Press "Enter" to skip to content

सपा नेत्याच्या मुलीने युक्रेनमध्ये अडकल्याचे नाटक करत बनवला व्हिडीओ? आता पोलिसांनी केली अटक?

युक्रेनमध्ये अडकलेल्या आणि मदतीचे आवाहन करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होताहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये एक मुलगी युक्रेनमधील भयावह परिस्थितीचे वर्णन करतेय आणि केवळ भारत सरकारच या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढू शकते, असा आशावाद व्यक्त करतेय.

Advertisement

भाजप दिल्लीचे सोशल मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडिओतील मुलगी समाजवादी पक्षाचे नेते महेंद्र यादव यांची मुलगी वैशाली यादव (Vaishali Yadav) असून तीने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी आपल्या घरात बसूनच हा व्हिडीओ रेकॉर्ड केला असल्याचे जिंदल यांनी म्हंटलेय.

अर्काइव्ह

याच संदर्भाने अजून एक फोटो व्हायरल होतोय, ज्यामध्ये वैशाली यादव हिला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली असल्याचा दावा केला जातोय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओ संदर्भात केल्या जात असलेल्या दाव्यांच्या पडताळणीसाठी किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता बीबीसी हिंदीचा रिपोर्ट बघायला मिळाला. रिपोर्टनुसार 25 वर्षीय वैशाली युक्रेनमधील इव्हानो फ्रँकिव्हस्क नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसची विद्यार्थिनी आहे. वैशाली यादव हरदोई जिल्ह्यातील तेरा परसौली ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. वैशालीचे वडील महेंद्र यादव हे हरदोई जिल्ह्याचे माजी ब्लॉक प्रमुख होते.

वैशालीने घरी बसून युक्रेनमध्ये अडकल्याचे नाटक केले?

वैशालीने घरी बसून व्हिडीओ रिकॉर्ड करत युक्रेनमध्ये अडकल्याचे नाटक केल्याचे दावे चुकीचे आहेत. हरदोईचे पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. ज्या मुलीविषयी बोलले जात आहे, ती सध्या रोमानियात असून तिने मदतीसाठी व्हिडीओ जारी केला होता. तीला देशात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पोलिसांकडून या संदर्भात कुठलीही कारवाई करण्यात आल्याचे दावे चुकीचे आहेत, असे राजेश द्विवेदी यांनी 2 मार्च रोजी एबीपी गंगाशी बोलताना सांगितले होते.

दरम्यान, वैशाली यादव (Vaishali Yadav) भारतात सुखरूप परतल्याची माहिती समोर येतेय.

पोलिसांनी अटक केलेल्या फोटोतील तरुणी कोण?

व्हायरल फोटो नेमका कुठला आणि फोटोतील तरुणी कोण हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला राजस्थानच्या नागौर पोलिसांचे एक ट्विट मिळाले. ट्विटनुसार, पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत एका मुलीला अटक केली होती. सदर तरुणीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिच्याकडे शस्त्र होती.

अमर उजालाच्या बातमीनुसार नागौरच्या पोलीस अधीक्षकांना धमकी देणाऱ्या या तरुणीचे नाव कमला चौधरी असून तिने शस्त्रास्त्रांसह व्हिडिओ जारी केला होता. तिच्यावर यापूर्वी देखील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Source: Amar Ujala

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कमला म्हणते की, मी रोज एमडी ड्रग्ज घेते आणि स्वतः घेते, कुणाच्या बापाची ताकद असेल तर थांबवून दाखवा.

कमला एवढ्यावरच थांबत नाही, तर पुढे ती म्हणते की नागौरचे पोलीस अधीक्षक माझे रेकॉर्डिंग पाहत आहेत, ते हे कधी सांगतील की मी त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना पैसे मागितले होते. व्हिडिओमध्ये कमला चौधरी अनेक राजकारण्यांना देखील धमक्या दिल्या ​​होत्या.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या मुलीने भारत सरकारला बदनाम करण्यासाठी आपल्या घरूनच युक्रेनमध्ये अडकल्याचे नाटक करत व्हिडीओ बनविल्याचे व्हायरल दावे चुकीचे आहेत.

सदर मुलगी युक्रेनमध्ये अडकली होती आणि तीने मदतीची याचना करणारा व्हिडीओ जारी केला होता. शिवाय व्हिडीओ व्यवस्थित बघितला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या व्हिडिओमध्ये ती कुठेही सरकारवर टीका करत नाही, तर केवळ सरकारच आम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढू शकेल असा आशावाद व्यक्त करतेय.

वैशाली यादव (Vaishali Yadav) हिच्या अटकेचे दावे देखील चुकीचे आहेत. स्वतः पोलिसांनी हे दावे फेटाळून लावलेत. वैशाली यादवच्या अटकेचा म्हणून जो फोटो व्हायरल होतोय तो राजस्थानातील आहे. व्हायरल फोटोतील तरुणीचे नाव कमला चौधरी असून तिला शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- भारतीयांच्या सुरक्षेसाठी रशियाने ६ तास युद्ध थांबविल्याचे व्हायरल दावे फेक! वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा