फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढले म्हणून शिक्षकाची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर जे वातावरण चिघळले, ते अजूनही शांत होत नाहीये. अशातच एक व्हिडीओ आपल्याकडेही व्हायरल होतोय. त्यासोबत फ्रान्सने रस्त्यावर नमाज पढणाऱ्या मुस्लीम लोकांना रणगाडे लाऊन हाकलून दिल्याचे (France kicked off street prayer) सांगण्यात येतेय.
रस्त्यावर बसलेले लोक आणि समोर रणगाडे दिसत आहेत. त्यातून पाण्याचा फवारा लोकांवर मारला जातोय. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचे दिसतेय. असा हा व्हिडीओ शोषल मीडियात दणदणीत व्हायरल होतोय. श्री राम लल्ला
प्रोफाईलला कपाळी टिळा आणि कव्हर फोटो म्हणून राम मंदिराची इमेज असलेल्या ‘किम जोंग उन’ नावासह झेंडा असलेल्या ट्विटर अकाऊंटवरूनही हा व्हिडीओ याच दाव्यासह शेअर झालाय.
व्हॉट्सऍपवरही हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी निदर्शनास आणून दिले.
पडताळणी:
चेकपोस्ट मराठीने व्हायरल व्हिडीओच्या किफ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिल्या तेव्हा युट्युबवरील एक व्हिडीओ आम्हाला सापडला.
९ नोव्हेंबर २०१२ रोजी अपलोड केलेला हा व्हिडीओ व्हायरल व्हिडीओतील दृश्यांशी तंतोतंत जुळत आहे. व्हिडीओसोबत ‘Gaz bombalı ‘sivil Cuma namazı – Yüksekova – Gever’ असे कॅप्शन आहे.
याचे गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने ट्रान्सलेशन करून पाहिले असता ”Civil Friday prayer with gas bombs – Yüksekova – Gever’ असा इंग्रजी अर्थ आम्हाला मिळाला. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे गुगलने ही भाषा टर्किश असल्याचे डीटेक्ट केले.
याच कीवर्ड्सच्या आधारे सर्च केले असता ‘Haber7‘ या टर्किश न्यूज वेबसाईटवर विस्तृत बातमी सापडली. बातमीनुसार, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा एक गट सेन्झीझ टॉपल स्ट्रीटवर एकत्र आला आणि तुरूंगात सुरू असलेल्या उपोषणाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.
अतिरेकी संघटना मानली गेलेल्या पीकेकेच्या (कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी) बाजूने विद्यार्थी कॅलेन झेंडे घेऊन घोषणा देत होते आणि विविध इशारे देऊनही ते नमले नाहीत. त्यानंतर पोलिस दलांनी पाण्याच्या तोफांचा आणि अश्रुधुराचा वापर केला. त्याच ठिकाणी शुक्रवारच्या नमाज पठण करणा मुस्लिमांना पाण्याच्या तोफांचा आणि अश्रुधुराचा त्रास झाला.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल व्हिडीओ (France kicked off street prayer) तुर्की मधील असून ८ वर्षे जुना असल्याचे स्पष्ट झालेय. त्याचा फ्रान्समधील घडामोडींशी काहीएक संबंध नाही. फ्रान्समधील घटनांचा वापर करत भारतातील मुस्लीमद्वेष्टे सातत्याने फेक न्यूज पसरवत आहेत. या आधी सुद्धा ‘चेकपोस्ट मराठी’ने अशा दाव्यांची पोलखोल केली आहे.
हे ही वाचा- फ्रान्समध्ये हत्या झालेल्या शिक्षकाकडून विस्थापितांच्या स्वागताचा दावा करत भाजप नेत्याची फेक पोस्ट!
Be First to Comment