Press "Enter" to skip to content

भारतीयांच्या सुरक्षेसाठी रशियाने ६ तास युद्ध थांबविल्याचे व्हायरल दावे फेक! वाचा सत्य!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना आपल्या नागरिकांच्या सुरक्षेविषयी विंनती केल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी रशियाने चक्क ६ तास युद्ध थांबविले, ही आहे नव्या भारताची ताकद, मोदींची ताकद.. असे दावे मोदी-भाजप समर्थकांद्वारे सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतायेत. (6 hours russia war)

Advertisement

भाजप महाराष्ट्र, न्यूज १८ हिंदीचे संपादक अमिष देवगन, जैन साधक देवेंद्र भाईजी, टीव्ही ९ चे कार्यकारी संपादक आदित्य राज कौल, राष्ट्रीय सुरक्षा अभ्यासक असे स्वतःच्या बायोमध्ये लिहिणारे स्टार न्यूज ग्लोबल, भारतशक्तीचे संस्थापक नितीन गोखले अशा विविध लोकांनी ट्विटरवरील अधिकृत हँडलवरून हे दावे केले आहेत.

ABP न्यूज, ABP माझा, पंजाब केसरी, अमर उजाला, सकाळ, पत्रिका, एशिया नेट न्यूज, न्यूज १८ हिंदी, झी २४ तास यांसारख्या विविध माध्यमांनी बातम्या देखील प्रसिद्ध केल्या आहेत.

Source: ABP Majha

हे दावे ट्विटर, फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सोमनाथ पवार, समीर गायकवाड, कल्याण केळकर, संजय राजवाडकर, अशोक किरदत, डॉ. राहुल पाटील यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी विविध कीवर्डसच्या आधारे सर्च केले असता कुठल्याही आंतरराष्ट्रीय माध्यमात या ६ तासांच्या युद्धबंदीविषयी एकही बातमी मिळाली नाही. या उलट सदर दावे चुकीचे असल्याच्या काही बातम्या समोर आल्या.

द क्विंट‘च्या वृत्तानुसार आपल्या देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (Ministry of External Affairs) म्हणजेच MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नास उत्तरे देताना सदर दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले.

“कोणता मार्ग सुरक्षित आहे याची आमच्यापर्यंत माहिती येत होती आणि आम्ही ती पुढे कळवत होतो, ज्यामुळे अनेक भारतीय नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडण्यास मदत झाली. परंतु आपल्यासाठी युद्ध बंद केले, बॉम्बस्फोट थांबविले वगैरे म्हणणे चुकीचे ठरेल.”

– अरिंदम बागची, प्रवक्ते परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

या माहितीनंतर बऱ्याच माध्यमांनी आपली चूक सुधारली. ज्या दैनिक सकाळच्या बातमीचे ग्राफिक्स वापरत ‘महाराष्ट्र भाजप’ने रशियाने ६ तास युद्ध थांबविल्याचे दावे करत नरेंद्र मोदी यांची स्तुती केली त्याच दैनिक सकाळने सदर वृत्त फेक असल्याची दुसरी बातमी प्रसारित केली.

Source: Daily Sakal

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या संवादानंतर रशियाने भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी तब्बल ६ तास युद्ध थांबविल्याचे दावे फेक आहेत. याविषयी स्वतः परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेच स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा: इस्कॉनचे स्वयंसेवक युक्रेनमधील लोकांना मदत करत असल्याच्या दाव्यासाठी शेअर केले जाताहेत जुने फोटो!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा