सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये काही तरुण आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करताना दिसताहेत. सदर तरुणाला बर्थ डे बम्प्स दिले जाताहेत. हे सर्व सुरु असताना अचानकच तो तरुण बेशुद्ध पडलेला दिसतोय.
बेशुद्ध झालेल्या तरुणाला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जाताहेत. पण त्याच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. अशा स्थितीत बाकीचे मित्र त्याला हॉस्पिटलकडे घेऊन जात असल्याचे दिसतेय. व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याच्या नव्या फंडाने मित्राचा जीव घेतला आहे.
व्हाट्सअपवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
साधारणतः 3 मिनिटे 13 सेकंदाचा हा व्हिडीओ संपल्यानंतर अशा पद्धतीने वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.
अगदी ठळक अक्षरातील आवाहनाच्या खालच्या बाजूला व्हिडीओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतानाच हा व्हिडीओ केवळ जागरूकता निर्माण करण्यासाठी बनविण्यात आल्याची सूचना देखील बघायला मिळतेय. याचाच अर्थ असा की ही खरी घटना नसून अशा घटनांच्या संदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी शूट करण्यात आलेली शॉर्ट फिल्म आहे.
व्हायरल व्हिडीओ रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता हमसा नंदिनी या अधिकृत फेसबुक पेजवरून २८ नोव्हेंबर रोजी हा व्हिडीओ शेअर केला गेला असल्याचे बघायला मिळाले. या फेसबुक पोस्टच्या कॅप्शनमध्ये देखील तोच मेसेज बघायला मिळतोय, जो व्हिडिओच्या शेवटी आहे.
पेजच्या व्हिडीओ सेक्शनमध्ये अशाच प्रकारचे इतरही अनेक व्हिडीओज बघायला मिळतात. हे व्हिडीओज केवळ जागरूकता निर्माण करण्यासाठी बनवले गेले आहेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ खऱ्या घटनेचा नसून अशा घटनांविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी बनविण्यात आलेली ही शॉर्ट फिल्म आहे.
हेही वाचा- ८ वर्षीय मुलाला काठीने मारहाण करणाऱ्या नराधमाच्या व्हायरल व्हिडीओचे सत्य आले समोर!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment