सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये एक जमाव खलिस्तानच्या समर्थानात घोषणाबाजी करत असताना बघायला मिळतोय. व्हिडिओत दिसणाऱ्या शीख समुदायातील लोकांच्या हातात खलिस्तानचे झेंडे देखील आहेत.
जमलेली लोकं केवळ खलिस्तानच्या समर्थनाची घोषणाबाजीच करत नाहीयेत, तर त्यांच्याकडून भारतीय तिरंगा पायदळी तुडवला जातोय. तिरंगा फाडला देखील जातोय. सोशल मीडियावर दावा केला जातोय की हा व्हिडीओ भारतातील शेतकरी आंदोलनातील आहे.
संदीप नारायण या ट्विटर युजरकडून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ जवळपास ४७०० पेक्षा अधिक जणांकडून रिट्विट केला गेलाय.
अरुण पुदुर यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय.
पडताळणी:
व्हिडीओ लक्षपूर्वक बघितला असता त्यामध्ये निळ्या रंगाची पोलीस बॅरिकेडिंग बघायला मिळते. याचाच आधार घेऊन गुगलवर निळ्या रंगाच्या पोलीस बॅरिकेडिंग विषयी माहिती घेतली असता वेगवेगळ्या स्टॉक वेबसाईट्सवर आम्हाला अनेक वेगवेगळे फोटोज बघायला मिळाले. बहुतांश फोटोज हे अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणचे असल्याचीही माहिती मिळाली. अलामी या फोटो स्टॉक साईटवर देखील व्हायरल व्हिडिओतील बॅरिकेडिंगशी साधर्म्य असणारा फोटो उपलब्ध आहे.
व्हायरल व्हिडिओतील पोलीस बॅरिकेडिंग आणि अलामीवरील फोटोतील बॅरिकेडिंगमधील समानता अगदी सहज लक्षात येण्यासारखी आहे. अलामीवरचा फोटो अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील आहे.
तुलनात्मक फोटो
याच माहितीच्या आधारे अधिक शोधाशोध केली असता आम्हाला ‘एनआरआय हेराल्ड’च्या ट्विटर अकाऊंटवरून ३ ऑक्टोबर २०२१ रोजी हाच व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले.
सदर व्हिडीओ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीतील अमेरिका दौऱ्यादरम्यानचा आहे. पंतप्रधान मोदींच्या न्यूयॉर्क दौऱ्यादरम्यान खलिस्तानवाद्यांनी घोषणाबाजी केली तसेच भारतीय राष्ट्रध्वज फाडला, असे या ट्विटच्या कॅप्शमध्ये सांगण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे लाईव्हस्ट्रीम युटयूबवर उपलब्ध आहे. त्यामध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे प्रदर्शनकर्ते बघायला मिळतात. लाईव्हस्ट्रीमच्या कॅप्शननुसार देखील सदर लाईव्हस्ट्रीम न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्टसंघाच्या मुख्यालयासमोरच्या आंदोलनाचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भारतीय तिरंग्याचा अपमान करणाऱ्या शिखांचा व्हिडीओ अमेरिकेतील आहे. त्याचा भारतातील शेतकरी आंदोलनाशी संबंध नाही. सोशल मीडियावर केले जाणारे दावे दिशाभूल करणारे आहेत.
हेही वाचा- शेतकरी आंदोलनातील भारतविरोधी म्हणून व्हायरल व्हिडिओ अमेरिका आणि पाकिस्तानातले!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: शेतकरी आंदोलनात भारतीय तिरंग्याचा अप… […]