‘प्रधानमंत्री जन कल्याण विभाग’द्वारे (Pradhanmantri Jankalyan Vibhag) कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी ५००० रुपये बक्षीस रक्कम म्हणून देण्यात येत आहे. त्यासाठी ३० जुलैच्या आत नमूद लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा असे सांगणारे मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक कमलाकर सोनावळे यांनी हेच दावे फेसबुक व्हॉट्सऍपवरही जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने विविध कीवर्ड्सच्या माध्यमातून गुगल सर्च करून पाहिले. शासकीय वेबसाईट्सवर शोधाशोध केली परंतु अशी कुठलीही योजना अस्तित्वात असल्याचे समोर आले नाही. लसीकरण झालेल्या प्रत्येकास ५००० रुपये मिळण्याची बाब ही खूप मोठ्या राष्ट्रीय बातमीचा विषय आहे. तरीही कुठल्याही वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनीत याविषयी बातमी आढळली नाही.
किंबहुना व्हायरल मेसेज बारकाईने वाचला तर लक्षात येते की त्यात नमूद केलेल्या वेबसाईटमध्ये ‘.gov’ असे अधिकृत शासकीय वेबसाईटचे एक्सटेन्शन नसून ‘.in’ असे लिहिलेले आहे. इथेच सर्वात मोठ्या शंकेला वाव आहे. आम्ही अधिक शोध घेतला असता केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे चालविण्यात येणाऱ्या PIB-fact check या ट्विटर हँडलवर सदर दावे फेक असल्याचे स्पष्ट केल्याचे बघायला मिळाले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी ५००० रुपये बक्षीस रक्कम मिळत असल्याचे दावे फेक आहेत. या मेसेजमध्ये दिलेली लिंक बनावट आहे. त्यावर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती भरणे धोक्याचे ठरू शकते.
हेही वाचा: पोस्ट खात्याकडून सब्सिडी अंतर्गत ६००० रुपये मिळविण्याच्या आमिषापायी लिंकवर क्लिक करू नका!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: कोरोनाची लस घेतलेल्यांना केंद्र सरका… […]
[…] हेही वाचा- कोरोनाची लस घेतलेल्यांना केंद्र सरका… […]