तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून भारतीय सोशल मीडियात मोठी खळबळ दिसत आहे. काही विशिष्ट गटांकडून अफगाणिस्थानमध्ये घडणाऱ्या अमानुष घटनांची खिल्ली उडवली जात आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून एक व्हिडीओ व्हायरल केला जातोय. व्हिडिओमध्ये बुरख्यातील काही महिलांचा लिलाव (Auction) होताना दिसतोय.
‘वक़्त बदलते देर नहीं लगती। जो लोग बोल रहे थे कि हिन्दुओं की बहन, बेटी और बहु 2-2 दीनार बेची थी, अब उन लोगों की खुद की उसी बाज़ार मे आज बिक रही हैं और वो खुद बेच रहे हैं उसी बाज़ार में…!!’
‘100,,100 रूपये मे तालिबान, अफगान औरतों लड़कियों को बेच रहा ले जाओ कुछ भी करो, दुनिया के सारे चुस्लिम चुप।यही है चुस्लाम कि हकीकत।इनमें कुछ 15 साल से कम की भी हैं।’
अशा मजकुरासह साधारण अडीच मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला जात आहे.
फेसबुकवर हे दावे व्हायरल होण्याचे प्रमाण खूप आहे.
खेदाची बाब म्हणजे फेसबुकवर पोस्ट झालेल्या या व्हिडीओजवर काही जणांनी हसण्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक बळीराम पाटील आणि वाघेश साळुंखे यांनी हे व्हिडीओज अशाच दाव्यांसह व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
- व्हिडीओ व्यवस्थित बघितला असता व्हिडीओच्या १.३३ व्या मिनिटावर लाल रंगाची ‘डबल डेकर’ सिटी बस दिसतेय. अशा बस प्रामुख्याने इंग्लंडसारख्या युरोपीय देशांत आढळतात.
- व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता ‘हफिंगटन पोस्ट’च्या इंग्लंड आवृत्तीने २०१४ साली प्रकाशित केलेली बातमी सापडली.
- बातमीनुसार लंडन शहराच्या रस्त्यांवर कुर्दिश आंदोलकांनी नाटिका सादर केली होती. यामध्ये सिरीया आणि ईराकमध्ये ‘आयसीस’ ही दहशतवादी संघटना बंदिवान स्त्रियांना कशाप्रकारे गुलाम म्हणून विकतात हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
- ‘न्यूजवीक युरोप‘शी बोलताना आंदोलकांनी सांगितले की ‘आम्ही हे दाखून देऊ इच्छितो की हे दृश्य लंडनमध्ये सुद्धा बघायला मिळू शकतं’
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की मुस्लीम महिलांचा लिलाव दर्शवत असलेल्या व्हायरल व्हिडीओचा सध्याच्या अफगाणिस्तान-तालिबान संघर्षाशी काहीएक संबंध नाही.
सदर व्हिडीओ २०१४ सालचा असून लंडनमध्ये काही आंदोलकांनी पथनाट्याद्वारे सिरीया आणि ईराकमधील आयसीस या दहशवादी संघटनेची अमानुष कृत्ये दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा: टँकरमधून महिला आणि बालकांची तस्करी चालू होती? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment