Press "Enter" to skip to content

उत्तर प्रदेश निवडणुकीत एमआयएममुळे भाजपला 165 जागांवर फायदा झाल्याचे दावे फेक!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील भाजपने मोठा विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा राज्याची सत्ता काबीज केली. भाजपच्या उत्तर प्रदेश विजयानंतर सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये दावा केला जातोय की या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षामुळे भाजपला 165 जागांवर विजयासाठी फायदा झाला.

Advertisement

व्हायरल मेसेजमध्ये भाजपने 7 जागांवर 200 मतांच्या फरकाने, 23 जागांवर 500 मतांच्या फरकाने, 49 जागांवर 1000 मतांच्या फरकाने आणि 86 जागांवर 2000 मतांच्या फरकाने विजय मिळवला असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व एकूण 165 जागांवर भाजपला एमआयएममुळे झालेल्या मतविभाजनाचा फायदा मिळाला असल्याचे सांगण्यात येतेय.

अशाचप्रकारचे दावे व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश मालानी यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने उत्तर प्रदेशची निवडणूक केवळ 95 जागांवर लढवली होती. त्यामुळे भाजपला 165 जागांवर एमआयएमच्या मतविभाजनाचा फायदा झाल्याच्या दाव्यांना काहीही अर्थ उरत नाही. 

भाजपचा 7 जागांवर 200 मतांच्या फरकाने विजय?

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील सर्वात कमी मताधिक्याने विजय भाजपच्या अशोक राणा यांना मिळाला आहे. अशोक राणा यांनी धामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवताना समाजवादी पक्षाच्या नईम उल हसन यांचा 203 मतांनी पराभव केला. म्हणजेच कुठल्याही उमेदवाराने 200 पेक्षा कमी मतांनी विजय संपादन केलेला नाही. विशेष म्हणजे या मतदारसंघात एमआयएमने निवडणूक लढवली नव्हती.

भाजपचा 23 जागांवर 500 मतांच्या फरकाने विजय?

उपलब्ध माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत 11 उमेदवारांना 500 किंवा त्यापेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय मिळाला आहे. यामध्ये भाजपच्या 7 आणि समाजवादी पक्षाच्या 4 उमेदवारांचा समावेश आहे. अगदी याच प्रकारे 500 ते 1000 मतांच्या फरकाने विजय मिळालेल्या उमेदवारांची संख्या आहे 4. यामध्ये 2 उमेदवार समाजवादी पार्टीचे, 1 उमेदवार भाजपचा आणि 1 उमेदवार आहे निर्बल इंडियन शोषित हमारा आम दलाचा.

भाजपचा ८६ जागांवर २००० मतांच्या फरकाने विजय?

आता 1000 ते 2000 मतांच्या फरकाने विजय संपादन करणाऱ्या उमेदवारांचा विचार केला असता ही संख्या आहे 14. यामध्ये भाजप आणि मित्र पक्षांचे 9, समाजवादी पार्टीचे 4 आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराचा समावेश असल्याचे बघायला मिळतेय.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये एमआयएमला केवळ 0.47% मते मिळाली. एमआयएमला मिळालेली मते ही अगदी नोटाला मिळालेल्या मतांपेक्षा (0.69%) देखील कमी आहेत. माध्यमांमधील निवडणूक आकडेवारीच्या विश्लेषणानुसार समाजवादी पक्षाला 7 जागांवर एमआयएमचा फटका बसला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत एमआयएममुळे भाजपला 165 जागांवर फायदा झाल्याचे दावे चुकीचे आहेत. एमआयएमने केवळ 95 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातल्या केवळ 2 ठिकाणी एमआयएमचे उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकले. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत एमआयएमला मिळालेली मते ही नोटा पेक्षा देखील कमी आहेत.

हेही वाचा- अखिलेश यादव मुख्यमंत्री न बनू शकल्याने प्रयागराजमध्ये 3 विद्यार्थ्यांची आत्महत्या? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा