Press "Enter" to skip to content

नेवाशात रामनवमीच्या मिरवणुकी दरम्यान मुस्लिमांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा शहरात रामनवमीच्या मिरवणुकीवर मुस्लिमांकडून दगडफेक करण्यात आल्याचे तसेच मिरवणुकी दरम्यान ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय.

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ किवर्डसच्या आधारे युटयूबवर शोधला असता ‘हिंदुत्व सिंहनाद वार्ता’ या युटयूब चॅनेलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले. या चॅनेलवर अशाच प्रकारचे इतरही मुस्लिम विरोधी व्हिडीओज बघायला मिळतात.

व्हायरल व्हिडिओमध्ये कुठेही ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी होत असल्याचे ऐकायला मिळत नाही. केवळ व्हिडिओसोबतची व्यक्तीच ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा दावा करतेय. या दाव्यांसाठी कुठलाही आधार किंवा पुरावा देण्यात आलेला नाही.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्हायरल व्हिडिओमध्ये १५ व्या सेकंदानंतर एक कट बघायला मिळतोय. या कटनंतर ‘द कॉलम क्राईम’ या युटयूब चॅनेलवरील बातमीचा भाग जोडण्यात आलाय. ‘द कॉलम क्राईम’च्या युटयूब चॅनेलवरील बातमी आपण खाली बघू शकता.

दरम्यान, नेवाशातील रामनवमी मिरवणुकी दरम्यान जातीय तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी ८ आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र या मिरवणुकी दरम्यान ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी झाल्याचे दावे संपूर्णतः चुकीचे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. 

रामनवमी मिरवणुकी दरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मुस्लिम समाजातील काही तरुणांनी हिरवे झेंडे फडकावले होते. मात्र ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी झाल्याचे आढळून आले नाही. अशा प्रकारचा कुठलाही व्हिडीओ आम्हाला मिळाला नसल्याचे, पाटील यांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दंगल, बेकायदेशीरित्या एकत्र जमणे आणि शासकीय कर्मचाऱ्याच्या कामात व्यत्यय आणण्याच्या आरोपाखाली मुस्लिम समाजातील ८ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांच्या परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याप्रकरणी हिंदू तरुणांवरही गुन्हा दाखल केला गेला आहे.

मिरवणुकी दरम्यान ना दगडफेक झाली, ना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. केवळ एक तरुण हिरवा झेंडा फडकावत होता. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने वाद घालायला सुरुवात केली. मात्र थोड्याच वेळात तो तिथून निघून गेला, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या कॉन्स्टेबल तुळशीराम गीते यांनी दिली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की नेवाशातील रामनवमी मिरवणुकी दरम्यान मुस्लिमांकडून दगडकेक केली गेल्याचे तसेच पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी करण्यात आल्याचे दावे चुकीचे आहेत. मिरवणुकी दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने हे दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा- असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत समर्थकांकडून पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा