राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची माध्यमांशी बोलतानाची एक क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. या क्लीपमध्ये उद्धव ठाकरे एक तर तुम्ही आता पंचांग फाडून टाका, लोकांना सांगा तुमचे फालतू सण थोतांड बंद झाली, तुम्ही आहात तसे जगताय हे खूप झालं’ अशा प्रकारची प्रतिक्रिया देत असताना दिसताहेत.
‘पंचांग फाडून टाका, हिंदू सण हे फालतू झाले – उद्धव ठाकरे.. सर्वांनी मतदान करताना लक्षात ठेवा’ अशा कॅप्शनसह ठाकरेंच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर केला जातोय.
‘पंचांग फाडून टाका, हिंदू सण हे फालतू झाले सत्ते साठी MIM शी युती आणी वलाचारी पत्करत हिंदूंच्या सणांना ग्रंथांना फाडून टाका म्हणणा-या या हिंदूंद्वेष्ट्या शिवसेनेला व ऊद्धव ठाकरेला हिंदूसामाजातील सर्वांनी मतदान करताना लक्षात ठेवा’ अशा कॅप्शनसह भारतीय जनता पार्टी घाटंजीच्या फेसबुक पेजवरून तोच व्हिडीओ शेअर केला गेलाय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक युवराज गायकवाड यांनी फेसबुक, ट्विटरप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे लक्षात आणून देत पडताळणीची विंनती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओचा मूळ व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यातील काही शब्द कीवर्ड्स म्हणून वापरले आणि गुगल सर्च केले असता विविध माध्यमांच्या बातम्या बघायला मिळाल्या. या बातम्या ११ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या आहेत.
हाच धागा पकडत शोध घेतला असता ‘झी २४ तास’च्या युट्यूब चॅनेलवर ठाकरेंच्या या वक्तव्या विषयीची बातमी बघायला मिळाली. त्यातीलच ‘शांततेचा अतिरेक होतोय’ असे लिहिलेली चौकट क्रॉप करून, व्हिडीओ अर्धवट एडीट करून व्हायरल केला गेलाय. मूळ बातमीमध्ये आपण बघू शकता की सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्रीवर बंदीचे आदेश दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
उद्धव ठाकरेंचे संपूर्ण वक्तव्य:
‘तुम्ही आता पंचांग फाडून टाका, लोकांना सांगा तुमचे फालतू सण थोतांड बंद झाली, तुम्ही आहात तसे जगताय हे खूप झालं हाच एकदा काय तो आदेश काढून टाका म्हणजे सणावाराचं विषय संपून जाईल. मग फटाके नाही राहणार आणि सणही नाही राहणार. शांततेचा अतिरेक झाला तर असंतोषाचा स्फोट होईल. एक तर विविध कर आणि नियम-अटींमुळे सण आणि उत्सवाचे वातावरण कमी होत चालले आहे. त्यामुळे जर कोणी आपापल्या परीने सण साजरे करीत असेल तर त्याच्या कोणीही आड आलेले शिवसेना सहन करणार नाही‘
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘पंचांग फाडून टाका, हिंदू सण फालतू झालेत’ असे वक्तव्य केलेली व्हिडीओ क्लिप २०१७ सालची असून एडीट केलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बंदीचा आदेश काढला होता. न्यायालयाच्या या आदेशाच्या विरोधातील भूमिका म्हणून उद्धव ठाकरेंनी ‘पंचांग फाडून टाका’ अशी उपरोधिक टिप्पणी केली होती.
हेही वाचा: उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या आधारे इंदिरा गांधींचा फोटो ठेवल्याचे दावे फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: ‘पंचांग फाडून टाका, हिंदू सण फालतू झाल… […]