सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होतोय. फोटोमध्ये एका महिलेसोबत तीन तरुण मुली बघायला मिळताहेत. या तिन्ही तरुणी एकमेकींच्या बहिणी असून त्या एकाच वेळी IAS बनल्या असल्याचा दावा केला जातोय. कमला, गीता आणि ममता या जाटव भगिनींनी अनुक्रमे 32, 64 आणि 128 वा रँक मिळवला असल्याचे असल्याचे सांगितले जातेय. फोटोमधील महिला त्यांची आई असून ती विधवा असल्याचा दावा देखील करण्यात येतोय.
फेसबुकवर देखील हा फोटो अशाच प्रकारच्या दाव्यांसह मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता ‘दै. जागरण’च्या वेबसाईटवर 24 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये व्हायरल फोटो बघायला मिळाला. बातमीनुसार जयपूर जिल्ह्यातील 55 वर्षीय मीरा देवी यांच्या तीन मुली, कमला चौधरी, ममता चौधरी आणि गीता चौधरी यांनी राजस्थान प्रशासकीय सेवा (RAS) परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या.
या तिघींनी भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा देखील दिली होती मात्र काही मार्क्स कमी पडल्याने त्यांना या परीक्षेमध्ये यश मिळू शकले नाही. त्यानंतर त्यांनी राजस्थान प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली आणि या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या. तिघींपैकी थोरल्या कमला हिने ओबीसीमध्ये 32 वा रँक मिळवला, तर गीता 64 व्या आणि ममता 128 व्या रँकवर राहिली.
मुलींच्या या यशाने आपल्या पतीची शेवटची इच्छा पूर्ण झाली. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एकुलत्या एक मुलाने देखील शिक्षण सोडून बहिणींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हातभार लावला, असे मीरा देवी यांनी त्यावेळी जागरणशी बोलताना सांगितले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये केला जाणारा दावा चुकीचा आहे. व्हायरल फोटोतील तिन्ही बहिणी सोबतच IAS बनल्या नसून त्या RAS अर्थात राजस्थान प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. या बहिणी दलित समाजातील नसून इतर मागास वर्ग अर्थात ओबीसीमधील आहेत. शिवाय व्हायरल फोटो सध्याचा नसून जवळपास 5 वर्षांपूर्वीचा आहे.
हेही वाचा- तुमची KBC च्या 25 लाख रुपयांच्या लॉटरीसाठी निवड झाल्याचे मेसेज आल्यास सावधान!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment