कर्नाटकातील भाजप खासदार तेजस्वी सूर्या एका हॉस्पिटलमध्ये मुस्लीम नावे असलेली यादी वाचून दाखवताना प्रशासनाला कन्नड आणि इंग्रजीत जाब विचारताना दिसत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. या व्हिडिओच्या आधारे सोशल मीडियावर ‘बेड जिहाद’चे (bed jihad) दावे व्हायरल होताहेत.
'हा बघा कोरोना कार्यकाळात हॉस्पिटलमध्ये बेड जिहाद. बेंगलोर येथे मन्सूर अली, ताहेर सादिक, पाशा सुलतान, अली अशा अनेक नावांनी बेड बुक केलेला असून सदर बेडवर कोणीही नाही तेजस्वी सुर्या यांनी माहिती घेतली असता 1500 जागा शिल्लक आहेत.हे असेच दिल्ली,चेन्नई,हैद्राबाद, पुणे येथे चालू आहे. आणि मग भारतात आरोग्य व्यवस्था कोलमडली अशा बोंबा मारायच्या आणि मोदींना जबाबदार धरायचे.हे सगळं सुव्यवस्थित रचलेलं कारस्थान आहे.'
या अशा कॅप्शनसह तो व्हिडीओ व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.
असेच दावे फेसबुक आणि ट्विटरवर हिंदी मराठी दोन्ही भाषेत जोरदार व्हायरल होत आहेत.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओ संबंधित विविध कीवर्ड्स टाकून गुगल सर्च केले असता नेमकी घटना काय होती हे समजले.
१. नेमकं काय घडलंय ?
भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी कर्नाटकातील बंगळूरूमध्ये कोव्हीड रुग्णांच्या मदतीसाठी तयार केलेल्या ‘बँगलोर साउथ वार रूम’ मधून बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी मनमानी पैसे घेतले जात आहेत, भ्रष्टाचार होत आहे असा आरोप केला आहे. त्याच संदर्भात स्वतः टीमसह चौकशीसाठी गेले असतानाचा तो व्हिडिओ व्हायरल होतोय.
२. यादीतील मुस्लीम नावांवर बेड्स बुक केले आहेत का?
बीबीसीच्या बातमीनुसार तेजस्वी सूर्या ज्या नावांचा उल्लेख करत आहेत ती सर्व नावे वॉर रूममधील कॉलसेंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहेत. त्या नावांवर बेड्स बुक नव्हते.
तेथील कॉल सेंटरवर एकूण २०६ कर्मचारी काम करत आहेत, परंतु काहीएक संबंध नसताना तेजस्वी सूर्या यांनी मुस्लीम नावे असणाऱ्या १७ जणांची यादी जाहीररीत्या वाचून दाखवली आणि त्यांच्याच ऑफिसकडून हा व्हिडीओ बाहेर आला.
३. सूर्या यांच्या आरोपांनंतर काय कारवाई झाली?
सिटी क्राईम ब्रांच (सीसीबी) ने सदर दाव्यांविषयी तपास करण्यासाठी ८ झोनल वॉर रूम्सवर छापे टाकले. पोलीस कमिशनर कमल पंत यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार सिसिबीने ४ लोकांना अटक केली आहे. यात नेत्रावती आणि रोहित कुमार असे दोन कर्मचारी आणि रेहान व सतीश हे दोन डॉक्टर अटकेत आहेत. महत्वाचा मुद्दा असा की तेजस्वी सूर्य यांनी जी लिस्ट वाचून दाखवली त्यात या चारही आरोपींचा उल्लेख नव्हता.
४. खासदार तेजस्वी सूर्यांचा माफीनामा
सोशल मीडियात सूर्या यांनी वाचलेली नावे ‘दहशतवादी’ असल्याच्या पोस्ट्स फिरल्या. व्हायरल व्हिडीओमुळे कोरोनाच्या संकटात धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचे आरोप चहूबाजूंनी झाले. यानंतर तेजस्वी सूर्या त्याच साउथ झोन वार रूममध्ये पुन्हा गेले आणि कर्मचाऱ्यांची माफी मागितली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे की ‘बेड जिहाद’ (bed jihad) मुस्लीम नावांनी बुक असलेले १५०० बेड्स रिकामेच आढळले असे दावे करणाऱ्या व्हायरल पोस्ट्स फेक आहेत . त्या यादीतील नावे रुग्णांची नसून कर्मचाऱ्यांची आहेत. खासदार तेजस्वी सूर्या यांनी घडलेल्या प्रकारावर कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.
[…] […]
[…] […]
[…] पडताळणी केली होती. तो रिपोर्ट ‘येथे‘ […]
[…] […]