‘भारताने सोमालियामधून आयात ५०० टन केळी आयात केलीय परंतु त्यात हेलिकोबॅक्टर नावाची अळी आढळलीय. ती खाल्यानंतर १२ तासांत ब्रेन डेड होऊन खाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.’ अशा प्रकारचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत. (Somalia banana)
हिंदीत व्हायरल होणारे हे दावे सुरुवतीला इंग्रजीतून व्हायरल झाले आहेत. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी पडताळणी करण्याची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांविषयी गुगल सर्च करून पाहिले असता हे दावे केवळ भारतातच नव्हे तर इतर काही देशांतही व्हायरल झाले आहेत असे समजले.
अबू धाबीच्या शेतकी आणि अन्न सुरक्षा प्रशासनाने व्हायरल दाव्यांविषयी एक ऑफिशियल स्टेटमेंट प्रसारित केले आहे. यात त्यांनी व्हायरल दावे फेक असून त्यातील बाबी चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये केळीच्या आतून अळी सदृश्य काहीतरी बाहेर काढलेय आणि त्याचा उल्लेख ‘हेलिकोबॅक्टर’ असा केलाय. परंतु तज्ज्ञांच्या मते ‘हेलिकोबॅक्टर’ ही अळी नसून सूक्ष्मजंतू आहेत. तसेच त्यात असेही सांगितले आहे की केळी किंवा इतर कोणत्याही फळात व्हिडीओत दिसतेय तेवढी अळी जिवंत राहूच शकत नाही.
कॅन्सरवर रिसर्च करणारे वैज्ञानिक प्रोफेसर डॉ.अल्खोडेअरी यांनी देखील सदर दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेलिकोबॅक्टर सूक्ष्मजंतूंविषयी थोडक्यात:
हे अतिशय सामान्यपणे आढळणारे सूक्ष्मजंतू आहेत. जगाच्या जवळपास दोन तृतीयांश सजीवांत हे आढळतात. काही लोकांच्या शरीरात हे सूक्ष्मजंतू अल्सर किंवा कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात परंतु सामान्यपणे आरोग्यविषयक जागरूकता असणाऱ्यांमध्ये, स्वच्छ पाणी पिणार्यांच्या शरीरात पचनेन्द्रीयांत यांचे वास्तव्य असले तरीही त्यांचा तसा काही उपद्रव होत नाही.
या दाव्यांचा भारताशी काहीएक संबंध नाही:
आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हायरल होत असणारे हे दावे सोमालियाच्या केळीबाबतचे (Somalia banana) आहेत. अर्थात ते खोटे आणि चुकीचे आहेत परंतु क्षणभर खरे जरी मानले तरीही यांचा भारताशी काहीएक संबंध नाही कारण जागतिक स्तरावर केळी उत्पादनात भारत हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. २०१८-१९सालच्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगाच्या तब्बल ३२% एवढे केळी उत्पादन एकट्या भारत देशाचे होते. काही अहवालांनुसार भारताने २०२०-२१ या आर्थिक वर्षात ६१९ कोटी रुपयांची केळी निर्यात केली आहे. एवढ्या सक्षम देशात सोमालिया सारख्या देशाची केळी का आणि कशासाठी आयात होईल? त्यामुळे त्याविषयीच्या दाव्यांचा भारताशी काही संबंध देखील कसा काय असू शकेल?
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की सोमालियातून आयात केलेल्या केळीत (Somalia banana) हेलिकोबॅक्टर नावाची जीवघेणी अळी असे दावे करणारे व्हायरल मेसेज-पोस्ट्स फेक आहेत. महत्वाचे म्हणजे भारत केळीच्या बाबतीत भरपूर सधन आहे त्यामुळे आपण सोमालियाकडून ५०० टन केळी आयात करण्याचा दावा देखील फेकच आहे.
हेही वाचा: मोबाईलवर खुपवेळ गेम खेळल्याने डोळ्यात ‘पॅरासाईट’ नावाचा किडा होत असल्याचे दावे फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: सोमालियातून आयात केलेल्या केळीमध्ये … […]