेशा हँडल चालवणाऱ्या व्यक्तीला भयंकर ट्रोल केले. त्यामुळे त्याच अकाऊंटवरून पुन्हा नवे ट्विट आले. यामध्ये आयेशा सोबत तिच्या कुटुंबियांचा फोटो होता आणि ‘आमचे कुटुंब तिच्या जाण्याने दुःखी आहे आणि तुम्ही लोक खुशाल माझ्या बहिणीची थट्टा करताय’ या आशयाचे कॅप्शन होते.

Dr Aisha with her family without PPE or Mask

या फोटोने तर शिक्कामोर्तबच केले की तिला कोव्हीड झाल्याचा दावा फेक आहे. कारण कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णाजवळ तिच्या कुटुंबियांना पीपीई कीट, मास्क शिवाय जाण्याची परवानगी मिळणे अशक्य आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये ट्विटर युझर्सने स्वतः केलेले फॅक्टचेक समोर आले, ज्याची सत्यता आम्ही आमच्या पद्धतीने पुन्हा एकदा पडताळून पाहिली, तेव्हा हे सिद्ध झालं की डॉ. आयेशा नावाने चालवण्यात येणारं आणि आता सध्या डिलीट झालेलं अकाऊंट फेक आहे.

हेही वाचा: शरीरातील ऑक्सिजन मोजण्याचा दावा करणारे ऍप्स कितपत विश्वासार्ह?

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा