पद्मश्री सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना अंतिम संस्कारासाठी नेत असताना त्यांच्या पार्थिव देहाला भारतरत्न सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) खांदा दिल्याचे दावे करण्यासाठी एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय.
“आज एक गोष्ट समजली…. पुरस्कार महत्वाचा नसून कर्तृत्व महत्त्वाचं असत…. कारण आज एका पद्मश्रीला भारतरत्नाने खांदा दिला.भावपूर्ण श्रद्धांजली माई.” या अशा दाव्यासह सचिनने पार्थिव देहाला खांदा दिल्याचे दर्शवणारा फोटो व्हायरल केला जातोय.
फेसबुकनंतर व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश घरत,विलास जरे, राजू खरे आणि उमेश कांबळे यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च करून पाहिला असता त्या फोटोचे सत्य समोर आले.
हा फोटो आताचा नसून ३ जानेवारी २०१९ रोजीचा आहे. त्यामुळेच त्यातील एकही व्यक्तीच्या चेहऱ्यावर मास्क दिसत नाही. ते पार्थिव शरीर सिंधुताई सपकाळ यांचे नसून सचिन तेंडूलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे आजारपणाने निधन झाले.
या घटनेचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे.
सिंधुताई सपकाळ यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली आणि नंतर महानुभव पंथाच्या प्रथेप्रमाणे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. यामध्ये कुठेही सचिन तेंडूलकर यांचा सहभाग असल्याचा उल्लेख कुठल्याही बातमीत आम्हाला आढळला नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की अनाथांची माय संबोधल्या गेलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिव देहाला सचिन तेंडूलकरने खांदा दिल्याचे दावे फेक आहेत. व्हायरल फोटो सचिनने २०१९ साली त्याचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिव देहास खांदा देतानाचा आहे.
हेही वाचा: सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि कपिल देव यांची शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुरस्कारवापसी?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment