आजकाल सोशल मीडियात कोरोना संदर्भात रोजच नवनवीन दावे-प्रतिदावे करण्यात येतात. सोशल मिडीयावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडीओच्या आधारे दावा केला जातोय की कोरोना पेशंटचे अवयव गायब करण्यात येत आहेत.
‘MNS’ या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कोरोनाच्या नावावर नवीन स्कॅम सुरु झाल्याचा आरोप करण्यात आलाय. ही पोस्ट १ हजारहून अधिक युजर्सनी शेअर केलीये.
‘पीसीबी टुडे’ पोर्टलच्या फेसबुक पेजवरून देखील त्याच दाव्यांसह तोच व्हिडीओ शेअर झालाय. PCBToday.in ची पोस्ट देखील ४८७ युजर्सनी शेअर केलीये.
याच व्हायरल दाव्यांना आधार देण्यासाठी दुसरा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये नागरिक पोलिसांशी वाद घालत असल्याचे दिसत आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूरचे प्रसिद्धी प्रमुख विकास वाघमारे यांनी भाजपशी संबंधित फेसबुक पेजेसवर हा व्हिडीओ टाकलाय आणि तो अधिकाधिक व्हायरल करण्याचं आवाहन केलाय.
याव्यतिरिक्त सोशल मिडीयावर इतरही अनेकांनी असेच दावे करणारे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले असल्याची बाब ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शंकर साळवे, सचिन झगडे आणि मिनाज लाटकर यांनी निदर्शनास आणून दिली.
पडताळणी :
कोव्हीड१९ डिटेक्ट झालेल्या रुग्णाला, कुटुंबाला ज्या राज्यात वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली जाते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करायला आप्तेष्ट घाबरतात, संसर्ग होऊ नये म्हणून प्रेम प्लास्टिकमध्ये गुंडाळून दिले जाते अशा ठिकाणी व्हायरल दाव्यात ‘प्रेताला अंघोळ घातली’ आणि मग समजले अवयव नाहीत हे विधानच अशक्य कोटीतील वाटते.
तरीही आम्ही पडताळणी सुरु केली. व्हायरल दाव्याला पुष्टी देण्यासाठी दोन व्हिडीओज मोठ्या प्रमाणात जोडले गेले आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे हे शोधण्यासाठी आम्ही एकेक व्हिडीओ व्यवस्थित पाहिला.
व्हिडीओ पहिला–
पहिला २ मिनिट ५१ सेकंदाचा व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघितला. त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की जमलेली गर्दी एका अधिकाऱ्याशी कुठल्यातरी कारणावरून हुज्जत घालते आहे.
गोंधळ नेमका का सुरु आहे यामागचं कारण स्पष्ट होत नसलं, तरी गोंधळामागचं कारण कोरोना संदर्भातलं, कोरोना रिपोर्ट संदर्भातलं असल्याचं व्हिडीओमधील संवादावरून लक्षात येतंय. गर्दीतल्या लोकांकडून संबंधित अधिकाऱ्याकडे आयुक्तांना बोलावण्याचा आग्रह धरला जातोय.
व्हिडीओ दुसरा-
दुसऱ्या व्हिडीओमध्ये लोकांची गर्दी आहे. काहींच्या हातात बॅग आहेत. पोलिसांशी, अधिकाऱ्यांशी वाद घालतानाचा आवाज आहे. आणि ही एकंदर भाषा आगरी असल्याचे जाणवत आहे.
दोन्ही व्हिडीओज मधील विशेष गोष्ट अशी की कोरोनामुळे पेशंटचा मृत्यू होऊन अवयव गायब करण्यात आले असल्याचा जो दावा करण्यात येतोय, त्याबद्दल व्हिडिओत कुणीही कसलाही उल्लेख करताना आढळत नाही.
हे प्रकरण मानोरी भागातील असल्याचं दाव्यात सांगितल्यामुळे आम्ही मानोरीच्या नगरसेविका गीता भंडारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी काय सांगितलं पहा:
‘ तीन जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते त्यामुळे मानोरी मधल्या संपर्कात आलेल्या लोकांना institutional quarantine करायचं होतं. लोक ऐकत नव्हते, आम्ही घरीच आयसोलेट होऊ म्हणून BMC वाल्यांशी हुज्जत घालत होते. त्यामुळे BMC वाल्यांच्या बोलवण्यावरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. या व्यतिरिक्त त्या गर्दीचा संबंध नाही.
हे सर्व कोळी समाजाचे लोक आहेत. यांच्या गावात जायला बोटीने जावं लागतं. त्यांचा रोजचा आहार मासे आहे. अशात त्यांना कुठल्या दवाखान्यात किंवा इतर ठिकाणी क्वारंटाईन केलं तर खाण्याचे राहण्याचे हाल होतील. असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्यांनी आपापल्या घरात राहूद्या आम्ही पूर्ण काळजी घेऊ म्हणण्यासाठी एवढा गोंधळ घातला होता. त्याचाच हा व्हिडीओ आहे. आमच्या या परिसरात एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे ऑर्गन काढून घेतले वगैरे म्हणाण्याचा संबंधच नाही.’
नगरसेविका गीता भंडारी यांच्या व्यक्तव्याला पडताळून पाहण्यासाठी आम्ही मानोरी गाव ज्या मुंबईच्या मीरा-भायंदर परिसरातील गोराई पोलीस स्टेशन अंतर्गत येते तेथील PSI जगताप यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही गोराई परिसरात अजूनही कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचेच सांगितले.
वस्तुस्थिती :
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झालंय की मानोरी, गोराई परिसरात एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही.
मुळात व्हिडिओमध्ये देखील कोरोना पेशंटच्या मृत्यू झाला असल्याचा किंवा मृत पेशंटचे अवयव गायब झाले असल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे ही बाब नेमकी कुठून आली हे समजायला मार्ग नाही.
सहाजिकच सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ संदर्भातील दाव्यांना कुठलाही आधार नाही. कुठल्याही पुराव्यांशिवाय फेक दाव्यांसह सोशल मिडीयावर हा व्हिडीओ शेअर केला जातोय.
हे ही वाचा- कोरोना साथीला बनावट म्हणणारे डॉ. विश्वरूप आणि हर्षद रुपवतेंचा लेख किती विश्वासपात्र?
[…] […]
[…] मराठी’ने केलेली पडताळणी आपण ‘येथे‘ वाचू […]