सोशल मीडियावर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही काही तरुण तरुणींचा फोटो व्हायरल होतोय. हा फोटो पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अलाहाबाद विद्यापीठातील (Allahabad University) विद्यार्थ्यांचा असल्याचे सांगितले जातेय.
फोटो शेअर करताना दावा केला जातोय की उत्तर प्रदेशातील अलाहाबाद विद्यापीठात दहशतवादाचा नवा अड्डा बनलाय. या विद्यापीठातील २५ विद्यार्थी बॉम्ब बनवताना पकडले गेले असून वसतिगृहाच्या ५८ खोल्या सील करण्यात आल्या आहेत. एवढ्या गंभीर घटनेवर देखील माध्यमे शांत आहेत कारण पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये एकाही मुस्लिम व्यक्तीचा समावेश नाही.
‘आतंकवाद का नया अड्डा इलाहाबाद विश्वविद्यालय हॉस्टल २५ छात्र बम बनते पकडे ५८ कमरे सील मिडिया खामोश क्योंकी एक भी मुस्लीम नाम नही’ अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केला जातोय.
फेसबुक, ट्विटरवर हे दावे अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहेत. हे दावे नव्याने व्हॉट्सऍपवरही व्हायरल होऊ लागल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अंबादास जरारे यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल होत असलेला फोटो गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च करून पाहिला असता मंदसौर संदेश या वृत्तपत्राची बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात पोलिसांच्या छाप्यात सेक्स रॅकेट उघडकीस आले. त्यावेळी ८ तरुणी आणि १५ तरुण ताब्यात घेतले गेले. त्याचवेळचा हा फोटो आहे.
या बातमीची पुष्टी करणाऱ्या दैनिक भास्कर सारख्या महत्वाच्या वृत्तपत्राच्या बातम्या देखील आम्हाला सापडल्या.
अलाहाबाद विद्यापीठामध्ये बॉम्ब बनवताना विद्यार्थी सापडले?
नाही. अलाहाबाद विद्यापीठात बॉम्ब बनविताना विद्यार्थी आढळले, त्यांना रंगे हाथ पकडले हे असे दावे चुकीचे आहेत परंतु हे खरे की १७ एप्रिल २०१९ रोजी प्रसिद्ध बातमीनुसार अलाहाबाद विद्यापीठाच्या ताराचंद वसतीगृहात पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यांत पोलिसांना बॉम्ब बनविण्याची सामुग्री सापडली. कारवाई दरम्यान कुणाला ताब्यात घेतल्याचा किंवा अटक केल्याचा कोणत्याही बातमीत उल्लेख नाही, केवळ ५८ खोल्या सील केल्या गेल्याचा उल्लेख आहे.
आदेश त्रिपाठी नामक युवकाने रोहित शुक्ला या २१ वर्षीय विद्यार्थ्यावर गोळी चालवली, यात त्याचा मृत्यू झाला होता. त्यांनतरच्या घडामोडींनंतर या छाप्याची घटना समोर आली. यावर समाजवादी पक्षाच्या नेत्या रिचा सिंह यांनी अलाहाबाद म्हणजे आताचे प्रयागराज जिल्हा प्रशासन आणि विद्यापीठ प्रशासनावर ताशेरे ओढले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की अलाहबाद विद्यापीठात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत बॉम्ब बनविण्याची सामुग्री सापडल्याचे तसेच वसतिगृहाच्या ५८ खोल्या सील करण्यात आल्या असल्याची बाब खरी आहे, पण ही घटना सध्याची नसून २०१९ मधील आहे.
पोलिसांनी २५ विद्यार्थ्यांना बॉम्ब बनविताना पकडल्याचे दावे मात्र फेक आहेत. तसेच व्हायरल फोटोचा देखील घटनेशी काहीएक संबंध नाही. फोटो मध्यप्रदेशातील सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या टोळीला ताब्यात घेण्यात आले होते.
हेही वाचा: केजरीवाल सरकारने दिल्लीत प्राथमिक शाळेचा मदरसा बनवलाय? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]