सोशल मीडियावर दोन फोटोज मोठ्या प्रमाणात शेअर केले जाताहेत. दावा करण्यात येतोय की दावनगिरे मेडिकल असोसिएशनच्या महिला विंगच्या टूर बसला झालेल्या अपघातात १७ महिला डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला (17 gynecologists died in accident). सर्व महिला डॉक्टर असून बहुतेक स्त्रीरोगतज्ञ असल्याचं देखील सांगण्यात येतंय.
माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील आणि विधानसभेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात पोस्ट टाकण्यात आलीये.
या व्यतिरिक्त ट्विटर, फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक युजर्सकडून कॉपी पेस्ट दाव्यांसह हे फोटोज शेअर केले जाताहेत.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही गुगल किवर्डच्या साहाय्याने ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ‘दै. जागरण’च्या वेबसाईटवर १५ जानेवारी २०२१ रोजीची बातमी मिळाली.
बातमीनुसार कर्नाटकमधील इतिगत्ती गावाजवळ मिनी बस आणि टिप्परमध्ये झालेल्या अपघातात कमीतकमी ११ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ९ महिला आणि २ ड्रायव्हरचा समावेश आहे.
त्यानंतर ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातमी देखील आमच्या वाचनात आली. या बातमीनुसार दावणगेरे येथील सेंट पॉल कॉन्व्हेंटमधील माजी विद्यार्थिनींनीचा समूह ट्रीपसाठी गोव्याला जात असताना पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग 47 वर झालेल्या अपघातात 11 जण ठार झाले.
दावनगिरे येथील प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वीणा प्रकाश यांचाही मृतांमध्ये समावेश असल्याचं बातमीत सांगण्यात आलंय, मात्र बातमीमध्ये कुठेही या अपघातातील इतर मृत महिला देखील स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याचा उल्लेख आढळला नाही.
अधिक शोध घेतला असता आम्हाला ‘इंडिया टूडे’चा रिपोर्ट मिळाला. धारवाडचे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पी.कृष्णकांत यांनी ‘इंडिया टूडे’शी बोलताना स्पष्ट केले आहे की अपघाताची बातमी खरी असून १७ महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याचा दावा चुकीचा आहे. मृतांमध्ये फक्त एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. बाकीच्या सर्व महिला दावणगेरे येथील सेंट पॉल कॉन्व्हेंटच्या माजी विद्यार्थी होत्या.
दावणगिरे मेडिकल असोशिएशनचे सरचिटणीस डॉ. प्रसन्ना अनाबेरू यांनी देखील १७ डॉक्टरांच्या मृत्यूचा दावा फेटाळून लावत अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी फक्त एक महिला डॉक्टर असल्याचं सांगितलं. अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरांचं नाव डॉ. वीणा प्रकाश असून त्या जेएमएम वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीशास्त्र विषयाच्या प्राध्यापक होत्या, अशीही माहिती डॉ.अनाबेरू यांनी दिली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर केला जात असलेला दावनगिरे मेडिकल असोसिएशनच्या महिला विंगच्या टूर बसला झालेल्या अपघातात १७ महिला डॉक्टरांचा जागीच मृत्यू (17 gynecologists died in accident) झाल्याचा दावा चुकीचा आहे.
कर्नाटकमधील इतिगत्ती गावाजवळ झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ९ महिला आहेत. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दावनगिरे येथील प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वीणा प्रकाश या एकमेव डॉक्टरचा समावेश आहे.
हे ही वाचा- गुगल पे, फोन पे सारख्या UPI व्यवहारांवर १ जानेवारीपासून आकारले लागणार शुल्क?
[…] […]