कर्नाटकाची राजधानी बंगळूरू येथील रेल्वे स्टेशनच्या (Bengaluru rly station) सहाव्या प्लॅटफॉर्मवरील वेटिंगरूमची मस्जिद (Masjid) बनवली गेलीय. याचा स्टेशनमास्तरला तपासही नाहीये. विचार करा जर ‘त्यांचे’ राज्य आले तर आपले काय होईल? अशा प्रकारच्या दाव्यांसह एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.
व्हायरल मजकूर:
बेंगलोर रेलवे स्टेशन के वेटींग रुम को कब मस्जिद बना दिया ये स्टेशन मास्टर को तक पता नहीं चला है….. जब पता चला तब बहुत देर हो चुकी थी. अब जरा सोचो जब उनका राज आ गया तो क्या क्या होगा?
‘forwarded many times’ या टॅगसह व्हॉट्सऍपवर या दाव्यांचे व्हायरल होण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निशिकांत गोळे आणि निलेश घरत यांनी सदर दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
हेच दावे ट्विटर आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायेत.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांच्या अनुषंगाने गुगल सर्च केले असता ‘द वायर‘चा सविस्तर रिपोर्ट आम्हाला सापडला.
वेटिंग रूमची मस्जिद बनवली?
रिपोर्टनुसार बंगळूरूच्या ‘क्रांतिवीर संगोळी रायान्ना’ म्हणजेच ‘KSR’ रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरील हमालांच्या रेस्टरूममध्ये ही नमाज पढण्याची जागा निर्माण केली आहे. प्रवाशांच्या वेटिंगरूममध्ये नव्हे तर हमालांनी त्यांना दिलेल्या जागेत ही नमाजाची जागा निर्माण केली आहे.
रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रिया:
रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ विभागीय व्यापार व्यवस्थापक कृष्णा रेड्डी यांची ‘द वायर’ने प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले,
“या प्रार्थनास्थळाविषयी आम्हाला आताच माहिती मिळालीय. ती हमालांची रूम होती आणि त्यांचीच रूम राहणार आहे. आम्ही त्यांना बंधुभावाने राहण्यास सांगितले आहे. त्यांना दिलेली ही रूम ते अंघोळीसाठी, आरामासाठी किंबहुना प्रार्थनेसाठीही वापरू शकतात. मग यात नमाज असो, पूजा असो किंवा ख्रिश्चन प्रेअर असो. त्यांना त्यांच्या पद्धतीने सर्वाना एकत्र घेऊन हवं ते करूदेत.”
– कृष्णा रेड्डी, वरिष्ठ विभागीय व्यापार व्यवस्थापक, रेल्वे प्रशासन बंगळूर
स्टेशनवर केवळ मस्जिद?
बंगळूरु स्टेशनवर हमाल रेस्टरूमची मस्जिद बनवल्याची बाब जोरदार व्हायरल केली गेली परंतु याच स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर हिंदू मंदिर आहे. तसेच जवळच एका खोलीत ख्रिश्चन प्रेअर साठी जागा आहे.
आता एवढ्यात ही मस्जिद बनली गेलीय?
हमाल संघटनेचे माजी सदस्य असलेले मुस्तफा यांनी ‘द वायर’ला याविषयी माहिती दिली.
सुरुवातील एक छोटी रूम होती, जेथे मुस्लीम नमाज पढत असत. हिंदू प्रार्थना करत. सगळे एकत्र आराम करत. पण ती रूम खूप छोटी होती म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनास विनंती केली आणि त्यांनी ही समोरची रूम दिली. ही रूम रिकामीच होती. आम्ही तिथे नमाज पढू लागलो. आजवर कधीच कुणाला याचा त्रास झाला नाही. आमच्या हिंदू बंधूंनीही कधी यावर आक्षेप नोंदवला नाही. पण आता काही लोक याचा खूप मोठा विषय करत आहेत. रेल्वे प्रशासनाने आम्हाला या सर्वात अखीच हस्तक्षेप करणार नाही असे आश्वासन दिले होते परंतु कदाचित त्यांचा दबाव वाढत गेल्याने प्रशासनाने आमच्या प्रार्थनेसाठी लागणारे साहित्य काढून टाकले. इथे जे मन्दिर आहे ते माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून ३०-३५ वर्षांपूर्वी बांधले होते.
– मुस्तफा, हमाल
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की बंगळूरु रेल्वे स्टेशनवर वेटिंग रूमची मस्जिद बनवली गेल्याचे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत. हमालांनी त्यांना दिलेल्या खोलीत ही जागा तयार केली होती. याचा सामान्य प्रवाशांना काहीएक अडथळा नव्हता. महत्वाचे म्हणजे स्टेशनवर हिंदू आणि ख्रिश्चन धर्मियांसाठीही प्रार्थनेच्या जागा आहेत.
हेही वाचा: राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या कृपेने मंदिरात पढले जातेय नमाज? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment