मुस्लिम धर्मियांच्या मदरशांमध्ये लहान मुलांना बंदुक चालविण्याचे ट्रेनिंग दिले जात असल्याचा दावा करणारी एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होतेय. क्लिप मध्ये दहा-बारा वर्षांच्या मुलांना बंदुक चालविण्याचे प्रशिक्षण देत असल्याची दृश्ये पाहायला मिळतायत.
‘मदरसे में छात्र उच्च शिक्षा प्राप्त करते हुए’ अशा कॅप्शनसह ट्विटर, फेसबुकवर हे दावे जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केले असता व्हिडीओच्या १३ व्या सेकंदाला खालील डाव्या कोपऱ्यात ‘अलजझीरा’ या कतार मधील अंतराष्ट्रीय दर्जाच्या वृत्तवाहिनीचा लोगो बघायला मिळाला.
याच अनुषंगाने गुगल सर्च केले असता आम्हाला १ नोव्हेंबर २०१५ रोजी ‘अलजझीरा’ने प्रकाशित केलेली एक डॉक्युमेंटरी मिळाली. ‘ISIL and the Taliban’ असे त्या डॉक्युमेंटरीचे नाव आहे. यामध्येच ४६ व्या मिनिटाला सध्या व्हायरल होत असलेल्या क्लिपमधील दृश्ये बघायला मिळतात.
डॉक्युमेंट्रीसह प्रसिद्ध लेखात अफगाणिस्तानात ISIL च्या लष्करी प्रशिक्षणात बंदुका आणि ग्रेनेड वापरायला शिकणाऱ्या मुलांचे फोटोज वापरण्यात आले होते. ISIL शस्त्रास्त्रांशी संबंधित व्यावहारिक प्रशिक्षणाद्वारे लहान मुलांना लक्ष्य करत असल्याची माहिती देखील यामध्ये देण्यात आलेली आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की मदरशात लहान मुलांना बंदूक चालविण्याचे ट्रेनिंग दिले जात असल्याचे दावे फेक आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचा भारताशी काहीएक संबंध नाही. सदर दृश्ये अफगाणिस्तानातील आहेत. २०१५ साली ‘अलजझीरा’ या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या डॉक्युमेंटरीमधील ही दृश्ये आहेत.
हेही वाचा: नेवाशात रामनवमीच्या मिरवणुकी दरम्यान मुस्लिमांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]