सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शिवीगाळ करत एका साधूचे केस कापताना दिसत आहे. या तरुणाकडून त्या साधूला मारहाण करण्यात येत असल्याचे देखील बघायला मिळतेय. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील खांडवा येथील असून साधूला शिवीगाळ करून त्याचे मुंडन करणारा तरुण मुस्लिम धर्मीय असल्याचा दावा करण्यात येतोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या उजवीकडील वरच्या कोपऱ्यात ‘पृथ्वी चक्र’चा लोगो बघायला मिळतोय. हाच धागा पकडून युट्युबवर शोध घेतला असता आम्हाला हा व्हिडीओ ‘पृथ्वी चक्र’ या फेसबुक पेजवरून 24 मे 2022 रोजी शेअर केला गेला असल्याचे बघायला मिळाले.
फेसबुक पोस्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार घटना मध्य प्रदेशातील खांडवा येथील असून हॉटेल मालक प्रवीण याने अघोरी साधूस मारहाण करत त्याची दाढी कापल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती देखील या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता ‘न्यूज 24’ च्या युट्यूब चॅनेलवर या घटनेसंदर्भातील रिपोर्ट बघायला मिळाला. या रिपोर्टनुसार आरोपीचे नाव प्रवीण गौर असे आहे. घटनेच्या वेळी आरोपी नशेत असल्याचे देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
दैनिक भास्करने देखील या घटनेसंदर्भात बातमी प्रसिद्ध केली आहे. या बातमीनुसार प्रवीण हा एका हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याने साधूकडे आपल्या भविष्याविषयी विचारणा केली होती. प्रवीणने आपली घर सोडून गेलेली पत्नी परत येईल का याविषयी विचारणा केली असता साधूने ती परत येणार नाही असे सांगितले होते.
चिडलेल्या प्रवीणने साधूला शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच साधूला जवळच्या सलून मध्ये घेऊन जात त्याचे मुंडन करण्याचा प्रयत्न केला. सलून चालकाने असे करण्यास नकार दिल्यावर प्रवीणने स्वतःच साधूची दाढी कापली. याप्रकरणी पोलिसांनी प्रवीणला ताब्यात घेतले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये शिवीगाळ आणि मारहाण करत साधूची दाढी करणारा तरुण मुस्लिम नसून हिंदूच आहे. घटना मध्य प्रदेशातील खांडवा येथील असून साधूला मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव प्रवीण गौर आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा- छोट्या हिंदू मुलांना विजेचे झटके देऊन त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment