Press "Enter" to skip to content

शिवराज नारियलवाले मारहाण व्हिडीओद्वारे धार्मिक चिथावणी आणि कोरोनासंबंधी दुष्प्रचाराचा प्रयत्न!

सोशल मीडियात एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओत एका व्यक्तीस पोलिसांकडून लाथांनी आणि काठ्यांनी अमानुष मारहाण केली जात असल्याचे बघायला मिळतेय. व्हिडिओतील व्यक्ती मुस्लिम असून आपल्या व्यवसायासाठी त्याने १५ लोकांचे बळी घेतल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

राजेंद्र कुमार पाठक या फेसबुक युजरकडून व्हिडीओ शेअर केला गेलाय. कॅप्शनमध्ये दावा करण्यात आलाय की घटना तेलंगणामधील निजामाबाद येथील आहे. पोलिसांकडून मारहाण केल्या जात असलेल्या व्यक्तीचे नाव नसीम मियां असून आपल्या अँब्युलन्सचा व्यवसाय व्हावा यासाठी हा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल पेशंटचा ऑक्सिजन बंद करत असे. हा व्यक्ती १५ पेक्षा अधिक लोकांच्या मरणास कारणीभूत ठरला आहे.

नसीम मियां निजामाबाद हॉस्पिटल में पेशेंट की ऑक्सीजन बंद कर दिया करता था, ताकि इसकी एंबुलेंस का बिजनेस हो सके।15 से ज्यादा लोगों को इसने मौत के घाट उतारा। पुलिस ने पकड़ा और इसका सही बिजनेस कर दिया।*

Posted by Rajendra Kumar Pathak on Tuesday, 1 June 2021

अर्काइव्ह पोस्ट

हाच व्हिडीओ याच कॉपीपेस्ट कॅप्शनसह ट्विटरवर देखील शेअर केला जातोय.

अर्काइव्ह पोस्ट

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अविनाश घोडके यांनी सदर व्हिडीओ निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला हे शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला ‘झी २४ तास’च्या वेबसाईटवर २८ मे २०२१ रोजी ‘शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित’ या हेडलाईनखाली प्रसिद्ध बातमीत व्हायरल व्हिडिओतील व्यक्तीचा फोटो बघायला मिळाला.

‘झी २४ तास’च्या बातमीनुसार जालना शहरातील शिवराज नारियलवाले (Shivraj Nariyalwale) यांना जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानूष, रानटी मारहाणीचा व्हीडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

काय होतं प्रकरण?

शिवराज नारियलवाले भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. शिवराज हे 9 एप्रिल रोजी आपल्या बहिणीला घेऊन उपचारासाठी जालना येथील दीपक हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्याचवेळी तिथे एका तरूणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

उपस्थित पोलिसांकडून त्या लोकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जात असल्याचे शिवराज यांनी बघितल्यानंतर त्यांनी ही घटना मोबाईलमध्ये चित्रित करण्यास सुरुवात केली. मात्र, हे पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी शिवराज यांना विरोध दर्शवला.

त्यानंतर गणवेशातील 6 तर इतर 2 अशा 8 पोलिसांनी शिवराज नारियलवाले (Shivraj Nariyalwale) यांना मारहाण केली, असा आरोप करण्यात आला होता. हा संपूर्ण घटनाक्रम मोबाईल व्हीडिओमध्ये चित्रित झाला.

नारियलवाले यांनी व्हीडिओ काढल्याच्या रागातून त्यांना पोलिसांकडून मारहाण झाली असे ‘झी २४ तास’च्या बातमीत सांगण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडीओ तेलंगणाच्या निजामाबादमधील नसून महाराष्ट्राच्या जालन्यातील आहे. व्हायरल व्हिडिओतील मारहाण करण्यात येत असलेली व्यक्ती कुणी मियां नसीम नसून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले आहेत. या घटनेचा कोरोनाशी काहीही संबंध नाही.

हे ही वाचा- अलिगढमध्ये ‘व्हॅक्सिन जिहाद’ होतोय म्हणत ‘झी हिंदुस्थान’ने चालवला इक्वेडोरमधील घटनेचा व्हिडीओ!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा