Press "Enter" to skip to content

केरळातील बोगद्याचा व्हिडीओ रत्नागिरीच्या कशेडी घाटातल्या नव्या बोगद्याचा म्हणून व्हायरल!

सोशल मीडियावर एका भुयारी मार्गाचा व्हिडीओ शेअर केला जातोय. साधारणतः सव्वा मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये दोन बाईकस्वार एका मोठ्या भुयारी मार्गातून प्रवास करताना दिसताहेत. अतिशय अद्ययावत भुयारी मार्गातून केला जाणारा प्रवास ते सेलिब्रेट करताहेत.

व्हिडिओत इतरही अनेक जण आनंद साजरे करताना दिसताहेत. कॅमेरा घेऊन असलेले माध्यमांचे प्रतिनिधी देखील व्हिडिओत दिसताहेत. सोशल मीडियावर दावा केला जातोय की हा व्हिडीओ रत्नागिरीतील कशेडी घाटातील नवीन बोगद्याचा (Kashedi Ghat Tunnel) आहे. 

Advertisement

पडताळणी:

व्हिडीओ काळजीपूर्वक बघितल्यास सर्वात सर्वप्रथम जी गोष्ट लक्षात येते ती म्हणजे व्हिडिओत दिसणाऱ्या लोकांचा पेहराव. तो महाराष्ट्रीयन लोकांचा नाही. अनेकजण दाक्षिणात्य पद्धतीच्या पेहरावामध्ये बघायला मिळताहेत.

व्हिडीओ नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही काही किवर्डसह शोध घेतला. आम्हाला केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं 31 जुलै रोजीचं ट्विट मिळालं.

गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये केरळमधील कुथीरण येथील भुयारीमार्गाच्या (kuthiran tunnel) उदघाटनाची माहिती दिली होती. हा केरळमधील पहिलाच भुयारीमार्ग असून यांमुळे केरळची कर्नाटक आणि तामिळनाडूशी असलेली कनेक्टिव्हीटी सुधारणार असून 1.6 किमी लांबीचा हा बोगदा पीची-वाझनी वन्यजीव अभयारण्यातून जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी ट्विटमध्ये दिली होती.

कशेडी घाट बोगद्याच्या (Kashedi Ghat Tunnel) कामाच्या प्रगतीसंदर्भात ‘सामना’मध्ये प्रसिद्ध बातमीनुसार मुंबई गोवा महामार्गावरील अवघड कशेडी घाटाला पर्याय म्हणून तयार करण्यात येत असलेल्या कशेडी बोगद्याचे काम प्रगतीपथावर असले तरी बोगदा पूर्ण होण्यास 2022 साल उजाडणार असल्याचे संकेत ठेकेदार कंपनीने दिले आहेत.

कशेडीचा डोंगर पोखरून तयार करण्यात येत असलेल्या या बोगद्यामुळे 18 किलोमीटरचा कशेडी घाट केवळ 10 मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार आहे. सध्या हा घाट पार करण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागतो.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर रत्नागिरीतील कशेडी घाटातील बोगद्याचा म्हणून शेअर केला जात असलेला व्हिडीओ केरळमधील कुथीरण येथील भुयारीमार्गाचा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच या भुयारीमार्गाचे उदघाटन केले आहे.

हेही वाचा- चिपळूणमधील रस्त्यावरील मगरीचा म्हणून शेअर केला जातोय कर्नाटकातील व्हिडीओ!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा