पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा पुरावा म्हणून एका बातमीचे कात्रण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जातोय की मोदी सरकारकडून हे कात्रण गायब करण्यात आलं होतं. महत्प्रयासाने हे कात्रण मिळविण्यात आलंय.
काय आहे या कात्रणात?
कात्रणात दोन वेगळ्या बातम्या आहेत. पहिल्या बातमीनुसार गृहमंत्री नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर कधीच बनणार नसल्याचा दावा केला असल्याचं सांगितलं जातंय तर दुसऱ्या कात्रणानुसार हिंदूंचा विश्वास जिंकण्यासाठी मुस्लिम आणि शेतकऱ्यांना संपवणं गरजेचं होतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हण्टलं असल्याचा दावा केला जातोय. दोन्ही बातम्यांमध्ये अनुक्रमे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो देखील आहे.
पडताळणी:
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात असलेलं हे कात्रण खरं नसून एडिटेड आहे, हे अगदी बघताक्षणी लक्षात येण्यासारखं आहे. तरी देखील अनेक युजर्सकडून हे कात्रण शेअर केलं जात असल्याने आम्ही मूळ कात्रण शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी रिव्हर्स सर्चची मदत घेतली.
आम्हाला ‘बीबीसी हिंदी’च्या वेबसाईटवर दि. २८ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध बातमी मिळाली. या बातमीत सध्या व्हायरल होत असलेलं कात्रण मिळालं. ‘बीबीसी’च्या बातमीनुसार सध्या अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नावाने जो दावा केला जातोय, तोच दावा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश आणि मुलायम सिंह यांच्या नावाने देखील व्हायरल झाला होता.
सहाजिकच लक्षात येण्यासारखी गोष्ट अशी की एकच खोटा दावा अमित शहा आणि अखिलेश यादव यांच्या नावाने फिरवला जातोय. फक्त यापूर्वी अमित शहा यांच्या ठिकाणी अखिलेश यादव आणि नरेंद्र मोदींच्या ठिकाणी मुलायम सिंह यादव यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करण्यात आला होता आणि बातमीच्या हेडलाईनमध्ये त्यानुसार बदल करण्यात आला होता.
अखिलेश यादव यांच्या नावाने राम मंदिराच्या बांधकामासंदर्भात केल्या गेलेल्या आणि सध्या अमित शहा यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या दाव्याची पडताळणी ‘चेकपोस्ट मराठी’ने यापूर्वीच केलेली आहे. ती आपण येथे वाचू शकता.
यापूर्वी मुलायम सिंह यांच्या नावाने शेअर केल्या गेलेल्या आणि सध्या नरेंद्र मोदींच्या व्हायरल होत असलेल्या दाव्याच्या शोध घेतला असता आम्हाला ‘अमर उजाला’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातमी मिळाली. या बातमीनुसार मुलायम सिंह यांनी १९९० साली अयोध्येत करण्यात आलेल्या गोळीबाराविषयी वक्तव्य केलं होतं. त्यानुसार ‘गोळीबार केला नसता तर मुस्लिमांचा भरवसा तुटला असता, असं मुलायम सिंह यांनी म्हंटलं होतं.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने व्हायरल होत असलेले कात्रण एडिटेड आहे. यापूर्वी देखील हेच कात्रण अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्या नावाने व्हायरल करण्यात आले होते. याच कात्रणाच्या हेडिंग आणि फोटोमध्ये बदल करून सध्या ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाने व्हायरल करण्यात येत आहे.
हे ही वाचा- अरविंद केजरीवाल यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी नमाज पढले सांगणाऱ्या भाजप समर्थकांच्या पोस्ट्स फेक!
Be First to Comment