सोशल मीडियावर अनेकदा काँग्रेस हा मुस्लिमधार्जिणा पक्ष असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा कुठल्याश्या दर्ग्यातील व्हिडीओ शेअर केला जातोय. या व्हिडिओच्या आधारे दावा केला जातोय की नमाज पढणाऱ्या राहुल गांधी यांनी इस्लामचा (Islam) स्वीकार केला असून ते हिंदुविरोधी आहेत.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या पडताळणी दरम्यान आमच्या लक्षात आले की हाच व्हिडीओ डिसेंबर २०१८ मध्ये देखील व्हायरल झाला होता. छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर राहुल गांधी यांनी इस्लामचा स्वीकार केला असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता.
व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही काही किवर्डसह युट्युबवर व्हिडिओचा शोध घेतला. त्यावेळी आम्हाला ‘सहारा समय’च्या युट्यूब चॅनेलवरून १० सप्टेंबर २०१६ रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ मिळाला.
‘सहारा समय’च्या बातमीनुसार हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगरमधील जगप्रसिद्ध कछौछा शरीफ़ दर्ग्याचा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) दर्ग्याला भेट देऊन मखदूम साहब दर्ग्यावर चादर चढविली होती. याच बातमीमध्ये पुढे असेही सांगण्यात आले आहे की दर्ग्यावर जाऊन चादर चढविण्यापूर्वी राहुल गांधी यांनी अयोध्येतील हनुमान गढीवर जाऊन दर्शन देखील घेतले होते.
या माहितीच्या आधारे आम्ही राहुल गांधी यांच्या हनुमानगढी येथील भेटीविषयी शोध घ्यायला सुरुवात केली. आम्हाला ‘एबीपी न्यूज’च्या युट्युब चॅनेलवर राहुल गांधींनी ज्या दिवशी दर्ग्याला भेट दिली होती त्याच्या आदल्या दिवशीचा म्हणजेच ९ सप्टेंबर २०१६ रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ मिळाला.
‘एबीपी न्यूज’च्या बातमीनुसार राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील ‘किसान यात्रे’च्या पाचव्या दिवशी हनुमानगढीवर जाऊन दर्शन घेतले आणि महंत ज्ञानदास यांची भेट घेतली. देवरीयाच्या रुद्रपूर येथून सुरु करण्यात आलेली ‘किसान यात्रा’ अयोद्ध्येत पोहोचल्यानंतर राहुल गांधी हनुमान गढीवर गेले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील राहुल गांधींच्या धर्म परिवर्तनाचे दावे फेक आहेत. राहुल गांधींनी २०१६ मध्ये उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगरमधील कछौछा शरीफ़ दर्ग्याला भेट दिली होती. त्यावेळचा व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होतोय. विशेष म्हणजे दर्ग्याला भेट देण्याच्या आदल्या दिवशी राहुल गांधींनी अयोध्येत हनुमानगढीवर जाऊन दर्शन घेतले होते.
हे ही वाचा- राहुल गांधी यांच्यावर विरोधकांनी आजवर डागलेल्या ‘फेक’ तोफा!
Be First to Comment