Press "Enter" to skip to content

तमिळनाडूतील सैनिकाच्या आत्महत्येचा व्हिडीओ महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा म्हणून व्हायरल!

जमावासमोर वीजेच्या ट्रान्सफॉर्मरवर चढून हाय होल्ट तारेस पकडून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा अतिशय धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियात शेतकऱ्याच्या नावे शेअर केला जातोय. शेतकरी बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी हा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचेल इतका शेअर करा असे आवाहन देखील त्यात केले जातेय.

Advertisement

‘ही पोस्ट इतकी शेअर करा की ती’ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहचेल व आम्हा शेतकरी बांधवांना न्याय मिळेल. आपला एक आशावादी शेतकरी. शेतकरी वाचला तर सरकार वाचेल. जो पुढे पाठवणार नाही तो शेतकऱ्याच्या पोटचा नाही’ असा मजकूर लिहिलेला तो २८ सेकंदाचा हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ व्हायरल केला जातोय.

Man attempting suicide by transformer viral video been shared as he is a farmer
Source: Whatsapp

टीप: व्हिडीओतील दृश्ये क्लेशकारक असल्याने आम्ही संपूर्ण व्हिडीओ अथवा त्याची लिंक येथे शेअर करत नाही आहोत.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अशोक उरुणकर यांनी सदर व्हायरल व्हिडीओविषयी पडताळणीची विंनती केलीय. व्हॉट्सऍपवर सदर व्हिडीओ ‘Forwarded many Times‘ या टॅगसह शेअर होतोय.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या कीफ्रेम्स गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्या असता ८ जानेवारी २०२० रोजी ‘तेलुगु न्यूज 18’ ने प्रकाशित केलेली बातमी बघायला मिळाली. या बातमीतील तेलुगु मजकूर गुगल ट्रान्सलेटरच्या सहाय्याने भाषांतरीत केला असता सदर घटना तमिळनाडू येथील असून आत्महत्या करणारी व्यक्ती भारतीय सैन्यातील जवान असल्याचे समजले.

Source: Telugu News 18

याचीच पुनर्पडताळणी करण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ची ८ जानेवारी २०२० रोजीची बातमी मिळाली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव पी. मुथ्थू असे असून तो २५ वर्षीय सैनिक आहे. घटनेच्या साडेतीन महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. हुंड्यासाठी तो आणि त्याचे कुटुंब पत्नीचा छळ करत होते असा त्यावर आरोप होता. छळास कंटाळून त्याच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान तिचे निधन झाले.

सदर प्रकरणात मुथ्थूची चौकशी चालू होती. सदर बाबींना त्रासून त्याने मदुराई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. टाईम्सच्या बातमीनुसार त्यावर उपचार चालू होते. पुढे तो यातून बरा झाला किंवा नाही याविषयी अधिकृत माहिती मिळाली नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणारा इसम शेतकरी नसून कौटुंबिक त्रासाला कंटाळलेला भारतीय सैन्यातील एक कर्मचारी होता. तसेच सदर घटना आताची नसून २०२० मधील आहे. या व्हिडीओचा महाराष्ट्रातील शेतकरी प्रश्नांशी काहीएक संबध नाही, व्हिडीओ तामिळनाडूतील आहे.

हेही वाचा: ठाकरे सरकारद्वारे शालेय शिक्षणाचे इस्लामीकरण केले जात असल्याचे सांगणारा व्हिडीओ दिशाभूल करणारा! वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा