Press "Enter" to skip to content

WHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड?

‘कोरोना लशी ऐवजी केवळ ३० रुपयात मिळणारी ‘आयवरमेक्टीन’ (Ivermectin) गोळी कोविड १९ वर (covid 19) जास्त उपायकारक’, ‘WHO जगाची फसवणूक करतेय’, ‘डॉ. अँथनी फौची (Anthony Fauci) यांच्या मेल्समधील धक्कादायक माहिती’ अशा सर्व दाव्यांची सरमिसळ असणारे मेसेज सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहेत.

व्हायरल दावा:

WHO ने जगाची केलेली फसवणुक उघड करणारे पुरावे व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती👇

 कोरोना रुग्णास "आयवरमेक्टीनची" (Ivermectin) गोळी दिल्यास रुग्णास पुर्ण आराम मिळतो रोगी पुर्ण बरा होतो, त्याचा मृत्यू होत नाही. त्याचा जीव जात नाही व त्या औषधाचे कोणतेही घातक दुष्परिणाम नाहीत असा निष्कर्ष देशातील विविध राज्यांच्या विशेषज्ञ  समिती व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या FLCC, BIRD, RESEARCH SQUARE यांच्या लाखो लोकांवरील निष्कर्ष चाचणीचे अहवाल उपलब्ध आहेत. 
Advertisement
नुकतेच ‘मुंबई उच्च न्यायालयाने’ 28 मे 2021 रोजी ‘गोवा सरकारच्या’ बाजूने निकाल देत इवरमेक्टीन चा वापर करण्यास परवानगी दिली आहे. [PIL WP NO. 1172 OF 2021 South Goa Advocates Association & Ors. Vs. State of Goa] आयवरमेक्टीनची (Ivermectin) गोळी कोणत्याही मेडिकल स्टोअर्स मध्ये स्वस्त दरात अंदाजे 30 रुपयात उपलब्ध आहे. त्याचा कुठेही तुटवडा नाही. त्या उलट कोरोना वरील लसीचे अनेक जीव घेणे दुष्परिणाम उघडकीस आले असून लसीचे दोन्ही डोस घेवुनसुद्धा अनेक नागरिकांचा मृत्यू झाला त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनचे मा. अध्यक्ष के. के. अग्रवाल यांचा लसीचे दोन्हीं डोस घेतल्या नंतरही कोरोनाने मृत्यू हे आहे. आयवरमेक्टीनच्या गोळी ने शेवटच्या स्टेजचा कोरोना आजार सुद्धा पूर्णपणे बरा होवून लोकांचे जीव वाचविण्याची त्या गोळीची क्षमता जगभरात सिद्ध झाली असून व्हेंटिलेटरवर असलेल्या ८८ वर्षीय वृद्ध महिलेस सुद्धा 'आयवरमेक्टीन' (Ivermectin) या गोळीच्या उपचाराने वाचविल्याचे पुरावे व अमेरिकेच्या न्यायालयाचे आदेश इंडियन बार असोसिएशनच्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत:- (i) www.indianbarassociation.in (ii) https://indianbarassociation.co.in/?page_id=2103 (iii) https://indianbarassociation.co.in/?page_id=2097 असे असतांना आयवरमेक्टीनला बाजूला ठेवून लस (Vaccine) चाच आग्रह धरुन कित्येक नागरिकांचे जीव धोक्यात घालून त्यांना महागडे व घातक दुष्परिणाम असलेले औषध देणे म्हणजे औषध कंपनीचे माफियांकडून सरकारी यंत्रणेचा केलेला गैरवापर व नागरिकांची चालविलेली फसवणूक नाही काय ? नुकतेच काही औषध निर्माता कंपनीच्या माफिया यांनी [वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)] जागतिक आरोग्य संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना व मुख्य सायंटीस्ट डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या मार्फत चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न केला. परंतु इंडियन बार असोसिएशनने तिला ५१ पानी कायदेशीर नोटीस देऊन डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना प्रत्येक नागरिकांच्या मृत्यूसाठी तिला जबाबदार धरून तिच्याविरुद्ध भादवि ३०२, ३०४, १८८, १२०(ब), ३४ अंतर्गत कारवाईचा ईशारा दिला. नोटीस मिळताच WHO च्या डॉ. सौम्या स्वामीनाथन ने घाबरून जावून इवरमेक्टीन चा विरोध करणारे 'ट्वीट' डीलीट करून टाकले. इंडियन बार अससोसिएशनच्या प्रयासाने WHO च्या अधिकाऱ्यांचा खोटेपणा व जनतेला मुर्ख बनवून त्यांच्या जीवाशी खेळण्याच्या व उदरनिर्वाहाच्या रोजगारा वर गदा आणून त्यांना गरीब बनविण्याच्या प्रकार उघडफीस आला. इंडियन बार असोसिएशनच्या या कार्याचे कौतुक संपूर्ण जगभरात होत असून नोटीस पाठविणाऱ्या अॅड. दीपाली ओझा यांची मुलाखत अमेरीका, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका अश्या जगभरातील विविध प्रसार माध्यमांनी घेवून प्रकाशीत व प्रसारीत केल्या आहेत. लिंक:- https://www.francesoir.fr/politique-monde/livermectine-utilisee-en-inde-avec-succes-confirmee-comme-traitement-contre-la-covid https://youtu.be/brlZ_77uqn8 https://www.bitchute.com/video/62kUVBYFAliV/ विनंती:- सर्व नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आयवरमेक्टीनच्या सहाय्याने उपचार करून आपल्या परिवाराचा जीव व पैसा वाचवून देशाला पुन्हा लॉकडाऊन मध्ये जाण्यापासून वाचवावे. तसेच या मुद्यांवर इतर लोकांनाही माहीती पोहचवावी व जनजागृती करुन या राष्ट्रीय आंदोलनास सहकार्य करावे. नोट: शासनाच्या निर्देशानुसार अँलोपेथी औषधाची ऍलर्जी असणाऱ्यांनी लस (VACCINE) घेवू नये. अतीरीक्त माहिती:- नुकतेच अमेरिकेचे स्वास्थ विभागाचे सल्लागार डॉ. फाऊची यांच्या मेलस हया तपास माध्यमांनी मिडीयामध्ये उघड केल्यानंतर खालील धक्कादायक माहिती समोर आली आहे: i) ज्या यक्तीला एकदा कोरोना होऊन गेला असेल त्याला दुसऱ्यांदा कोरोना होऊ शकत नाही. त्याला लस (Vaccine) घेण्याची किंवा मास्क लावण्याची आवश्यकता नाही. ii) मास्क लावल्याने कोरोनापासून संरक्षण होत नाही. iii) कोरोना व्हायरस हा चीन च्या लॅब मध्ये निर्माण करण्यात आला होता. iv) डॉ. फाऊची हे लस निर्माता कंपनीचे मालक बिल गेट्स यांच्या सोबत संगणमत करुन अमेरिकेला व जगाला चुकीची माहिती देवून काही कंपन्यांचा फायदा करण्याचा प्रयत्न करत होते. मास्कचा अधिक वापर केल्यामुळे तुमची फुफ्फुसे निकामी व क्षतिग्रस्त होऊन विविध आजार जडतात याबाबत खालील लिंक वर पहावे तसेच इंडियन बार असोसिएशनचे दि. 01.05.2021 रोजीचे पत्र वाचावे. लिंक: मास्क घालण्याचे साईड इफेक्टस: https://youtu.be/2WS2TLzPHds कोरोना चाचणीचा फ्रॉड: https://youtu.be/AhAxZ2AtbPk हँड सॅनीटायझरचा वापर धोकादायक असून पाणी व साबण (Hand soap) चा वापर करावा असे तज्ञांचे मत आहे. लिंक: i) https://drive.google.com/file/d/1FU72WH2qTOayW2cLbSDvzB_8R2I4599i/view?usp=sharing

*WHO ने जगाची केलेली फसवणुक उघड करणारे पुरावे व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती*👇 कोरोना रुग्णास *"…

Posted by उदय विठ्ठल शिरसाट on Tuesday, 29 June 2021
अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अमरदीप पवार, उमेश परब, गुरुप्रसाद पाटील आणि गोविंद भुजबळ यांनी फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेले हे दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

आम्ही व्हायरल मेसेज व्यवस्थित वाचला. यामध्ये विविध दावे करण्यात आले आहेत. त्या प्रत्येक दाव्याची पडताळणी पुढीलप्रमाणे-

दावा: ‘आयवरमेक्टीन’ (Ivermectin) गोळीने कोरोना रुग्ण पूर्ण बरा होतो

व्हायरल मेसेज मध्ये ‘आयवरमेक्टीन’ (Ivermectin) गोळीने कोविड १९ (covid 19) रुग्ण पूर्णपणे बरा होतो, त्याचा मृत्यू होत नाही. त्याचा जीव जात नाही व त्या औषधाचे कोणतेही घातक दुष्परिणाम नाहीत असा निष्कर्ष देशातील विविध राज्यांच्या विशेषज्ञ समिती व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या FLCC, BIRD, RESEARCH SQUARE यांच्या लाखो लोकांवरील निष्कर्ष चाचणीचे अहवाल उपलब्ध आहेत. असे सांगितले आहे

वस्तुस्थिती:

  • जागतिक आरोग्य संघटना (WHO), अमेरिकेची अन्न व औषध प्रशासन संस्था (FDA) आणि आफ्रिकेच्या सेंटर फोर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (Africa CDC) ने कोव्हीड१९ रुग्णास ‘आयवरमेक्टीन’ (Ivermectin) न देण्याचा सल्ला दिलाय.
  • आयवरमेक्टीन (Ivermectin) गोळी खरेच कोविड १९ वर (covid 19) उपायकारक आहे का याविषयी निष्कर्ष काढण्या इतपत प्रमाणावर संशोधन झाले नाही. FLCC, BIRD, RESEARCH SQUARE या तुलनेने अगदीच नवख्या संस्था असून त्यांच्या संशोधनासाठी वापरलेले सँपल पुरेसे नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
  • ‘आयवरमेक्टीन’ (Ivermectin) व्हायरसवर नव्हे तर पॅरासाईटवर ईलाज म्हणून वापरतात. हे औषध मुख्यतः प्राण्यांसाठी आहे असे FDAने नमूद केले आहे.

ICMR या भारताच्या केंद्रीय संस्थेने ‘आयवरमेक्टीन’ (Ivermectin)चा वापर ‘Therapies based on low certainty of evidence’ म्हणजेच सबळ पुरावा नसताना उपाय म्हणून वापरू शकणाऱ्या औषधात समाविष्ट केला आहे.

दावा: ‘मुंबई उच्च न्यायालयाने’ ‘गोवा सरकारच्या’ बाजूने निकाल देत ‘आयवरमेक्टीन’चा वापर करण्यास परवानगी दिली आहे.

व्हायरल मेसेजमध्ये न्यायालयाने गोवा सरकारला ‘आयवरमेक्टीन’ वापराची परवानगी दिली असून संदर्भासाठी याचिका क्रमांक [PIL WP NO. 1172 OF 2021 South Goa Advocates Association & Ors. Vs. State of Goa] असे लिहिले आहे.

वस्तुस्थिती:

  • होय हे खरे आहे की ‘मुंबई उच्च न्यायालयाने’ ‘गोवा सरकारच्या’ बाजूने निकाल देत ‘आयवरमेक्टीन’चा वापर करण्यास परवानगी दिली आहे. परंतु ती परवानगी देत असताना न्यायालयाने या वापरावर प्रश्न करणारी वेगळी याचिका दाखल करण्यात यावी असा आदेश देखील दिलाय.
  • ‘मुंबई उच्च न्यायालयानेच दुसऱ्या एका याचिकेसंदर्भात ‘आयवरमेक्टीन’च्या वापराविषयी केंद्र सरकारच्या भूमिकेची विचारणा करत उत्तर मागितले आहे.
  • व्हायरल दाव्यात दिलेला याचिका क्रमांक आणि ‘आयवरमेक्टीन’चा वापर यांचा तिळमात्रही संबंध नाही. गोव्यातील डॉक्टरांच्या संघटनेने गोवा प्रशासनाच्या ऑक्सिजन, बेड्स यांसारख्या बाबींविषयी माध्यमांत दिलेल्या प्रतिक्रिया आणि सत्यस्थिती यांचा ताळमेळ जुळत नसल्याने निवासी डॉक्टर्सना रुग्णाच्या नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे म्हणत याचिका दाखल केली होती, त्याचा तो क्रमांक आहे.

दावा: इंडियन मेडिकल असोसिएशनचे मा. अध्यक्ष के. के. अग्रवाल यांचा लसीचे दोन्हीं डोस घेऊनही कोरोनाने मृत्यू

कोरोनावरील लसीचे अनेक जीव घेणे दुष्परिणाम उघडकीस आले असून लसीचे दोन्ही डोस घेऊन सुद्धा अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनचे मा. अध्यक्ष के. के. अग्रवाल.

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अग्रवाल यांचा कोरोनाने कोरोनाने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

वस्तुस्थिती:

  • लशीच्या दोन डोसनंतरही IMAचे माजी अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल (Dr. k k Aggarwal) यांचा कोव्हीड १९ चे उपचार घेत असताना १८ मे २०२१ रोजी मृत्यू झाला हे खरे आहे.
  • परंतु त्यांचे निकटवर्तीय असणारे डॉ. रवी वानखेडे यांनी ‘द टाईम्स ऑफ इंडिया‘ला अशी माहिती दिली की ते खूप दिवसांपासून ‘immunosuppressant’ म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढवण्याची औषधे घेत होते. त्यांच्या प्रतिकारशक्तीने लशीला व्यवस्थित प्रतिसाद दिला नसावा. त्यामुळे लगेच लशीकरण मोहिमेवरील लोकांचा विश्वास डळमळीत होणे चुकीचे आहे.
  • भारतात लशीचे अपाय होऊन ३१ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता होती, परंतु त्यातील केवळ एकाच व्यक्तीवर लशीचा थेट अपाय झाल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे.
  • भारतात लस घेतलेल्या २३.५ कोटी नागरिकांतील केवळ ०.०००२ % एवढ्या लोकांचा मृत्यू झाला आहे. हा एवढा आकडा साधारणपणे अपेक्षित आहे. त्यामुळे लस घेणे सुरक्षितच असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हंटले आहे.

‘इंडियन बार असोसिएशन’ची सदर विषयावरील भूमिका

‘इंडियन बार असोसिएशन’ ही एक भारतीय वकिलांची संघटना असून त्यांनी WHOच्या मुख्य शास्त्रज्ञ असणाऱ्या डॉ. सौम्या स्वामिनाथन (Soumya Swaminathan) यांच्या विरोधात ‘आयवरमेक्टीन’ (Ivermectin) च्या वापरास विरोध करता म्हणून कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच मास्कच्या वापराबद्दल आणि कोरोना टेस्ट विषयीचा फोलपणा सांगणाऱ्या व्हिडीओजच्या लिंक्स व्हायरल मेसेजमध्ये आहेत त्यात तज्ज्ञ म्हणून प्रतिक्रिया देणारे इतर कुणी नसून ‘इंडियन बार असोसिएशन’ संस्थापक ऍड. निलेश ओझा आहेत.

वस्तुस्थिती:

  • ‘इंडियन बार असोसिएशन’ संस्थापक ऍड. निलेश ओझा WHO, मास्कचा वापर, एकंदर कोरोना आणि त्याविषयीच्या नियमावली व उपाययोजनांवर आक्षेप घेताना दिसतात याचे कारण आहे त्यांचे विश्वरूप रॉय चौधरी यांच्या दाव्यांना समर्थन.
  • मास्कचा वापर कसा घातक आहे हे सांगण्यासाठी त्यांनी चौधरी यांच्या व्हिडीओचा आधार घेतला आहे. यामध्ये चौधरी म्हणतायेत की अमेरिकेच्या CDC या संस्थेने मास्क वापरणाऱ्या लोकांना १८% जास्त प्रमाणात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे मास्क वापरू नका. आम्ही याची पडताळणी केली असता CDC चा जो रिपोर्ट ते दाखवतायेत त्यात असे कुठेही म्हंटले नाही उलट मास्क वापराची योग्य पद्धत काय आहे याविषयी माहिती त्यांनी प्रसारित केली आहे.
  • विश्वरूप रॉय चौधरी यांचे दावे आणि त्यांची विश्वासार्हता किती तकलादू आहे, ते स्वतःच्या नावासमोर ‘डॉक्टर’ लावत असले तरी ते नेमके कशाचे आणि कशा पद्धतीने डॉक्टर आहेत याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’ने विस्तृत बातमी केलीय ती ‘येथे‘ वाचू शकता.

दावा: डॉ. अँथनी फौची यांच्या लिक झालेल्या ई-मेल्समध्ये उघड झाली धक्कादायक माहिती

कोरोना प्रतिबंधक सल्लागार असणारे अमेरिकेचे डॉ. अँथनी फौची यांचे ई-मेल्स प्रकाशात आले आणि त्यात मास्क, लस, बिल गेट्स यांविषयीची धक्कादायक माहिती समोर आली. असे दावे व्हायरल मेसेज मध्ये आहेत.

वस्तुस्थिती:

  • डॉ. अँथनी फौची यांचे ई-मेल्स लिक झाल्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या, परंतु या बातम्या खोट्या होत्या. मेल्स लिक झाले नव्हते तर भारतात ज्याप्रमाणे RTI – माहितीचा अधिकार आहे तसे अमेरिकेत FOIA- Freedom of Information Act असलेल्या कायद्यान्वये काही माध्यमांनी माहिती मागवली होती.
  • त्या मेल्स मध्ये मास्क, लस, चायनीज लॅब मधून व्हायरसचा उगम याविषयीची गुप्त माहिती वगैरे सापडली सांगणारे दावे चुकीचे आहेत. विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या दाव्यांचे फॅक्टचेक केले आहे.

हे ही वाचा: रशियाने कोरोना मृतांचे पोस्टमॉर्टेम करून सत्य बाहेर आणल्याचे दावे करणारे मेसेज फेक!

More from कोरोनाMore posts in कोरोना »

4 Comments

  1. Anonymous Anonymous June 18, 2021

    कोरोना वैक्सीन चे भयंकर दुष्परिणाम आहेत, तसेच मास्क सैनिटायझर, आणि कोविड ट्रिटमेन्ट औषधि लोकांच्या मृत्युंना कारण आहे, तुम्ही किती चेक पोस्ट केल्या तरी काही फायदा नाही कारण लोकांना आता WHO, ICMR, बिल गेट्स चा सर्व षड्यंत्रकारी खेळ लक्षात आला आहे…
    कोरोना एक जागतिक षड्यंत्र आहे, यात शंकाच नाही, लोकांना चुतिया बनवून खोट्या महामारी द्वारे कंट्रोल करण्यात येत आहे, NWO च्या गुलामीत सरकार लोकांना लोटत आहे. बाहेर देशात कोरोना षड्यंत्र, वैक्सीन, मास्क, फिझीकल दुरावा, 5 जी च्या विरोधात आंदोलन चालू आहेत, हे का दाखवत नाही तुम्ही लोकांना…
    सरकार, WHO, खोट्या महामारी च्या विरोधात असलेली माहीती तुम्ही खोटी ठरविण्याचा प्रयत्न करता, लाज कशी वाटत नाही तुम्हाला?? कुठे गेली तुमची मानवता, एक लक्षात ठेवा कोरोना षड्यंत्र एक्सपोज़ तर झालेच आहे, अजून थोड्या दिवसांनी लोक जागृत होणारच आणि मग तुमचाही नंबर त्यामध्ये असणार….

    • checkpostmarathi checkpostmarathi June 21, 2021

      एवढी महत्वाची आणि खात्रीपूर्ण माहिती आहे आपल्याकडे मग WHO, ICMR, भारत सरकार यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार करूनच टाका की. क्रांती घडवून आणल्याबद्दल आपलं नाव देखील अजरामर होईल.

  2. रविंद्र खांबेकर रविंद्र खांबेकर July 1, 2021

    खुपच उपयुक्त माहिती चेकपोस्ट मराठी मार्फत दिली जाते ,खुपसारे बोगस ,भड़काऊ पोस्ट येत असतातच पण आपण तपासून त्याची सत्यता पडताळणी करतात.हे अवघड पण आवश्यक आहे.धन्यवाद🙏🙏🙏

    • checkpostmarathi checkpostmarathi July 5, 2021

      ‘चेकपोस्ट मराठी’वरील आपल्या विश्वास आणि आत्मियतेबद्द्ल धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा