काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अनेक काँग्रेस नेत्यांसमवेतचा एक फोटो व्हायरल होतोय. फोटोत राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राहुल गांधींसमोर झुकलेली अजून एक व्यक्ती दिसतेय. दावा केला जातोय की राहुल गांधींसमोर (Rahul Gandhi) झुकलेली ही व्यक्ती काँग्रेसचे नेते मोतीलाल वोरा (Motilal Vora) असून ९२ वर्षीय मोतीलाल वोरा ५२ वर्षीय राहुल गांधींसमोर नतमस्तक झाले आहेत.
बीजेपी फॉर न्यू इंडिया या फेसबुक पेजवरून ’92 साल के मोतीलाल वोरा,52 साल के युवा राहुल गांधी के पैर पङ रहे है और 80 साल के मनमोहन सिंह गुलदस्ता पकङ रहे है’ अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर करण्यात आलाय. ही पोस्ट २१६ युजर्सनी शेअर केलीये.
पडताळणी:
- फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला साधारणतः २ वर्षांपूर्वी ‘अमर उजाला’च्या वेबसाईटवर प्रकाशित बातमी मिळाली.
- बातमीनुसार फोटो छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या शपथविधी समारोहातील आहे. शिवाय राहुल गांधींसमोर (Rahul Gandhi) झुकलेली व्यक्ती मोतीलाल वोरा (Motilal Vora) नसून छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी.एस. सिंह देव (T S Singh Deo) आहेत. म्हणजेच या फोटोचा मोतीलाल वोरा यांच्याशी काहीही संबंध नाही.
व्होरा नाही, तर टी.एस. सिंह देव यांनी राहुल गांधींचे पाय धरले का?
- फोटोत राहुल गांधींसमोर झुकलेली दिसत असलेली व्यक्ती जर मोतीलाल वोरा नसून टी.एस. सिंह देव यांनी राहुल गांधींचे पाय धरले का, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर देखील नाही, असंच आहे. फोटोमागची कहाणी वेगळीच आहे.
- ‘अमर उजाला’च्या बातमीनुसार माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना देण्यात आलेल्या बुकेचा दोरा गळून खाली पडला होता. कुणीही या दोऱ्यामध्ये पाय गुंतून पडण्याची भीती होती. हेच लक्षात आल्यानंतर टी.एस. सिंह देव यांनी कुठलाही विचार न करता स्वतः खाली वाकून तो दोरा उचलला.
- पत्रिकाने देखील हा फोटो छापला होता. पत्रिकाने ‘सिंहदेव की सादगी’ अशा कॅप्शनसह छापलेल्या या फोटो देखील सिंह देव यांच्या झुकण्यामागचं कारण तेच सांगण्यात आलं आहे, जे ‘अमर उजाला’च्या बातमीत वाचायला मिळतं.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटोसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटो सध्याचा नसून साधारणतः तीन वर्षांपूर्वीचा आहे. शिवाय फोटोचा मोतीलाल व्होरा यांच्याशी काहीही संबंध नाही.
फोटोत राहुल गांधींसह छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी.एस. सिंह देव आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या शपथविधी समारोहातील हा फोटो आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा हा फोटो व्हायरल झाला होता, त्यावेळी टी.एस. सिंह देव हे राहुल गांधींसमोर नतमस्तक झाल्याचा दावा केला गेला होता, तर सध्या हाच फोटो दिवंगत मोतीलाल व्होरा यांच्या नावाने व्हायरल केला जातोय.
हेही वाचा- इंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment