शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्या बेधडक शैलीतील वक्तव्यांसाठी नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असतात. राज्यातील सध्याच्या राजकीय संकटाच्या परिस्थितीत देखील ते त्यांच्या आक्रमक शैलीमध्ये शिवसेनेतील बंडखोर नेत्यांना आव्हान देताना बघायला मिळताहेत.
अशातच संजय राऊत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर रडणाऱ्या भावमुद्रा बघायला मिळताहेत. व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की शेवटी भक्तांनी संजय राऊत यांना रडकुंडीला आणलेच.
राज्यातील सध्या निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ शेअर केला जातोय. राज्यातील राजकीय संकटामुळे संजय राऊतांना रडू कोसळल्याचा दावा केला जातोय.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही संजय राऊतांना रडू कोसळल्या संबंधीच्या बातम्या शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला अशा प्रकारची बातमी बघायला मिळाली नाही. त्यानंतर व्हायरल व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता ‘आज तक’च्या युट्यूब चॅनेलवर 21 जून 2022 रोजीची संजय राऊत यांची मुलाखत बघायला मिळाली.
संपूर्ण मुलाखत काळजीपूर्वक बघितली असता कुठेही राऊतांना रडू कोसळले असल्याचे बघायला मिळाले नाही. राज्यातील सध्याच्या घटनाक्रमाविषयी ते या मुलाखतीत बोलताहेत. व्हायरल व्हिडिओमधील संजय राऊत आणि ‘आज तक’च्या मुलाखतीमधील संजय राऊत यांच्या भावमुद्रा तसेच त्यांच्या पाठीमागची दृश्ये एकमेकांशी जुळणारी आहेत.
त्यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओतील राऊतांच्या चेहऱ्यावरील रडणाऱ्या भावमुद्रेविषयी अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला असता स्नॅपचॅट या सोशल मीडिया ऐपच्या ‘क्राइंग फिल्टर’विषयी माहिती मिळाली.
स्नॅपचॅटच्या या फिल्टरच्या माध्यमातून चेहऱ्यावर रडण्याच्या भावमुद्रा जोडल्या जाऊ शकतात. राऊत यांचा व्हायरल व्हिडीओ याच ‘क्राइंग फिचर’च्या मदतीने बनविण्यात आला आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील संजय राऊत यांचा रडणाऱ्या भावमुद्रेसह व्हायरल होणारा व्हिडीओ खरा नसून तो स्नॅपचॅटच्या क्राइंग फीचरच्या मदतीने बनविण्यात आलेला आहे.
हेही वाचा- एकनाथ शिंदे नशेत असल्याचे दर्शवणारा व्हिडीओ अर्धवट! जाणून घ्या सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment