Press "Enter" to skip to content

पाकिस्तानात हिंदू महिलांना विवस्त्र करून बाजारभर फिरवल्याचे दावे फेक!

पाकिस्तानातील फैसलाबाद येथे 4 हिंदू महिलांचे कपडे फाडले, त्यांना विवस्त्र केले आणि मारत मारत संपूर्ण बाजारभर फिरवले. सेक्युलर लोकांनो सुधरा आता नाहीतर आपल्या देशातही अशीच परिस्थिती उद्भवेल. अशा मजकुरासह 1.14 सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement

व्हायरल मजकूर:

पाकिस्तान के जिला फैसलबाद का वीडियो है ये,
4 हिंदू महिलाओं के कपड़े फाड दिये और उन्हे नंगा करके पीटा गया और उसी हालात में सारे बाज़ार में घूमाया गया।

सेकुलरो सुधर जाओ, नहीं तो एक दिन यह हमारे देश में भी होगा, जिस दिन यह लोग 50 परसेंट से ऊपर हो गए…

Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अजय कदम आणि सुहास देशपांडे यांनी सदर व्हायरल व्हिडीओ आणि दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यास अनुसरून गुगल सर्च केले असता काही बातम्या आम्हाला सापडल्या.

या बातम्यांनुसार लाहोरजवळील फैसलाबाद येथील ही घटना आहे. या चार महिला कचरा गोळा करणाऱ्या आहेत. तहान लागली म्हणून त्या दुकानदाराला पाणी मागण्यासाठी गेल्या असता चोरीच्या आरोपाखाली दुकानदाराने त्यांना मारहाण केली. त्यांचे कपडे फाडून विवस्त्र करत बाजारभर फिरवले. त्या महिला कपड्यासाठी याचना करत असताना काठीने त्यांच्यावर मारहाण केली.

Source: News18 hindi

सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंजाब प्रांताच्या पोलीस प्रशासनाने हालचाल केली आणि फैसलाबाद पोलिसांनी 5 जणांना अटक केली. याविषयी पंजाब पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट देखील करण्यात आले आहे.

त्या महिला हिंदू होत्या का?

व्हायरल व्हिडीओ व्यवस्थित बघितला असता असे लक्षात आले की त्या महिला ‘अल्लाह अल्लाह’ असे म्हणत आक्रोश करत आहेत. या अक्रोशातून त्या मुस्लीम असल्याचेच स्पष्ट होते. आम्ही ठरवून घेतलेल्या मर्यादेनुसार नग्नता असणारा तो व्हिडीओ किंवा त्याची लिंक येथे देऊ शकत नाही परंतु एका बातमीमध्ये त्या महिलांनी ‘अल्लाह अल्लाह’ असे म्हणत आक्रोश केल्याचे लिहिले आहे, पुरावा म्हणून त्या बातमीचा स्क्रिनशॉट खाली देत आहोत.

Source: Newstrack

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की पाकिस्तानात 4 महिलांना विवस्त्र करून मारहाण केलेल्या घटनेचा व्हिडीओ खरा आहे, परंतु त्या हिंदू होत्या असे फेक दावे पसरवून भारतात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या महिला हिंदू असल्याचा कोणत्याही बातमीत उल्लेख नाही, तसेच व्हिडीओमध्ये त्या ‘अल्लाह अल्लाह’ असे म्हणत आहेत, यावरून त्या मुस्लीम असाव्यात अशी शक्यता आहे.

हेही वाचा: उत्तर प्रदेशात दोन मुस्लिम मुलांकडून अल्पवयीन हिंदू मुलीवर बलात्कार?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा